rajkiyalive

जिल्ह्यात 72 वर्षात केवळ चारच महिला आमदार

दिनेशकुमार ऐतवडे

 देशाच्या राजकारणात अभूतपूर्व घटना घडली आहे. आजपर्यंत महिलांना केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेत म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीमध्ये 50 टक्के आरक्षण होते परंतु आता विधानसभा आणि लोकसभेतही महिलांना 33 टक्के आरक्षण मिळणार आहे. त्यामुळे आता राज्याच्या विधानसभेत 288 पैकी 96 आमदार महिला असणार आहेत आणि लोकसभेत 547 पैकी 181 खासदार महिला असणार आहेत. असे असले तरी सांगली जिल्ह्यात 1952 पासून केवळ चारच महिला आमदार म्हणून निवडून गेल्या. स्व.श्रीमंतीबाई कळंत्रेआक्का, स्व.सरोजनी बाबर, शालिनीताई पाटील आणि सुमनताई पाटील या चार महिला आजपर्यंत विधानसभेत पोहोचल्या आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थेत महिलांना 50 टक्के आरक्षण असल्याने अनेक ठिकाणी महिलाराज आले आहे. अनेक महिलांना जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष आणि ग्रामपंचायतीमध्ये सरपंच म्हणून संधी मिळाली आणि त्यांनी संधीचे सोने केले आहे. महिलाही आपणही काही कमी नाही, असे अनेक ठिकाणी दाखवून दिले आहे. असे असले तरी अजूनही महिलांना संधी द्यावी असे कोणत्याच नेत्याला वाटत नाही.

अपघाताने आणि वारसानेच महिलांना संधी मिळू शकते हे आजपर्यंतच्या राजकारणातून दिसून आले आहे.
26 मार्च 1952 रोजी मुंबई प्रांतांची पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली. देशात सर्वत्र स्वातंत्र्यसैनिकांबद्दल आदराची भावना होती. त्यांना लोक मानत होते. त्याचा फायदा काही स्वातंत्र्यसैनिकांनी करून घेतला. अनेक स्वातंत्र्यसैनिक या पहिल्या विधानसभेच्या निवडणुकीला उभे राहिले आणि निवडूनही आले. महिलांना त्यावेळी आत्ताएवढे स्वातंत्र्य नव्हते. तरीही सांगली जिल्ह्यातून दोन महिला राजकारणात आल्या आणि आमदार म्हणून निवडूनही आल्या.

हेही वाचा

..न झालेले मुख्यमंत्री, स्व. गुलाबराव पाटील

1952 : पहिल्याच निवडणुकीत वसंतदादांची विधानसभेत एन्ट्री

वारसा असूनही… न झालेले आमदार…

72 वर्षात 28 वर्षेच दादा घराण्यात आमदारकी

सांगा राजेंद्र पाटील यड्रावकर कुणाचे?

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी

हातकणंगलेत महाआघाडीची भिस्त राजू शेट्टींवरच

मिरज मतदार संघातून काँग्रेसने जैन समाजाच्या नेत्या स्व. श्रीमंतीबाई कळंत्रे आक्का यांना संधी दिली. त्यांनी संधीचे सोने केले. त्यांनी स्वातंत्र्यसैनिक धोंडिराम तुकाराम माळी यांचा 14 हजार 47 मतांनी पराभव केला. वाळवा मतदार संघाची निर्मिती त्यावेळी झाली नव्हती. शिराळा हा विधानसभेचा मतदार संघ होता. या मतदार संघातून ज्येष्ठ लेखिका सरोजनी बाबर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली.

त्यांनी यशवंत चंद्रू पाटील यांचा 1339 मतांनी पराभव केला. 1952 नंतर महिलांना जवळपास 30 वर्षे संधीच मिळाली नाही. 1980 च्या निवडणुकीत वसंतदादा पाटील लोकसभेत खासदार असल्याने सांगलीची जागा शालिनीताई पाटील यांना मिळाली. दादांचा हक्काचा मतदार संघ असल्याने येथे कोणीही उमेदवार असला तरी तो निवडून येणारच होता. फक्त निवडणुकीची औपचारिकता होती.

काँग्रेसची उमेदवारी शालिनीताई पाटील यांना मिळाली तर समाजवादी काँग्रेसतर्फे हरिपूरचे पैलवान नामदेवराव मोहिते रिंगणात उतरले. ही निवडणूक एकतर्फी झाली. शालिनीताई पाटील यांना 44 हजार 341 मते मिळाली तर नामदेवराव मोहितेंना केवळ 14 हजार 799 मते पडली. लतिफ कुरणे यांनी बंडखोरी केली, पण त्यांना केवळ 224 मते मिळाली. शालिनीताई पुढे महसूलमंत्रीही झाल्या.

2015 मध्ये तासगावच्या सुमनताई पाटील यांना संधी मिळाली ती केवळ अपघातानेच. 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आर.आर.पाटील यांनी अजितराव घोरपडेंचा पराभव केला होता. परंतु दुर्देवाने 2015 मध्ये त्यांचे निधन झाले. या ठिकाणी पोटनिवडणूक लागली आणि आपसूकच उमेदवारी सुमन पाटील यांना मिळाली. पोटनिवडणुकीत सुमनताई पाटील निवडून आल्या. पुढे 2019 च्या निवडणुकीतही त्यांना संधी मिळाली आणि पुन्हा त्या निवडून आल्या.

अशा प्रकारे जिल्ह्यातून आजपर्यंत केवळ श्रीमंतीबाई कळंत्रे आक्का, सरोजनी बाबर, शालिनीताई पाटील आणि सुमनताई पाटील या चारच महिलांना आमदार म्हणून संधी मिळाली. पैकी श्रीमंतीबाई कळंत्रेआक्का आणि सरोजनी बाबर यांना काँग्रेसने बोलावून उमेदवारी दिली तर शालिनीताई पाटील आणि सुमनताई पाटील यांना मात्र वारसा हक्काने उमेदवारी मिळाली. सन 1986 च्या निवडणुकीत दादा राज्यस्थानचे राज्यपाल असल्याने पुन्हा एकदा शालिनीताई यांना उमेदवारी मिळेल असे वाटत होते. पण मिळाले नाही. भाजपतर्फे नीता केळकर यांना दोन वेळा उमेदवारी मिळाली. परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला.

राज्यसभा, विधानपरिषदेत आरक्षण नाही

लोकसभा आणि विधानसभा या ठिकाणी महिलांना 33 टक्के आरक्षण मिळणार आहे. परंतु राज्यसभेत आणि विधानपरिषदेत आरक्षण असणार नाही. लोकांमधून जरी संधी मिळाली नसली तरी विधानपरिषद आणि राज्यसभेत महिलांना लॉटरी लागू शकते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज