दिनेशकुमार ऐतवडे 9850652056
islampur vidhansabha news : इस्लामपुरात विरोधकांची मजल 56 हजारापर्यंतच.. : इस्लामपूर मतदार संघात माजी मंत्री आ. जयंत पाटील हे आठव्यांदा उमेदवारी करीत आहेत. त्यांच्या विरोधात आजपर्यंत आठ निवडणुकीत आठ उमेदवार होते. परंतु आजपर्यंतच्या इतिहासात जयंत पाटील यांच्या विरोधकांना 56 हजार मतांचा टप्पा अजून गाठता आला नाही.
islampur vidhansabha news : इस्लामपुरात विरोधकांची मजल 56 हजारापर्यंतच..
सांगलीच्या राजकारणात आता करेक्ट कार्यक्रमाची भाषा अनेकांच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे. जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदार संघात आता दसपटीने लक्ष घालणार, त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार अशी वल्गना आ. विश्वजित कदम, खा. विशाल पाटील, खा. धैर्यशील माने यांनी नुकतेच केली. परंतु 1990 पासून सलग सात वेळा वेगवेगळ्या उमेदवारांसमोर कायमच विजयी झाले. जयंत पाटील यांना रोखने केवळ अवघड नव्हे तर अशक्य गोष्ट असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.
जयंत पाटील कायमच 60 टक्केच्यावर मते घेत आले आहेत. उरलेल्या सर्वांना 40 टक्के मते मिळत आहे. त्यामुळे 60 टक्केच्यावर मते खेचणाराच जयंत पाटील यांचा पराभव करू शकेल. परंतु सध्या तरी तसे शक्य वाटत नाही.
1990 च्या पहिल्या निवडणुकीत जयंत पाटील यांच्या विरोधात विलासराव शिंदे उभे होते. जयंत पाटील यांना 81 हजार 18 मते मिळाली तर विलासराव शिंदे यांना 48 हजार 459 मते मिळाली.
1995 च्या निवडणुकीत जयंत पाटील यांच्या विरोधात भाजपने अशोक पाटील यांना उभे केले. या निवडणुकीत जयंत पाटील यांना 94 हजार 605 तर अशोक पाटील यांना 31 हजार 394 मते मिळाली.
1999 मध्ये राष्ट्रवादीची स्थापना झाली. जयंत पाटील राष्ट्रवादीत गेले. राष्ट्रवादीकडून त्यांना उमेदवारी मिळाली तर त्यांच्या विरोधात भाजपने सी. बी. पाटील यांना उभे केले. यावेळी जयंत पाटील यांना 83 हजार 112 तर सी. बी. पाटील यांना 29 हजार 162 मते मिळाली.
2004 च्या निवडणुकीत पुन्हा एकदा जयंत पाटील राष्ट्रवादीच्या चिन्हावर उभे राहिले. यावेळी भाजपने उमेदवार उभे केला नाही. त्यामुळे रघुनाथ पाटील यांची स्वतंत्र भारत पक्षातून उमेदवारी राहिली. यावेळी जयंत पाटील यांना 1 लाख 20 हजार 830 तर रघुनाथ पाटील यांना केवळ 35 हजार 740 मते मिळाली.
2009 च्या निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रात मतदार संघांची पुनर्रंचना झाली. वाळवा नाव बदलून इस्लामपूर मतदार संघ झाले. जयंत पाटील यांच्या स्वत:च्या गावासह 49 गावे नव्या शिराळा मतदार संघात गेले मिरज तालुक्यातील आठ गावे इस्लामपूर मतदार संघात आले. त्यामुळे या निवडणुकीत जयंत पाटील यांचा पराभव निश्चित आहे, असे सवार्र्ंना वाटू लागले. त्यामुळे सवार्र्ंनी मिळून वाळव्याच्या वैभव नायकवडींना उभे केले. याही निवडणुकीत जयंत पाटील यांना 1 लाख 10 हजार 673 मते मिळाली तर वैभव नायकवडींना केवळ 56 हजार 165 मते मिळाली.
2014 च्या निवडणुकीत सर्वच पक्ष एकमेकांच्या विरोधात उभे राहिले. जयंत पाटील राष्ट्रवादीकडून तर बोरगावचे जितेंद्र पाटील काँग्रेसकडून उभे राहिले. चिकुर्डेचे अभिजित पाटील अपक्ष होते. या निवडणुकीत जयंत पाटील यांना 1 लाख 13 हजार 45 मते मिळाली तर अभिजित पाटील यांना 37 हजार 859 मते मिळाली जितेंद्र पाटील यांना केवळ 18 हजार 187 मते मिळाली.
गेल्या म्हणजे 2019 च्या निवडणुकीत जयंत पाटील यांच्या विरोधात शिवसेनेने वाळव्याच्या गौरव नायकवडींना उमेदवारी दिली. परंतु निशिकांत पाटील यांनी बंडखोरी केली. येथे पक्षाच्या उमेदवारापेक्षा अपक्ष असणार्या निशिकांत पाटील यांना जादा मते मिळाली. जयंत पाटील यांना 1 लाख 15 हजार 563 मते मिळाली तर निशिकांत पाटील यांना 43 हजार 396 मते मिळाली. गौरव नायकवडींना 35 हजार 668 मते मिळाली.
जयंत पाटील यांच्या विरोधातले आजपर्यंतचे विरोधी उमेदवारांना मिळालेेले मतदान
1990 विलासराव शिंदे 48459
1995 अशोक पाटील 31394
1999 सी. बी. पाटील 29162
2004 रघुनाथ पाटील 35740
2009 वैभव नायकवडी 56165
2014 अभिजित पाटील 37859
2019 निशिकांत पाटील 43396
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.