rajkiyalive

sangli congress news : सांगलीत काँग्रेसचा हात निराधार

sangli congress news : सांगलीत काँग्रेसचा हात निराधार : लोकसभा निवडणुकीत काँगे्रसला चांगले यश मिळाले, पण विधानसभा निवडणुकीत हे यश टिकवता आले नाही. पलूस-कडेगावची एकमेव जागा आ. विश्वजीत कदम यांनी राखली. पण जिल्ह्यात इतर ठिकाणी दारूण पराभव झाला. आता खासदार विशाल पाटील यांची ‘अपक्ष’ची भूमीका, आ. विश्वजीत कदम यांचे केवळ मतदारसंघापुरते मर्यादीत राजकारण, पृथ्वीराज पाटील व जयश्रीताई पाटील यांची पक्ष सोडण्याची तयारी व जिल्हाध्यक्ष विक्रमसिंह सावंत अज्ञातवासी असल्याने काँग्रेसचा हात जिल्ह्यात निराधार होत चालला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पक्षात शांतता पसरली आहे. जिल्ह्यातील पाचही नेत्यांनी एकीचे दर्शन न दिल्यास पक्षाचे कार्यकर्ते शोधण्याची वेळ येईल.

sangli congress news : सांगलीत काँग्रेसचा हात निराधार

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी नेते सौरभैर

काही काळी सांगली जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र स्व. प्रकाशबापू पाटील, स्व. डॉ. पतंगराव कदम, स्व. मदनभाऊ पाटील यांच्या निधनानंतर काँग्रेसला मोठी पोकळी निर्माण झाली. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात पराभवाचा धक्का काँग्रेसला सहन करावा लागला. त्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या. महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या. या निवडणुकीत देखील काँग्रेसला अपयश आले. त्यामुळे काँग्रेसची ताकद घटत गेली. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र काँग्रेसने कमबॅक केले. महायुतीचा पराभव करण्यासाठी काँग्रेस पक्षाबरोबर भाजपमधील नाराज व इतर काही पक्षातील लोकांनी अपक्ष उमेदवार खा. विशाल पाटील यांना पाठिंबा दिला होता.

आता खा. विशाल पाटील यांची भूमीका बदलत चालली आहे.

त्यामुळे या निवडणुकीत त्यांचा विजय सोपा झाला. आणि दहा वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेली काँग्रेसची जागा खेचून आणली. पण आता खा. विशाल पाटील यांची भूमीका बदलत चालली आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी खा. विशाल पाटील यांना भाजपच प्रवेशाची ऑफर दिली होती. खा. पाटील यांनी भाजपची ही ऑफर नाकारली पण म अपक्ष खासदार आहे. भाजपला आवश्यक त्या ठिकाणी मदत करू, असे विधान केले होते. यावरून काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत. जिल्ह्यात काँग्रेसचा एक खासदार आणि एक आमदार आहे. यात खा. विशाल पाटील यांनी भाजपशी जवळीक साधणारे विधान केल्याने काँग्रेसमध्ये शांतता पसरली आहे.

काँग्रेसचे जिल्हा नेते आ. विश्वजीत कदम हे विधानसभेपासून शांतच आहेत.

तर दुसरीकडे काँग्रेसचे जिल्हा नेते आ. विश्वजीत कदम हे विधानसभेपासून शांतच आहेत. जिल्ह्यात भाजपची पक्ष नोंदणी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची देखील नोंदणी सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा जिल्हा मेळावा नुकताच पार पडला. मात्र काँग्रेसमध्ये शांतता आहे. जिल्हा नेते आ. विश्वजीत कदम यांना भाजप प्रवेशाच्या अनेक ऑफर आल्या, त्यांनी ऑफर नाकारल्या. पण जिल्ह्यात काँग्रेसला बळ देण्यासाठी त्यांच्याकडून मेळावा, बैठका झाल्या नाहीत. गेल्या चार महिन्यापासून पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ वगळता त्यांनी जिल्ह्यातील इतर मतदारसंघात लक्ष घातले नाही. त्यामुळे दुसर्‍या फळीतील नेते, कार्यकर्ते पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.

पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आ. विक्रमसिंह सावंत देखील विधानसभा पराभवानंतर पक्षापासून दुरावल्याचे चित्र आहे.

पक्ष वाढीच्या दृष्टीने त्यांनी जिल्ह्यात प्रयत्न केले नाहीत. काँग्रेस कमिटीत बैठका देखील झाल्या नाहीत. निवडणुका तोंडावर असताना ते गप्प आहेत. तर सांगली विधानसभा मतदारसंघातील शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जयश्रीताई पाटील पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा जोरात आहेत. सांगली विधानसभा मतदारसंघात उमेदवारीवरून शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांच्यात वाद झाला होता. पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर जयश्रीताई पाटील यांनी बंडखोरी केली. जयश्री पाटील यांना निलंबित करण्यात आले. त्यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात चाचपणी केली. मात्र त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

sangli-congress-news-congresss-hand-is-baseless-in-sangli

तर दुसरीकडे पृथ्वीराज पाटील देखील काँग्रेसमध्ये म्हणावे तसे अ‍ॅक्टिव्ह होताना दिसत नाहीत. त्यांच्यावर भाजपकडून देखील गळ टाकला जात आहे. आ. गोपीचंद पडळकर व आ. सत्यजीत देशमुख यांनी पृथ्वीराज पाटील यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रात काँग्रेस पक्षाची ताकद कमी होत चालली आहे. पाचही नेत्यांची जिल्ह्यात एकी नसल्याने काँग्रेसचा हात निराधार होत चालला आहे.

लोकसभा पॅटर्न राबवावा लागेल…

जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला पुन्हा गतवैभव प्राप्त करून द्यायचे असेल तर आ. विश्वजीत कदम, खा. विशाल पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष, माजी आ. विक्रमसिंह सावंत, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री पाटील यांनी लोकसभेप्रमाणे पुन्हा एकीचा पॅटर्न राबवावा लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत या नेत्यांची एकी विस्कटली, त्याचा फटका पक्षाला सहन करावा लागला. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तर या नेत्यांनी लोकसभा पॅटर्न राबवावा, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांतून होऊ लागली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज