जनप्रवास सांगली
जिल्ह्याच्या औद्योगिकरणाला गती मिळण्यासाठी रांजणी (ता.कवठेमहांकाळ) येथे ड्रायपोर्ट उभारणीचा प्रस्ताव गेली नऊ वर्षे गाजत होता, मात्र हा प्रस्ताव बारगळल्यानंतर सलगरे (ता.मिरज) येथे लॉजिस्टिक पार्कचे नवे गाजर जिल्ह्याला दाखविण्यात आले, मात्र हे केवळ आश्वासनच ठरले. देशात उभारण्यात येणार्या 35 लॉजिस्टिक पार्कची माहिती नॅशनल हायवेज लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेडने दिली आहे. त्यामध्ये सलगरेचा समावेश नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे रांजणी ड्रायपोर्टनंतर सलगरे येथील लॉजिस्टिक पार्कचा पोपट आता मेला आहे.
लॉजिस्टिक पार्क म्हणजे काय?
लॉजिस्टिक पार्कची प्रामुख्याने औद्योगिक वसाहतीमध्ये गरज असते. पार्कमध्ये फ्रेट स्टेशन, साठवणूक, वितरण, उत्पादनांचे ग्रेडिंग, कार्गो अशा सुविधा मिळतात. कंपन्यांची उत्पादने ठेवण्यासाठी या पार्कचा उपयोग होतो. लॉजिस्टिक हबमध्ये ट्रक टर्मिनल्स, कूलिंग, प्लॅन्ट, वर्कशॉप, होलसेल मॉल चेन तयार केली जाईल. त्यामुळे शहरात होणारी वाहतूक आपसूक कमी होईल. यामुळे शहरातील वाहतूक आणि शहराचे प्रदूषणही कमी होण्यास मदत होते.
सांगली जिल्ह्यात द्राक्ष, हळद आदींची मोठी बाजारपेठ आहे. यासाठी औद्योगिकरणाचा वेग वाढविणे आवश्यक आहे. त्यामुळे खासदार संजयकाका पाटील यांनी रांजणी (ता.कवठेमहांकाळ) येथे ड्रायपोर्ट उभारणीचा प्रस्ताव केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना दिला होता. ना.गडकरी यांनी देखील ड्रायपोर्टला मंजुरी दिल्याचे आश्वासन सांगलीत दिले होते. त्यामुळे सांगलीकरांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. सांगलीचे सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर यांनी याबाबत जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टकडे माहिती अधिकार कायद्यानुसार माहिती मागविली होती. त्यावेळी महाराष्ट्रात सध्या गरजेहून अधिक ड्रायपोर्ट असल्याचे स्पष्ट झाले.
हेही वाचा
दहा वर्षांत जिल्ह्यात नवीन काय?
विकासाचे पूल ठरत आहेत महापुराला कारणीभूत
यामुळे नवीन प्रकल्पाला मान्यता मिळण्याचा प्रश्नच राहत नाही. तसेच महाराष्ट्र रेड झोनमध्ये आहे, अशी माहिती जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने माहिती अधिकारात दिली आहे. त्यामुळे रांजणी ड्रायपोर्टचा विषय बारगळला होता. त्यानंतर खासदार संजयकाका पाटील यांनी सलगरे (ता.मिरज) येथे लॉजिस्टिक पार्क उभारण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. लॉजिस्टिक पार्क उभारल्यास शेतकर्यांच्या मालाला मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते, तसेच वाहतूक व्यवस्था गतिमान झाल्यामुळे चांगल्या दर्जाचा व वेळेत शेतीमाल बाजारपेठेत जाऊ शकतो. त्यामुळे लॉजिस्टिक पार्कमुळे जिल्ह्याच्या विकासाला गती येणार होती.
त्यासाठी प्रस्तावित पुणे-बेंगलोर ग्रीन फील्ड एक्स्प्रेस वे ला लागून 350 एकर एवढी सरकारी जमीन असून सलगरे (ता.मिरज) येथे मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्कची जागा निश्चित करण्यात आली होती.सलगरे येथील म्हैसाळ प्रकल्पाच्या पंपगृहाशेजारील जागा सूचविण्यात आली होती. मागासवर्गीय सोसायटीची सुमारे तीनशे एकरहून अधिक जागा लॉजिस्टिक पार्कला देण्याचे निश्चित झाले होते. औद्योगिक विकास महामंडळाने देखील या जागेला हिरवा कंदील दाखविला होता.
जागा घेण्याच्या हालचालीदेखील सुरू झाल्या होत्या. केंद्र शासनाकडून मंजुरी देखील मिळाल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे जानराववाडी (ता.मिरज) येथील दत्ताजीराव कुंडले यांनी नॅशनल हाय वे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेडला पत्र पाठवून सलगरे लॉजिस्टिक पार्क प्रस्तावित आहे का? अशी माहिती अधिकाराखाली माहिती मागविली होती. त्यानुसार कुंडले यांना पत्र प्राप्त झाले आहे.
त्यामध्ये म्हटले आहे की, नॅशनल हाईवेज लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट लिमिटेड व कॅबिनेट कमिटी ऑफ इकॉनॉमिक्स ऑफिसर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी 35 ठिकाणी लॉजिस्टिक पार्क डेव्हलप करण्याचे ठरले आहे. त्यामध्ये सलगरे अथवा सांगली जिल्ह्यातील कोणत्याही जागेचा समावेश नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे सलगरे येथे लॉजिस्टिक पार्क उभारणीचे सांगली जिल्ह्यावासियांचे स्वप्न पुन्हा भंगले आहे.
खासदारांकडून नुसताच कांगावा..!
रांजणीतील ड्रायपोर्टचा प्रस्ताव रद्द झाल्यामुळे सलगरे येथे लॉजिस्टिक पार्क उभारण्याचे आश्वासन जिल्हावासियांना मिळाले होते. खासदारांनी यासंदर्भात पाठपुरावा आणि मंजुरीचा डांगोरा पिटला पण आम्ही नॅशनल हायवेज लॉजिस्टिक्स मॅनेजमेंट लिमिटेडशी पत्रव्यवहार करून लॉजिस्टिक पार्कचे काय झाले? असा पत्रव्यवहार माहिती अधिकार कायद्याखाली केला. यात सलगरेमध्ये असा कोणताही प्रस्ताव नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे. त्यामुळे लॉजिस्टिक पार्कचे स्वप्न देखील भंगले असून खासदारांचा नुसताच कांगावा असल्याचे सामजिक कार्यकर्ते सतीश साखळकर व दत्ताजीराव कुंडले यांनी सांगितले.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



