राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येण्यासाठी एक-एक आमदार महत्वाचा आहे. सांगलीत झालेली बंडखोरी दुर्दैवी आहे. पण जयश्रीताई भोळ्या आहेत. त्यांना कुणीतरी फितवले असल्याने त्यांनी बंडखोरी केली आहे. पण ज्या दिवशी मला त्याचे नाव कळेल, त्या दिवशी त्याची खैर नाही, असा इशारा काँग्रेसचे युवा नेते आ. विश्वजीत कदम यांनी दिला.
माझ्यावर डॉ. पतंगराव कदम यांचे संस्कार आहेत. आत एक आणि बाहेर एक असे आमच्यात नसते, असा देखील त्यांनी स्पष्ट केले. सांगली विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ आ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते मारूती चौकात झाला. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करून मारूती मंदिरात प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी आयोजित केलेल्या सभेत आ. विश्वजीत कदम बोलत होते. सभेला जयकिसान आंदोलनाचे प्रणेते योगेंद्र यादव, काँग्रेसचे निरीक्षक आमदार बी. आर. पाटील, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, शिवसेना (उबाठा) गटाचे शंभूराज काटकर, कॉ. उमेश देशमुख, सुखदेवसिंग, शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा संगीता हारगे आदी उपस्थित होते.
आ. विश्वजीत कदम म्हणाले, सांगली जिल्ह्यात संकटातून काँग्रेस पुन्हा उभी करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. लोकसभेला गोंधळ झाला, पुन्हा विधानसभेला तेच. माझ्याकडं जादूची कांडी आहे का? लोकसभा एकाला, विधान परिषद एकाला, विधानसभा एकाला सगळं ठरलं होतं. राहूल गांधींनी मला तो शब्द दिला होता. मला वाटलं असतं तर मी जत, पलूस कुठेही विधान परिषद देऊ शकलो असतो, मात्र मला सांगलीचा प्रश्न महत्वाचा होता. एक पाऊल मागे येऊन निर्णय घेणं गरजेचं होतं. पतंगरावसाहेबांना दोनवेळा उमेदवारी मिळाली नव्हती. वाट पहावी लागते,
सांगलीत मात्र तसे झाले नाही. विशाल पाटलांची कोंडी झाली, जयश्रीताईंवर कसला दबाव होता माहिती नाही. मी तासन् तास बसून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. हात जोडून विनंती केली. आपणाला भाजपला हरवायचं आहे. महाराष्ट्राचे अनेक प्रश्न आहेत, ज्यासाठी महाविकास आघाडीची सत्ता येणं गरजेचं आहे. त्यासाठी पृथ्वीराज पाटील यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, असे आवाहन आ. विश्वजीत कदम यांनी केले
पृथ्वीराज पाटील म्हणाले, ‘‘सांगलीच्या आखाड्यात एक भाजपचा आणि दुसरा भाजप पुरस्कृत उमेदवार आहे. एक भाजपची बी टीम आहे. मी खासदार विशाल पाटलांवर नाराज आहे. जेंव्हा त्यांच्या कुटुंबातील सदस्याची निवडणूक असते तेंव्हा त्यांना काँग्रेस एकसंध हवी असते, माझ्यासारख्या कार्यकर्त्याची वेळ येते तेंव्हा पक्षात फूट कशी पडते? ही फूट देवेंद्र फडणवीस यांनी ठरवून पाडली. साम, दाम, दंड, भेद वापरला. त्यांनी गुंड्या फिरवल्या म्हणून गाडगीळ पुन्हा मैदानात आले. अन्यथा, थेट एकास एक लढाईतून त्यांनी पत्र लिहून कधीच पळ काढला होता.
मी पळणार नाही, मी सांगलीच्या मातीत जन्मलो, वाढलो. याच मातीत शेवटचा श्वास घेणार. तोवर सांगलीसाठी झटत राहणार. तर जयश्रीताई मोठ्या बहिणीसारख्या आहेत. मी विधानसभा जिंकल्यानंतर विश्वजीत यांच्या सोबत दिल्लीत जाईन तेंव्हा ताईंसाठी हट्टून विधान परिषद मागेन. जयश्रीताई तुमसे बैर नहीं, सुधीरदादा तुम्ही खैर नही. या महाभारतात माझी अवस्था अर्जुनासारखी आहे. या लढाईत विश्वजीत कदम माझ्यासाठी श्रीकृष्ण आहे, ते माझ्या रथाचे सारथ्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी नगरसेवक मंगेश चव्हाण, दिलीप पाटील, अभिजित भोसले, हरिदास पाटील, संगीता हारगे, सचिन जगदाळे, मयूर पाटील, शेरू सौदागर, आशा पाटील, कविता बोंद्रे, उमेश देशमुख आदी उपस्थित होते.
महापालिकेत राष्ट्रवादीने फसवले पण आता फसणार नाही: आ. कदम
जिल्ह्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती बँक, बाजार समितीच्या निवडणुका लढविल्या. महापालिकेत महापौरपदाची निवडणूक देखील लढलो. पण या निवडणुकीत आम्ही फसलो गेले आहे. पण आता परत फसणार नाही, असा थेट इशारा आ. विश्वजीत कदम यांनी व्यासपीठावर बसलेल्या संजय बजाज यांना दिला.
माझी जन्मभूमी व कर्मभूमी सांगलीच: पृथ्वीराज पाटील
विरोधकांकडे टीका करण्यासाठी कोणताच मुद्दा नाही. त्यामुळे मी कर्नाटकचा असल्याचा अपप्रचार केला जात आहे. पण सांगली माझी जन्मभूमी व कर्मभूमी आहे. माझा जन्म सांगलीत झाला, शिक्षण देखील सांगलीत झाले आहे. सांगलीच्या मातीसाठी झगडतोय आणि शेवटच्या श्वासापर्यंत सांगलीसाठी लढणार असल्याचे पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.
मुन्ना कुरणे यांची घरवापसी…
काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष मुन्ना कुरणे यांनी काँग्रेस अंतर्गत झालेल्या वादामुळे काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता. भाजप अल्पसंख्याक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहत होता. मात्र ते पुन्हा स्वगृही काँग्रेसमध्ये परतले. आ. विश्वजीत कदम यांनी त्यांचे स्वागत केले. रक्तात, अंगात माझ्या काँग्रेस होती. भाजपमध्ये जायला नको होते, अशी खंत मुन्ना कुरणे यांनी व्यक्त केली.
Related