मुंबई : manoj jarange : मनोज जरांगेंचा आदेश सुटला, विधानसभेला फडणवीसांची जिरवा; : आचारसंहिता लागायच्या आधी मराठ्यांना आरक्षण मिळेल अशी आशा होती, पण देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचा कार्यक्रम केला. आता विधानसभेत त्यांची जिरवायचीच, लोकसभेपेक्षा जास्त ताकद दाखवा असं आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला केलं. आता कुणाच्या जागा वाढवायच्या आणि कुणाच्या कमी करायच्या हे आम्ही ठरवू असा इशाराही मनोज जरांगे यांनी दिला. विधानसभेच्या निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर मनोज जरांगे यांनी हे आवाहन केलं.
manoj jarange : मनोज जरांगेंचा आदेश सुटला, विधानसभेला फडणवीसांची जिरवा;
मनोज जरांगे म्हणाले की, मराठ्यांना बेदखल करण्याचं काम फडणवीस यांनी केलं. कष्टकरी , कामगार, शेतकरी यांना जी अपेक्षा होती ती आशा सरकारने संपवलीय. मराठ्यांचं आयुष्य बेचिराख करण्याचं काम फडणवीस यांनी केलं. फडणवीसांनी सत्तेचा वापर मराठ्यांच्या विरोधात केला.
मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही हेच फडणवीसांचे प्रयत्न
देवेंद्र फडणवीसांवर आरोप करताना मनोज जरांगे म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळू द्यायचं नाही यासाठीच फडणवीसांनी सुरुवातीपासून खेळी केली. या मराठ्यांची पोरं आरक्षणासापासून, शिक्षणापासून, नोकरीपासून वंचित राहीले पाहिजेत अशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस मराठ्यांसोबत वागले. सामाजिक चळवळीत वैचारिक मतभेद असू शकतात पण मराठा समाज एक ठेवायचा नाही, मराठा समाजाच्या पोरांना आरक्षण न देता भिकारी ठेवण्याचं काम फडणवीस यांनी केलं. देवेंद्र फडणवीस द्वेषाने वागले. मराठ्यांच्या शेपटावर त्यांनी पाय ठेवला.
मराठ्यांना सोडून हे सत्तेत येणार नाहीत, 100 टक्के मतदान करा
मराठ्यांना फडणवीस यांची खुन्नस कळाली होती. आम्ही मराठ्यांना बाजूला ठेऊन सत्तेवर बसू असं देवेंद्र फडणवीसांनी ठरवलंय. देवेंद्र फडणवीस आम्हाला आरक्षण देतील असा आम्ही विश्वास ठेवला होता. शेवटी त्यांनी बरबटलेले विचार त्यांनी बाहेर आणलेच. मराठ्यांना बाजूला ठेवण्यासाठी फडणवीस यांनी डाव रचले. त्यांच्या 17 पिढ्या आल्या तरी मराठ्यांना बाजूला ठेऊन ते सत्तेवर कधीच येऊ शकत नाही. इथे सर्व जातींचा प्रश्न आहे. हात जोडून सर्व समाजाला विनंती करतो, आपल्या समाजाला बळ द्यायचं काम करा. यावेळी मराठ्यांचे 100 टक्के मतदान झाले पाहिजे. मराठ्यांचे एकही मतदान घरी राहता कामा नये.
आपल्या प्रतिष्ठेची वेळ आलीय
सरकारने जाणूनबुजून आपल्याला बेदखल करत आपला अपमान केला आहे असा आरोप मनोज जरांगे यांनी केला. ते म्हणाले की, आपण आता पक्कं ठरवायचं, त्यांची जिरवायचीच. आता लोकसभेपेक्षा जास्त ताकत दाखवा. आपल्या प्रतिष्ठेची वेळ आलीय. अशी लाट पुन्हा येणार नाही , यावेळेस ताकत दाखवावी लागेल.देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांचा कार्यक्रम लावला. ज्या मराठ्यांनी 106 आमदार दिले, त्याच मराठ्यांवर तो उलटला. यावेळी मतं विकू देऊ नका. ते योग्य ठिकाणी वापरा.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



