rajkiyalive

khanapur vidhansabha 2024 : खानापूर मतदारसंघामध्ये ‘तुतारी’ कोणाच्या हाती ?

वैभव पाटील किंवा राजेंद्रआण्णा देशमुख यांच्यापैकी कोण करणार घरवापसी

प्रताप मेटकरी
khanapur vidhansabha 2024 : खानापूर मतदारसंघामध्ये ‘तुतारी’ कोणाच्या हाती ? : खानापूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून एकास एक लढतीसाठी तगडा उमेदवार देण्यासाठी पडद्याआड हालचाली सुरु आहेत. खानापूर मतदारसंघ महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाला सुटणार ? यापेक्षा कोणता उमेदवार सुहास बाबर यांना रोखू शकतो यासाठी राजकीय जुळण्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे खानापूर मतदारसंघामध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशी राजकीय पटलावर राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत. वैभव पाटील किंवा माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांच्यापैकी कोण पुन्हा घरवापसी करून राष्ट्रवादीमय होणार ? खानापूर मतदारसंघामध्ये ‘तुतारी’ कोणाच्या हाती ? येणार याचीच उत्सुकता निर्माण झाली आहे.

khanapur vidhansabha 2024 : खानापूर मतदारसंघामध्ये ‘तुतारी’ कोणाच्या हाती ?

खानापूर मतदारसंघामध्ये पक्षापेक्षा व्यक्तीकेंद्रित राजकारण असल्याने शेवटच्या क्षणी राजकीय पक्षाच्या चिन्हाला महत्व येते. विधानसभेसाठी हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. मात्र लोकसभा निवडणूकीचा अनुभव लक्षात घेता ठाकरे गटाकडे विधानसभा निवडणूकीला उतरण्यासाठी फारसे कोणी इच्छुक नाही. मात्र शिंदे गटाकडून स्व. आमदार अनिलभाऊ बाबर यांचे पुत्र सुहास बाबर, भाजपकडून माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील हे प्रमुख इच्छुक आहेत. परंतु हे तिघेही महायुतीकडून प्रमुख दावेदारी सांगत आहेत. दरम्यान आता नव्याने भाजपचे माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांची देखील भर पडली असून त्यांनी देखील विधानसभेसाठी शड्डू ठोकत विधानसभा निवडणूक लढविण्याचे संकेत दिले आहेत.

माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख हे देखील तुतारी हातात घेणार ? अशी चर्चा रंगली आहे

पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे अनेक दिग्गज नेते शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गळाला लागत असताना गेल्या काही दिवसांपासून माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख हे देखील तुतारी हातात घेणार ? अशी चर्चा रंगली आहे. खानापूर विधानसभा मतदारसंघ महायुतीत शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी थेट विट्यात येऊनच सुहास बाबर यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे महायुतीतील इतर इच्छुक नेत्यांना आपापल्या पक्षातून बाहेर पडून महाविकास आघाडीकडून उमेदवारी करावी लागेल.

आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांनी आगामी विधानसभा निवडणूकीत उतरण्याचा निर्धार केला आहे.

कोणत्याही परिस्थितीत पुन्हा एकदा विधानसभेसाठी शड्डू ठोकून महाविकास आघाडीने उमेदवारी न दिल्यास अपक्ष म्हणून निवडणूक लढविणारच आहे. यंदाच्या विधानसभा निवडणूकीत थांबणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे. त्यांचे राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणे सुरू आहे. त्यामुळे सध्या पडद्याआड सुरू असलेल्या राजकीय घडामोडीमुळे संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या खानापूर विधानसभा मतदारसंघातील राजकारण आता रंजक वळणावर आले आहे. निवडणूक लढविण्यास इच्छुक असणार्‍या महायुतीच्याच नेत्यांनी आमदारकीचा शड्डू ठोकत एकमेकांविरोधातच दंड थोपटले आहेत. त्यामुळे आगामी खानापूर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या जागा वाटपात खानापूर विधानसभा मतदारसंघ उबाठा शिवसेना वाट्याला आहे.

त्यामुळे हा मतदारसंघ उबाठा शिवसेनेकडे आहे. तर राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील आणि आमदार राजेंद्रआण्णा देशमुख यांनी देखील विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे वैभव पाटील आणि
राजेंद्रआण्णा देशमुख यांना निवडणूक लढवायची झाल्यास शिवसेना उबाठा किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हेच दोन पर्याय आहेत. त्यामुळे आटपाडीचे देशमुख आणि विट्याचे पाटील हे पुन्हा राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाकडे घरवापसी करणार असल्याची चर्चा राजकीय पटलावर आहे. खानापूर मतदारसंघातील एकूण राजकीय समीकरणे पाहता मतदारसंघावर उबाठा शिवसेनेऐवजी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा मोठा प्रभाव आहे. विटा शहरासह खानापूर तालुक्यात ताकदीने पाटील गट कार्यरत आहे.

शिवाय आटपाडी तालुक्यात स्व. आर. आर. पाटील यांचे निकटवर्तीय नातेवाईक हणमंतराव देशमुख, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे निकटवर्तीय असणारे अँड. बाबासाहेब मुळीक, रावसाहेब पाटील यांच्यासारखे अनेक समर्थक राजकीय पटलावर कार्यरत आहेत. आळसंद परिसरातील गावांत राष्ट्रवादीचे विधानपरिषदेचे आमदार अरूण लाड यांना मानणारा मोठा समर्थक वर्ग आहे. तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचेही या मतदारसंघातील विविध क्षेत्रात काम करणार्या लोकांशी सलोख्याचे संबंध आहेत. विधानसभेच्या निकालाचा कौल फिरवणारी ताकद तासगाव तालुक्यातील विसापूर सर्कलमधील 21 गावांत आहे. 21 गावांतील मताधिक्य ज्या उमेदवारास मिळते त्याचा विजयाचा मार्ग सुकर होतो.

या 21 गावांवर राष्ट्रवादीचे नेते स्व.आर.आर. पाटील यांच्या गटाचा प्रभाव आहे.

त्यामुळे आमदार सुमनताई पाटील यांना ही वैभव पाटील यांनाच मदत करावी लागेल. अशा सर्व समीकरणात वैभव पाटील यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवल्यास राष्ट्रवादीची ताकद एकवटली आणि महाविकास आघाडीतील मित्र पक्ष म्हणून काँग्रेसचे नेते आमदार विश्वजीत कदम यांनी देखील जर प्रामाणिकपणे मदत केली तर विधानसभेला नक्कीच वैभव पाटीलच विजयी होतील, असे पाटील गटाच्या समर्थकांना वाटते.

मतदारसंघ राष्ट्रवादीने आपल्या वाट्याला घेऊन वैभव पाटील यांना राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून रिंगणात उतरवले जाणार असल्याचे बोलले जात आहे. शिंदे गटाचे उमेदवार सुहास बाबर यांच्याविरूध्द लढणार्‍या उमेदवाराला महाविकास आघाडीत प्रवेश करण्याचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा लागेल. एकंदरित खानापूर मतदारसंघाचे राजकारण सध्यस्थितीत जर – तरच्या शक्यतेवर अवलंबून आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी वैभव पाटील आणि

राजेंद्रआण्णा देशमुख नेमकी कोणती राजकीय भूमिका घेणार ? कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढविणार ? याकडे मतदारसंघाच्या नजरा लागल्या आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज