राष्ट्रवादीसह अन्य पक्षांतील काहीजण गळाला लागले तरी फारसा फरक पडेल असे सध्या तरी चि नाही. त्यामुळे अजितरावांना ‘सांगली तशी कोसो दूरच आहे’ म्हणावे लागेल.
अमृत चौगुले, जनप्रवास
राष्ट्रवादी टेकओव्हर करण्यासाठी आता फुटीर अजित पवार गटाकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. त्यात प्रामुख्याने शरद पवारांचे खंदे निष्ठावंत व प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांना दे धक्कासाठी खुद्द अजित पवारांनीच सांगलीची जबाबदारी घेतली आहे. परंतु एकूणच जयंतरावांची जिल्ह्यावरील पक्कड भक्कम आहे. शिवाय जोडीला जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सुमनताई पाटील अन् प्रति स्व. आर. आर. पाटील अर्थात पुत्र रोहित पाटील यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी फळीची भक्कम साथ आहे. परिणामी त्यातूनही राष्ट्रवादीसह अन्य पक्षांतील काहीजण गळाला लागले तरी फारसा फरक पडेल असे सध्या तरी चि नाही. त्यामुळे अजितरावांना ‘सांगली तशी कोसो दूरच आहे’ म्हणावे लागेल.
शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीलाही खिंडार पाडण्यात भाजप यशस्वी
शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीलाही खिंडार पाडण्यात भाजप यशस्वी झाले. त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरातच फूट पाडत पुतणे अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद बहाल केले. अर्थात सत्तेच्या उबीसाठी त्यांच्यासोबतच उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, दिलीप-वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, सुनील तटकरे आदींसह दिग्गज नऊजणांनी शपथ घेतलीच, अनेक आमदारही अजित पवार गटासोबत आहेत. राज्यातील अर्थात मविआ आणि केंद्रातील इंडियात शरद पवार यांचे महत्त्व कमी व्हावे, शिवाय विरोधकांची धारही कमी व्हावी यासाठी भाजपने ही खेळी केली. दुसरीकडे शरद पवार यांचीच सत्तेसाठी ही राजकीय मुत्सद्देगिरी आहे का, असा सवाल वजा संभ्रम निर्माण झाला होता.
हेही वाचा
जयंत पाटील यांच्यापुढे प्रत्येकवेळी नवा उमेदवार
खुजगावचे धरण आज असते तर…..राजारामबापुंची आठवण
जयंत पाटलांना घेरण्यासाठी महाडिकांची तयारी
जयंत पाटीलही भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या
यातच फुटीनंतरही शरद पवार-अजित पवार यांच्या गुप्तभेटींवरून पुन्हा पवारांसह सर्वच राष्ट्रवादी एकत्र येणार का, असे काहूर माजले होते. खुद्द जयंत पाटीलही भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण शरद पवार आणि जयंत पाटील यांनी यांनी हे सर्व दावे फेटाळत आता अजित पवार अन् फुटीरांच्या विरोधातच एल्गार पुकारण्याचा निर्धार केला. त्याची सुरुवात भुजबळांच्या नाशिकपाठोपाठ नुकतीच धनंजय मुंडेंच्या बीडमधून रणशिंग फुंकून झाली. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या एकीला आणि चर्चेला पूर्णविराम मिळाला. त्याला प्रत्युत्तरादाखल अजित पवार यांनीही प्रतिसभांची घोषणा केली आहे.
दुसरीकडे आता राष्ट्रवादीवर कब्जा मिळविण्यासाठी दोन्हीकडून संघर्ष सुरू
दुसरीकडे आता राष्ट्रवादीवर कब्जा मिळविण्यासाठी दोन्हीकडून संघर्ष सुरू झाला आहे. त्यात नव्याने मोर्चेबांधणीसाठी अजित पवार गटाकडून जिल्ह्यांच्या जबाबदार्याही देण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने खुद्द अजित पवार यांनीच शरद पवारांचे खंदे शिलेदार असल्याने जयंत पाटील यांच्या सांगलीसह पुणे, सोलापूर, सातारा या जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. यामागे अजित पवार यांच्यासारख्या आक्रमक नेत्यालाच जयंत पाटील यांना अडविण्यासाठी जाणीवपूर्वक जबाबदारी सोपविल्याचे स्पष्ट होते. तरीही जयंतरावांना दे धक्का देणे अजित पवारांसाठी हे सोपे नाही.
हेही वाचा
राज्यात चर्चा केवळ जयंत पाटलांचीच…
जयंत पाटील हे तसे पाहता जिल्ह्याचे एक क्रमांकाचे नेते आहेत.
जयंत पाटील हे तसे पाहता जिल्ह्याचे एक क्रमांकाचे नेते आहेत. संस्थात्मकदृष्ट्या त्यांची मजबूत आणि सक्षम मांड आहे. त्यांचा इस्लामपूर मतदारसंघ तसा भक्कम आहे. त्यांच्या जोडीला मानसिंगराव नाईक, सुमनताई पाटील यांच्यारूपाने शिराळा आणि तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यांची मजबूत सत्ताधारी फळी सोबत, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करीत आहे. ते कोणत्याही परिस्थितीत शरद पवार आणि त्यापेक्षा जयंत पाटील यांच्या विरोधात जावू शकत नाहीत. सांगली, मिरजेत महापालिकेत त्यांचा गट मजबूत आहे. दुसरीकडे जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसह ग्रामपंचायत, नगरपालिकांमध्येही त्यांची मजबूत फळी आहे.
काँग्रेसला जयंत पाटील यांच्या वरदहस्ताची ऊब गरजेची
जरी जिल्ह्यात काँग्रेस मजबूत असली तरी महाविकास आघाडी आणि त्यातल्या त्यात काँग्रेसला जयंत पाटील यांच्या वरदहस्ताची ऊब गरजेची आहे. तत्कालिन महापालिका टर्म असो वा मार्केट कमिटीच्या निवडणुकीत जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ताकेंद्रे ताब्यात घेण्यात आघाडीला यश मिळाले होते. जिल्हा बँकही त्यांच्याच नेतृत्वाखाली आहे. शिवाय आघाडी आणि जयंत पाटील यांचे नेतृत्व स्वीकारून पुढे जाण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीचे हीत आहे हे सर्वजण जाणून आहेत. त्यामुळे ती जयंतरावांच्या दृष्टीने जमेची बाजू आहे.
महायुतीचे शिलेदार असले तरी या सर्वांना यापूर्वी जयंत पाटील यांचाच वरदहस्त होता.
दसुसरीकडे जिल्ह्यात जरी भाजप सत्ताधारी असला अन् भाजपचे संजय पाटील खासदार आणि पालकमंत्री सुरेश खाडे, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर हे जरी महायुतीचे शिलेदार असले तरी या सर्वांना यापूर्वी जयंत पाटील यांचाच वरदहस्त होता. शिवाय त्यांच्या ताकदीची जाणीव आहे. प्रसंगी त्यांच्या नादाला किंवा या वादात न पडलेले बरे अशीच सर्वांची भूमिका असते. त्यातूनही कुणी विरोधात गेल्यास ते कसा आणि कधी ‘कार्यक्रम’ करतील याचा चांगलाच अनुभव आणि धसका आहे. त्यामुळे ते सर्वजण त्यांच्या विरोधात थेट जाण्याचे धाडस सध्या तरी करणार नाहीत.
हेही वाचा
वारसा असूनही… न झालेले आमदार...
जयंत पाटील फळी मजबूत असल्याने तिला टक्कर देताना आपला टिकाव लागेल की नाही अशी भीती आहे.
राहता राहिले राष्ट्रवादी फुटीनंतर माजी महापौर इद्रिस नायकवडी, पुत्र अतहर नायकवडी, नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्यासह काहीजण अजित पवार यांच्या गळाला अगोदरच काहीजण लागले आहेत. त्यांच्या मध्यस्तीने किंवा पूर्वीच्या ऋणानुबंधांतून त्यानंतर अनेकांनी अजित पवारांना भेटूनही त्या गटात जाणे टाळले आहे. कारण जयंत पाटील आणि एकूणच जिल्ह्याच्या राष्ट्रवादीची फळी मजबूत असल्याने तिला टक्कर देताना आपला टिकाव लागेल की नाही अशी फुटीच्या उंबरठ्यावर असणार्यांना भीती आहे. त्यामुळे आता अजित पवारांनी सांगलीत लक्ष घातले तरी ते किती वेळ देणार? शिवाय भाजप, काँग्रेस-राष्ट्रवादी जिल्ह्यात मजबूत असताना आपला वेगळा गट अस्तित्वापुरताच राहून उपयोग काय? भाजप-शिंदे गटातून पुन्हा आपल्याला स्वतंत्रपणे सत्तेची ऊब अन् त्याच्या संधी तरी किती मिळणार याचाही विचार अजित पवार गटात जाणार्यांना करावा लागणार आहे. एकूणच यामुळे अजित पवार यांच्या गळाला सहजासहजी मोहरे लागणे कठीण असून, ही जयंतरावांच्यादृष्टीने जमेची बाजू ठरणार आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



