kolhapur news : कोल्हापूर जिल्ह्यात एक खासदार, तीन आमदार वाढणार; : कोल्हापूर : केंद्र शासनाने जनगणनेची घोषणा केली असून, येणारी लोकसभा आणि विधानसभा नव्या लोकसंख्येच्या आधारावर होणार आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात लोकसभेची एक आणि विधानसभेच्या किमान तीन जागा वाढणार आहेत. त्यामुळे येणार्या या निवडणुकांमध्ये जिल्ह्याची राजकीय रचना पुन्हा एकदा बदलणार आहे. याआधी 2009 साली सध्याची मतदारसंघ रचना अस्तित्वात आली होती.
kolhapur news : कोल्हापूर जिल्ह्यात एक खासदार, तीन आमदार वाढणार;
2028 ला होणार पुन्हा मतदारसंघांची तोडमोड
2009 आधी कोल्हापूर जिल्ह्यात विधानसभेचे 12 आमदार होते. गडहिंग्लज आणि सांगरूळ हे दोन विधानसभा मतदारसंघ त्यावेळी विसर्जित करण्यात आले. परिणामी जिल्ह्यात विधानसभेच्या दहाच जागा शिल्लक राहिल्या. आता पुन्हा केंद्र शासनाने जनगणनेची घोषणा केली आहे. ती 2028 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. गेल्या 15 वर्षात लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली असून, त्याची दखल घेऊन आता हे मतदारसंघ नव्याने तयार करण्यात येणार आहे.
सध्या असलेल्या दहा मतदारसंघांपैकी कमीतकमी मतदारसंख्या असलेला कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ असून, सर्वात जास्त मतदार हे कोल्हापूर दक्षिण हा मतदारसंघ आहे. कोल्हापूर उत्तरची मतदारसंख्या 3 लाख 1 हजार असून, दक्षिणची मतदारसंख्या 3 लाख 72 हजार इतकी आहे. कोणत्याही मतदारसंघातील मतदारसंख्येपेक्षा 30 टक्क्यांनी जादा त्या मतदारसंघातील लोकसंख्या असते.
One MP, three MLAs will be added to Kolhapur district;
सध्याचे विधानसभा मतदारसंघ हे साडेतीन लाख ते चार लाख लोकसंख्येमागे एक असे आहेत, परंतु इतक्या मोठ्या लोकसंख्येला एक आमदार देण्यापेक्षा अडीच लाख लोकसंख्येला एक आमदार असे सूत्र नव्याने ठरत असून, हे सूत्र वास्तवात आल्यास जिल्ह्यात 16 आणि तीन लाख लोकसंख्येला एक आमदार, असे सूत्र ठरवल्यास 13 आमदार संख्या होईल.
नेत्यांकडून अंदाज घेणे सुरू
जिल्ह्यातील विद्यमान आमदार, खासदार आणि नेत्यांनी या संभाव्य बदलाचा अंदाज घेण्यास सुरुवात केली असून, काहींनी निवडणूक आयोगातील निवृत्त अधिकार्यांशीही संपर्क साधला आहे. त्यांच्याकडून आपल्या मतदारसंघाचे संभाव्य चित्र काय असू शकते, याचा अंदाज या नेत्यांना आल्याची चर्चा आहे. त्यामुळे काही विभागांकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्याची पद्धत या नेत्यांनी अवलंबली आहे.
12 लाख लोकसंख्येला एक खासदार
जिल्ह्याची लोकसंख्या 38 लाखांहून अधिक असून, 12 लाख लोकसंख्येला एक खासदार असे नवे सूत्र असण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला लोकसभेचा तिसरा खासदार मिळण्याची शक्यता वाढली आहे.
2011 नुसार जिल्ह्यातील तालुकावार लोकसंख्या
हातकणंगले 4,94,747
करवीर 4,88,477
शिरोळ 3,20,133
पन्हाळा 2,56,296
कागल 2,30,072
गडहिंग्लज 1,98,549
राधानगरी 1,99,713
चंदगड 1,87,220
शाहूवाडी 1,80322
भुदरगड 1,50,368
आजरा 1,20,265
गगनबावडा 35,772

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.