rajkiyalive

KHANAPUR-ATPADI VISHANSABHA 2024 : खानापूर मतदारसंघात होणार राजकीय अस्तित्वाची लढाई

 

प्रताप मेटकरी : जनप्रवास, विटा

KHANAPUR-ATPADI VISHANSABHA 2024 : खानापूर मतदारसंघात होणार राजकीय अस्तित्वाची लढाई : संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या खानापूर विधानसभा मतदारसंघातील राजकारण आता रंजक वळणावर आले आहे. निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर, राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील आणि माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर या महायुतीच्याच नेत्यांनी आमदारकीसाठी शड्डू ठोकत एकमेकांविरोधातच दंड थोपटले आहे. मात्र महाविकास आघाडीत भयाण शांतता आहे.

KHANAPUR-ATPADI VISHANSABHA 2024 : खानापूर मतदारसंघात होणार राजकीय अस्तित्वाची लढाई

वैभवदादांच्या भूमिकेकडे लागल्या नजरा ; शिंदे गटाचे चाकोरीतून तर विरोधकांचे शक्यतेवर आधारित राजकारण

शिंदे गटाचे चाकोरीतून तर विरोधकांचे शक्यतेवर आधारित राजकारण आहे. मतदारसंघात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय अस्तित्वाची लढाई होणार असल्याने युवा नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. महायुतीतून सुहास बाबर यांची उमेदवारी निश्चित झाल्यास वैभव पाटील नेमकी कोणती राजकीय भूमिका घेणार ? कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार ? याकडे मतदारसंघाच्या नजरा लागल्या आहेत.

बाबर गटाची धुरा आता माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्यावर आली आहे

लोकसभा निवडणूकीत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडी महायुतीला सत्तेतून पाय उतार करण्यासाठी गनिमी काव्याने व्युहरचना आखत आहे. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादीचा अजितदादा पवार गट आहे. त्यांनी आता विधानसभा निवडणूकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. खानापूर मतदारसंघात सन 2014 च्या विधानसभा निवडणुकीपासून शिवसेनेचे आमदार अनिलभाऊ बाबर हे  कप्रतिनिधीत्व करत होते. परंतु त्यांचे आकस्मिक निधन झाल्याने त्यांच्या पश्चात होणारी विधानसभेची निवडणूक पहिलीच आहे. त्यामुळे बाबर गटाची धुरा आता माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहास बाबर यांच्यावर आली आहे. ते देखील तितक्याच वेगाने कामाला लागले असून त्यांनी आमदारकीच्या दृष्टीने मतदारसंघात साखरपेरणी सुरू केली आहे.

महाविकास आघाडीच्या विधानसभा मतदारसंघाच्या जागा वाटपात खानापूर विधानसभा मतदारसंघ उबाठा शिवसेनेच्या वाट्याला आहे.

त्यामुळे हा मतदारसंघ उबाठा शिवसेनेकडे राहणार आहे. तर राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी राजकीय वाटचाल सुरू ठेवत विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचा निर्धार केला आहे. मात्र महायुतीतून उमेदवारी ही सुहास बाबर यांनाच मिळणार आहे.

त्यामुळे वैभव पाटील यांना निवडणूक लढवायची झाल्यास शिवसेना उबाठा किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हेच दोन पर्याय आहेत.

मात्र नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीवेळचे राजकीय समीकरण पाहता विधानसभेला आपला चंद्रहार होऊ नये यासाठी लंके पॅटर्नप्रमाणे वैभव पाटील हे पुन्हा राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाकडे घरवापसी करणार असल्याची चर्चा आहे. माजी आमदार सदाभाऊनी वैभवदादांना आमदारकीसाठी पुढे चाल दिली आहे. मतदारसंघ राष्ट्रवादीने आपल्या वाट्याला घेऊन वैभव पाटील यांनी राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून रिंगणात उतरावे, अशी ही शक्यता पाटील गटाच्या समर्थकांकडून बोलली जात आहे.

अजितदादा गटात जात असताना विट्याच्या पाटलांनी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दुखावले आहे,

ही गोष्ट राजकीय पटलावर लपून राहिलेली नाही. त्यामुळे शरदचंद्र पवार गटाच्यावतीने विधानसभेला उमेदवार म्हणून उभा राहत असताना वैभव पाटलांना प्रथम प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची समजूत काढावी लागणार आहे. जयंत पाटलांनीही खानापूर मतदारसंघावर दावा सांगणे गरजेचे आहे. अशा शक्यतेवर आधारित हे राजकारण आहे, ही शक्यता सत्यता उतरली तर विसापूर सर्कलमधील 21 गावांतील आर. आर. पाटील गटाची मदत ही वैभव पाटलांना घ्यावी लागेल. आता इथे वैभव पाटील आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या गटाचे सख्य हे पुन्हा कळीचा मुद्दा होईल. त्यामुळे अस्थिरतेच्या उंबरठ्यावर खानापूर मतदारसंघातील राजकारण दिसत आहे.

खानापूर मतदारसंघातील एकूण राजकीय समीकरणे पाहता मतदारसंघावर उबाठा शिवसेनेऐवजी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा मोठा प्रभाव आहे.

विटा शहरासह खानापूर तालुक्यात ताकदीने पाटील गट कार्यरत आहे. शिवाय आटपाडी तालुक्यात स्व. आर. आर. पाटील यांचे निकटवर्तीय नातेवाईक हणमंतराव देशमुख, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे निकटवर्तीय असणारे अँड. बाबासाहेब मुळीक, रावसाहेब पाटील यांच्यासारखे अनेक समर्थक राजकीय पटलावर कार्यरत आहेत. आळसंद परिसरातील गावांत राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अरूण लाड यांना मानणारा मोठा समर्थक वर्ग आहे. तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचेही या मतदारसंघातील विविध क्षेत्रात काम करणार्या लोकांशी सलोख्याचे संबंध आहेत.

विधानसभेच्या निकालाचा कौल फिरवणारी ताकद तासगाव तालुक्यातील विसापूर सर्कलमधील 21 गावांत आहे.

21 गावांतील मताधिक्य ज्या उमेदवारास मिळते त्याचा विजयाचा मार्ग सुकर होतो. या 21 गावांवर राष्ट्रवादीचे नेते स्व.आर.आर. पाटील यांच्या गटाचा प्रभाव आहे. त्यामुळे आमदार सुमनताई पाटील यांना ही वैभव पाटील यांनाच मदत करावी लागेल. अशा सर्व समीकरणात वैभव पाटील यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवल्यास राष्ट्रवादीची ताकद एकवटली आणि महाविकास आघाडीतील मित्र पक्ष म्हणून काँग्रेसचे नेते आमदार विश्वजीत कदम यांनी देखील जर प्रामाणिकपणे मदत केली तर विधानसभेला नक्कीच वैभव पाटीलच विजयी होतील, असे पाटील गटाच्या समर्थकांना वाटते. खानापूर मतदारसंघावर ठाकरे गटाच्या शिवसेनेपेक्षा शरदचंद्र पवार गटाचा प्रभाव अधिक आहे.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत विशाल पाटील यांना मिळालेले मतदारसंघातून मताधिक्क्य पाहता मतदारसंघात ठाकरे गटापेक्षा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेस यांची नक्कीच मोठी ताकद आहे. हे जाणून वैभव पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट किंवा काँग्रेसला पसंती देतील पण ठाकरे गट हे जागा सोडेल की नाही याबाबत साशंकता आहे. त्याचवेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे देखील ताकदीने जागा मागतील की नाही ? हा देखील प्रश्न आहे. त्यामुळे या ठिकाणची लढत शिवसेना शिंदे आणि शिवसेना ठाकरे अशी झाल्यास आश्चर्य वाटू नये.

ठाकरे गटाचा राजकीय हट्ट काय असतो हा संपूर्ण सांगली जिल्ह्याने नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीवेळी पाहिला आहे.

त्यामुळे या मतदारसंघावरचा ठाकरे गट दावा सोडतील, असे वाटत नाही. शिंदे गटाविरूध्द लढणार्‍या इच्छुक उमेदवाराला ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा लागेल. अन्यथा उध्दव ठाकरे हे परस्पर उमेदवारी जाहीर करतात आणि त्या जागेवर अडून बसतात, हा सांगली लोकसभेचा ताजा इतिहास आहे. तसे झाले तर पुन्हा अपक्ष म्हणून कोण पुढे येईल ? हे पाहणे रंजक ठरेल. खासदार विशाल पाटील यांच्यासारखी शिंदे गटाच्याविरूध्द अपक्ष उमेदवार करायची झाल्यास पडद्यामागून काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप अशा सर्वांची मदत घ्यावी लागेल.

विशाल पाटील यांनी ते लिलया साधले होते. त्यामुळे ते वरकरणी अपक्ष होते पण वास्तवात ते सर्वपक्षीय उमेदवार होते. ही किमया अपक्ष म्हणून उभा राहणार्‍या उमेदवाराला करावी लागेल. अन्यथा बाबर गटासाठी बर्‍याच बाजू जमेच्या ठरतील. त्यामुळे एकंदरित खानापूर मतदारसंघाचे राजकारण सध्यस्थितीत जर – तरच्या शक्यतेवर अवलंबून राहिले आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी वैभव पाटील नेमकी कोणती राजकीय भूमिका घेणार ? कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार ? याकडे मतदारसंघाच्या नजरा लागल्या आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज