सापडल्या केवळ 132 , दररोज दोन ते तीन मोटारसायकल चोरीच्या घटना : नागरिक हैराण.
sangli crime news : सांगलीसह जिल्ह्यात दुचाकी चोरीचा फंडा जोमात : अकरा महिन्यात 550 गाड्यांची चोरी : सांगलीसह जिल्ह्याच्या कोणत्याही परिसरात दुचाकी चोरी झाली नाही असे नाहीच. घरासमोर, पार्किंग मध्ये, बाजारात, रुग्णालयाच्या आवारात लावलेल्या मोटारसायकल चोरटे हातोहात लंपास करत आहेत. दररोज दोन चार दुचाकी वाहने चोरीला जात असून याबाबत पोलिस ठाण्यात तक्रारी येत आहेत. वर्षागणीक वाहन चोरीच्या आकड्यांमध्ये वाढ होत असून, चोरट्यांच्या गाड्या पळवा-पळवीचे खेळ वाढतावाढतच आहेत. विशेष म्हणजे अगदी दोन-तीन महिन्यानंतर काही दुचाकी सापडतात. जिल्ह्यामध्ये जानेवारी ते नोव्हेंबर 2024 अखेर एकूण 550 वाहनांची चोरी करण्यात आली आहे. पोलिसांनी चोरीच्या 132 घटना उघड केल्या तर इतर जिल्ह्यातील दुचाकी शोधण्यात यश आले.
sangli crime news : सांगलीसह जिल्ह्यात दुचाकी चोरीचा फंडा जोमात : अकरा महिन्यात 550 गाड्यांची चोरी
सांगलीशहरासह जिल्ह्यात शहरीकरणाचा विस्तार जसा वाढत आहे. त्याचबरोबर वाहनांची संख्या देखील वाढत आहे. शहरात गेल्या काही वर्षांपासून दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातलेला आहे. पोलीस घटनांना रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करतात. पण, वास्तवात या उपाययोजना रोखण्यात अपयश येते. घरासमोर, सोसायटीच्या पार्किंग मध्ये, दुकानासमोर, सार्वजनिक पार्किंग मध्ये, रस्त्याच्या बाजूला अशी एकही जागा शिल्लक नाही, जिथून वाहने चोरीला जात नाहीत.
वाहनांचे लॉक तोडून अवघ्या काही मिनिटात वाहने चोरून नेली जातात. एकही दिवस असा होत नाही, जिल्ह्यात दुचाकी चोरीला गेलेली घटना घडलेली नाही. आठवड्यात किमान चार ते पाच दुचाकी चोरीला गेलेल्या आहेतच. शहरातील विविध भागात विशेष करून रुग्णालय, सर्वसामान्यांच्या घरासमोरून, कंपनी, दुकानासमोरून वाहनांच्या चोरीचे प्रकार होत आहे. याबाबत पोलिस ठाण्यात संबंधित तक्रारदात्यांकडून तक्रारी केल्या जातात.
पोलिसांकडून अशा वाहनांच्या शोधासाठीही प्रयत्न करण्यात येत आहे. शहरात सीसीटीव्हीचे जाळे पसरलेले आहे. मात्र चोराचा शोध घेणेही अवघड बनत चालले आहे. चोरी केल्यानंतर त्यातील महागडे पार्ट काढून विकले जातात. त्यामुळे चोरटे सापडून येत नाहीत. मात्र, जेव्हा काही दुचाकी चोरट्याकडून जप्त केल्या जातात. तेव्हा त्या प्रकरणाचा धागा पकडून बहुतांश चोरी प्रकरणांचा उलगडा व्हायाला पाहिजे. मात्र त्या तत्परतेने याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे सामान्य वर्गातून पोलिसांच्या प्रति नाराजीचा सूर उमटत आहे. परिणामी पोलिसांच्या पुढे दुचाकी चोरांचे मोठे आवाहन उभे राहिले आहे. घरासमोर वाहन उभे केल्यानंतरही चोरीस जात असल्याने, नागरिकांना आता वाहने लावायची कुठे असा प्रश्न पडत चालला आहे.
गुन्हे शोध पथकाचे दुर्लक्ष…
जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत 550 मोटारसायकल चोरीला गेल्या. इतके होत असताना पोलिसांनी वाहन चोरट्यांना आवरण्यासाठी प्रयत्न करून देखील त्याला यश येत नाही. 550 पैकी केवळ 132 दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे यात इतर जिल्ह्यातील गुन्हे देखील आहेत. पण, या पथकांच्या कामगिरीवर अन् स्थानिक पोलिसांच्या तपास पथकांवर प्रश्नचिन्ह आहेत. शहरात स्थनिक पोलीस पथके अन् गुन्हे शाखेची उत्कृष्ट कामगिरीचा ताळमेळ पाहिल्यानंतर अनेक पथकांना मागे टाकत स्थानिक पोलिसांचे तपास पथक पुढे धावत असल्याचे दिसते. मोजक्या पथकांची चमकदार कामगिरी अन् त्यावर गुन्हे शाखेची ओळख इतकच काय ते सध्या दिसत आहे.
अनेक घटनांमध्ये चोरीच्या दुचाकीचा वापर
एकीकडे सांगलीकर घरफोड्या, लुटमार व चेन स्नॅचिंगच्या घटनांनी त्रस्त आहेत. विशेष म्हणजे, या घटना देखील सुसाट दुचाकींवरूनच केल्या जातात. अनेक घटनांमध्ये चोरीच्या दुचाकींने केल्याचेही घटनांवरून दिसत आहे. घरफोड्या बहुतांश दुचाकींचा वापर आहे. तर, मोबाईल व लुटमार करणार्या गुन्हेगार देखील दुचाकींवरूनच गुन्हेगारी करत आहेत. त्यामुळे दुचाकींच शहर दुचाकी चोरांचा त्रास अशी परिस्थिती आजच्या सांगलीची झाली आहे.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.