पक्ष, नेत्यांला बाजुला ठेवून जातीसाठी एकजूट दाखवा ः मनोज जरांगे-पाटील, सांगलीत हजारो बांधवांच्या उपस्थितीत सभा
जनप्रवास । सांगली
MANOJ JARANJE PATIL : आरक्षण द्या, अन्यथा सत्तेत घुसून घेवू : सरकार आरक्षण द्यायला तयार नाही, मराठ्यांना रग आणि धग दाखवायची वेळ आली आहे. आत्तापर्यंत आपण पक्ष आणि नेत्याला मोठे केले. तुमची लढाई तुम्हांला अंगावर घ्यावी लागेल. आरक्षण न दिल्यास 288 आमदार तुमचे नाहीत. ते पाडायचे आहेत. समाजाचे एकास-एक उमेदवार देवून 288 आमदार पाडू, त्यासाठी पक्ष आणि नेत्याला बाजुला ठेवून जातीसाठी एकजूट दाखवा. तत्पूर्वी आरक्षण द्या अन्यथा सत्तेत घुसून घेवू, असा इशारा मराठा संघर्ष योद्धे मनोज जरांगे-पाटील यांनी गुरुवारी सांगलीत दिली. तत्पूर्वी 29 ऑगष्टला आंतरवाली सराटीला यायचे असून देशातील सर्वात मोठी बैठक होईल, त्याला उपस्थित राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
MANOJ JARANJE PATIL : आरक्षण द्या, अन्यथा सत्तेत घुसून घेवू
येथील राम मंदिर चौकात मराठा आरक्षण जनजागृतीसाठी मराठा योद्धे जरांगे-पाटील यांची जाहीर सभा पार पडली. तत्पूर्वी विश्रामबाग ते राम मंदिर चौक अशी शांतता रॅली काढण्यात आली. या शांतता रॅली आणि सभेला जिल्ह्यातील मराठा समाजाचे हजारो बांधव सहभागी झाले होते.
जरांगे-पाटील म्हणाले, अर्धे पक्षच बंद करायची वेळ आली आहे. आरक्षण मिळत नाही तो पर्यंत मागे हटणार नाही. आराक्षण म्हणजे यांच्या बापाची जहांगीरी नाही. माझा संघर्ष मराठा समाजातील लेकरे मोठे करण्यासाठी आहे. यांना फक्त त्यांचे पक्ष आणि त्यांची मुले मोठी करायची आहेत. त्यांनी पक्ष मोठे केले, मुले मोठी केली मात्र आरक्षणाबाबत कोणी बोलत नाही. फक्त आरक्षण मिळेपर्यंत राजकीय पक्षातील लोकांनी मराठा समाजाच्या बाजूने बोलावे. आम्हाला राजकारणात जायचे नाही. जर आरक्षण दिले नाही तर आम्हाला पर्याय नाही. पण ते त्यांच्या छाताडावर बसून आम्ही आरक्षण घेऊ.
विजयाचा टिळा जावून मागे येवू
जागे राहा आरक्षण घेतल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. मागे सरकायच ंनाही. क्षत्रियांचा धर्म आहे. विजय झाल्याशिवाय मागे फिरायचे नाही. एकदा लढाई जिंकायची आणि विजयाचा टिळा लावून मागे यायचं. पुढच्याची जिरवल्याशिवाय आपण मागे फिरायचे नाही. आता या नेत्यांची मुले नाहीत तर सामान्य मराठा कुटुंबातील मुलगा आमदार होईल.
उमेदवारी दिली तर विरोध करु नका
जीव गेला तर चालेल पण आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही. लढाई आपल्याला जिंकायची आहे. पक्ष आणि नेत्याला साथ देवू नका. त्यांचा नाद सोडून साथ द्या. आता गाफील राहू नका उमेदवारी द्यायची ठरली तरी त्याला विरोध करायचा नाही. त्याच्या पाठीशी ठाम उभे रहा, असे आवाहन जरांगे-पाटील यांनी केले. मतदान दिवशी कोणीही घरात बसायचे नाही. तीर्थयात्रा देव दर्शनाला कोणी जायचे नाही. बोगस मतदान यादीतून बाहेर काढायचं. मराठ्यांना राजकारणाचा नाद लय बेक्कार. कोणही उठतंय आणि उमेदवारी मागतंय. एका गाडीतून चार चार जण माझ्याकडे येतात आणि उमेदवारी मागतात. हे बरोबर नसल्याचे त्यांनी सांगितले.
भुजबळ बोलतात, आपलेच कुणी बोलत
एक छगन भुजबळ ने विधानसभेत आवाज उठवला मात्र आपले कोणी आवाज काढला नाही. आपला बोलणार हक्काचा माणूस नाही. रस्त्यावर मी लढायला आहे. तुम्ही जर विधानसभेत 50 जरी गेले तर त्यांचा कार्यक्रम होईल. त्यामुळे सगळ्या पक्षातील मराठा लोकांनी एकदा ठरवा. आरक्षण द्या आणि तुम्हाला कोणत्या पक्षात जायचे ते जावा. तुम्ही भावनिक होऊ नका. छगन भुजबळला मी पुरून उरेन, देवेंद्र फडणवीस भुजबळना ज्या-ज्या गावात घेऊन जाईल. तेथील आमदार आपण पाडायचा. सांगलीत खूप आग आहे. विधानसभेला यांचा बुक्का पाडा, असे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी केले.
सांगलीकरांची निष्ठा अन् कडवटपणा सिद्ध
आरक्षणाच्या लढाईसाठी गेल्या अकरा महिन्यांपासून राज्यात पिरतोय. सांगली जिल्हा संख्येत तोलून नाही. सांगलीकरांनी निष्ठा आणि कडवटपणा सिद्ध केला आहे. भर पावसात महिला आणि समाजबांधव माझी वाट पाहत उभे होते. हे मी पहिल्यांदाच पाहिले, असल्याचे जरांगे-पाटील यांनी सांगितले.
तर त्यांना मुंबईतून बाहेर यावे लागेल
आता आपण मुंबईला गेलो तर त्यांना मुंबईतून बाहेर यावे लागेल. तुमच्यात काही मतभेद असतील तर ते मिटवा. मराठा-मराठ्यांत भांडत बसू नका. ज्यांना आरक्षण आहे ते ताकदीने भांडताहेत. मराठ्यांनी व्यसनापासून लांब राहून जगाच्या पाठीवर प्रगत असणारी जात मराठ्यांची असल्याचे दाखवून देण्याचे आवाहन मनोज जरांगे-पाटील यांनी केले.
महापुरुषांना अभिवादन
मनोज जरांगे यांचे दुपारी मिरजेत आगमन झाले. तेथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून त्यांची रॅली सुरु झाली. त्यानंतर विश्रामबाग येथील क्रांतीसिंह नाना पाटील पुतळा, पुष्पराज चौकातील कर्मवीर भाऊराव पाटील आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास मनोज जरांगे पाटील यांनी पुष्पहार अर्पण केले.
शांतता रॅलीत हजारो बांधव
मराठा आरक्षणासाठी विश्रामबाग ते राम मंदिर मराठा क्रांती मोर्चा चौकात शांतता रॅली काढण्यात आली. विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केल्यानंतर रॅली सुरु झाली. मराठा संघर्ष योद्धे मनोज जरांगे-पाटील हे गाडीत उभे राहून अभिवादन करीत होते. त्यांच्यासोबत हजारो मराठा बांधव चालत राम मंदिर चौकात पोहोचले. त्यानंतर रॅलीचे रुपांतर सभेत झाले. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी, संयोजकासह हजारो मराठा बांधव उपस्थित होते.
घोषणांनी परिसर दणाणला
मी मराठा लिहिलेले भगव्या टोप्या घालून मराठा बांधव आणि भगिनी उपस्थित होत्या. दुपारपासूनच राम मंदिर चौकात कार्यकर्ते गोळा होण्यास सुरुवात झाली होती. एक मराठा लाख मराठा या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
सांगली, कोल्हापूरातील पूरग्रस्त शेतकर्यांना भरपाई द्या
सांगली आणि कोल्हापूरमध्ये पूर आल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी विनंती मनोज जरांगे-पाटील यांनी मुख्यमंत्री आणि सरकारला जाहीर सभेतून केली. शेतकर्यांचा बांध फुटू देऊ नका. आंदोलन संपू दे अलमट्टी धरणावर जाऊ आपण. पाणी साठवताय ते आणि आमच्या डोक्याला ताप झालाय. महाराष्ट्रात आमची फजिती झाली. मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करताहेत. पश्चिम महाराष्ट्रात पूर येतोय. आता अलमट्टीकडे आम्हाला बघायचंय. मी धरणाचा विषय काढला की आता माझ्याकडे जलतज्ञ येणारच असेही त्यांनी सांगितले.
नशिबाने सरकार आले तर सर्वच समाजाला न्याय
जागे रहा, आता आरक्षण घेतल्याशिवाय पर्याय नाही. निवडणुकीत उभे रहायचे ठरवले तर ताकदीने निवडून द्या. पाडायचे ठरले तर पुढचे 10-15 वर्षे उभाच राहिला नसला पाहिजे, अशी व्यवस्था करा. जर नशिबाने सरकार आलेच तर मराठा समाजासह दलित, धनगर, मुस्लिम समाजाचे प्रश्नही मार्गी लावू, अशी ग्वाही मराठा योद्धे मनोज जरांगे-पाटील यांनी दिली.
मनोज जरांगे-पाटील म्हणाले….
* जीव गेला तरी आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही.
* आरक्षणाची लढाई तुम्हांला अंगावर घ्यावी लागेल.
* पक्ष अन् नेत्यांचा नाद सोडा.
* तर त्यांना मुंबईतून बाहेर यावे लागेल.
* विजयाचा टिळा लावून मागे येवू
* उमेदवारी दिली तर विरोध करु नका
* भुजबळ बोलतात, आपले कुणीच बोलत नाही
* मराठ्यांनो, व्यवनापासून दूर जावा.
* भर पावसात सांगलीकरांची निष्ठा अन् कडवटपणा सिद्ध
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.