सांगली : sangli crime news : कॉलेजला निघालेल्या पत्नीवर कोयत्याने केले वार : संशयित पती झाला पसार : कौटुंबिक वादातून कृत्य. : शहरातील अतिशय गजबजलेल्या कॉलेज कॉर्नर परिसरात सकाळी कौटुंबिक वादातून नवविवाहितेवर पतीने कोयत्याने वार करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली. परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमी मुलीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. प्रांजळ राजेंद्र काळे (वय 21 रा.वासूबे) असे हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचे नाव आहे.
sangli crime news : कॉलेजला निघालेल्या पत्नीवर कोयत्याने केले वार : संशयित पती झाला पसार : कौटुंबिक वादातून कृत्य.
हल्ल्यानंतर संशयित पती संग्राम संजय शिंदे (वय 25 रा. सावंतपूरवसाहत, पलूस) याने घटनास्थळी कोयता टाकून पलायन केले. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी धाव घेतली होती. या प्रकरणी प्रांजल काळे हिने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पती, सासू, सासर्यांसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित हल्लेखोर पती संग्राम शिंदे याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. भर दिवस घासलेल्या या घटनेनं परिसरात खळबळ उडाली होती.
याबाबत अधिक माहिती अशी कि, हल्लेखोर संग्राम शिंदे हा ट्रकचालक म्हणून काम करतो. तर प्राजंल ही सांगलीतील कॉलेजमध्ये बी कॉमच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. 3 डिसेंबर 2023 रोजी वासुंबे येथील प्रांजल काळे यांच्याशी त्याचा प्रेमविवाह झाला होता. विवाहानंतर दोन ते तीन महिन्यातच दोघात वाद सुरू झाला.
त्यातून त्याने प्रांजलला त्रास देण्यास सुरूवात केली. त्याला कंटाळून प्रांजल माहेरी आली होती. गेल्या तीन महिन्यापासून ती माहेरीच होती. तरीही तो तिला त्रास देतच होता. प्रांजलच्या नातेवाईकांनी घटस्फोटासाठी तयारी चालविली होती. ही बाब कळताच संग्रामने तिला धमकीही दिली होती. याबाबत प्राजंलने तासगाव पोलिसांत संग्रामविरोधात दोनदा तक्रारही दाखल केली. तासगाव पोलिसांनी त्याला समज दिली होती. बुधवारी सकाळी आठ वाजता प्रांजल बसने सांगलीत कॉलेजसाठी आली.
कॉलेजच्या प्रवेशद्वाराजवळच संग्राम दुचाकी घेऊन तिची वाट पाहत होता. बसमधून उतरून ती कॉलेजमध्ये जात असताना संग्रामने तिला प्रवेशद्वारावरच अडवले. तिला परत घरी येण्यासाठी तो दबाव टाकू लागला. पण तिने नकार दिला. यातून दोघांत वादावादी झाली. यावेळी संग्रामने पाठीमागे लपवलेला कोयता काढून तिच्या डाव्या हातावर वार केला. हा वार हातावर अगदी खोलवर गेला. ती आरडाओरडा करू लागली.
याचवेळी एक रिक्षा चालक अमित मुळके याने ही घटना पाहिले आणि तो मदतीला धावला. कॉलेजचे तरुण, नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. लोकांची गर्दी होताच हल्लेखोर संग्रामने कोयता व दुचाकी सोडून पलायन केले. या हल्ल्यानंतर जखमी प्रांजलला रिक्षा चालकाने शासकीय रुग्णालयात दाखल केले.
हातावरील वार गंभीर असल्याने तिला खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. खूनी हल्ल्याची माहिती मिळतात अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर, पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना केल्या. पोलिसांनी पंचनामा करून कोयता व दुचाकी जप्त केली. हल्लेखोर संग्रामच्या शोधासाठी पोलिसांची पथके पलूस, तासगावकडे रवाना झाली होती. रात्री उशिरा प्राजंल काळे हिने विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली. हल्लेखोर संग्राम पसार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
हल्ल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल…
प्रांजल हिने दिलेल्या फिर्यादीनुसार या हल्ल्यातील मुख्य संशयित पती संग्राम शिंदे याच्यासह चौघांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यात प्रांजलचे सासू, सासरे आणि दीर यांचाही समावेश आहे. संग्राम याच्याविरोधात खूनाचा प्रयत्न व अॅट्रॉसिटी कलम तर सासू, सासरे, दीराविरोधात अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हे दाखल केल्याचे पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी सांगितले. हल्ल्यानंतर संग्राम हा माधवनगर रस्त्याच्या दिशेने पळून गेला. पोलिसांनी त्याच्या कुटूंबियांची चौकशी सुरू केली. तो ट्रक घेऊन पसार झाल्याचे समजते. त्याच्या शोधासाठी विश्रामबाग पोलिस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक नियुक्त करण्यात आले आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.