rajkiyalive

sangli election 2024 : दुष्काळी फोरम अ‍ॅक्टिव्ह, भाजपला धोक्याची घंटा

विधानसभेला बदलणार राजकीय समीकरणे

जनप्रवास । प्रतिनिधी
sangli election 2024 : दुष्काळी फोरम अ‍ॅक्टिव्ह, भाजपला धोक्याची घंटा : लोकसभा निवडणुकीत दुष्काळी फोरमने अस्तित्व दाखवल्यानंतर आता पुढील महिन्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा अ‍ॅॅक्टिव्ह झाला आहे. लोकसभा असो अथवा विधानसभा अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दुष्काळी फोरमची भूमिका महत्त्वाची राहिली होती. जिल्ह्यात भाजपचे पाय पसरण्यास दुष्काळी फोरमचा मोलाचा वाटा राहिला. सध्या जिल्ह्यातील भाजपमध्ये सुरु असलेल्या अंतर्गत कुरघोड्यांमुळे कमळाशी बांधलेले फोरमचे नेते नाराज असल्याचे आहेत. फोरमचे नेते माजी मंत्री अजितराव घोरपडे, माजी आमदार विलासराव जगताप आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी एकत्र येवून सांगलीत बंद खोलीत चर्चा केली. भाजप वाढवण्यासाठी प्रयत्न करणारे नेते विरोधात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधानसभेसाठी भाजपसाठी ही धोक्याची घंटा असू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

sangli election 2024 : दुष्काळी फोरम अ‍ॅक्टिव्ह, भाजपला धोक्याची घंटा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय हालचालींना गती आली आहे. सोळा वर्षांपूर्वी जिल्ह्यातील सिंचन योजना अपूर्ण असल्याचा कारणावरून राज्यातील सत्ताधारी पक्षाच्या मंत्र्यांच्याविरोधात माजी आमदारांनी एकत्र येऊन दुष्काळी फोरमची स्थापना केली होती. माजी आ. विलासराव जगताप, माजी आ. पृथ्वीराज देशमुख माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे व माजी खासदार संजयकाका पाटील आणि स्वर्गीय आमदार अनिल बाबर यांचा समावेश होता. दुष्काळी भागातील प्रश्नांसाठी दबावगट म्हणून स्थापन झालेल्या दुष्काळी फोरमच्या नेत्यांना एकेकाळी राजकीयदृष्ट्या सुकाळ निर्माण झाला होता. जिल्ह्यातील अनेक निवडणुका, संस्थात्मक कारभारामध्ये फोरमचा हा दबावगट प्रभावी ठरला. संजयकाकांचा जिल्ह्याच्या राजकारणात दुष्काळी फोरममधून प्रवेश झाला होता.

गतवेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत दुष्काळी फोरमच्या नेत्यांनी खासदार पाटील यांना मदत केली होती. त्यामुळे पाटील यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला होता. आ. विलासराव जगताप, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, माजी मंत्री अजितराव घोरपडे, राजेंद्रअण्णा देशमुख यांचा समावेश होता, मात्र आता काकांचे या नेत्यांशी पूर्वीप्रमाणे सख्य राहिले नाही. त्यामुळे 2024 च्या निवडणुकीसाठी भाजपकडून विद्यमान खासदारांनाच उमेदवारी मिळाल्याने दुष्काळी फोरमच्या नेत्यांनी संजयकाका पाटील यांच्या विरोधात काम केले होते. जत तालुक्यात काकांच्याविरोधात उघड भूमिका सर्वप्रथम दुष्काळी फोरममध्ये प्रमुख असणारे माजी आ. विलासराव जगताप यांनी घेतली, भाजपचा राजीनामा देऊन त्यांनी काकांच्याविरोधात विशाल पाटील यांना पाठींबा जाहीर दिला होता.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात राजकीय हालचाली वाढल्या आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील घटकपक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून भाजपमध्ये अंतर्गत कुरघोड्या घडत आहेत. या कारणामुळे दुष्काळी फोरमचे नेते नाराज आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून फोरमच्या नेत्यांना बळ मिळाले नसल्याने नेत्यांची नाराजी वाढतच चालली आहे. या कारणांमुळे, ’दुष्काळी फोरम’ ही सक्रिय झाला आहे. सोमवारी सांगलीत दुष्काळी फोरमचे तीन नेते एकत्र आले होते. लोकसभा निवडणुकीत भाजपचा राजीनामा दिलेले माजी आमदार विलासराव जगताप, माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष (ग्रामीण) पृथ्वीराज देशमुख यांची बैठक झाली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाल्याने राजकीय गोटात पडसाद उमटत आहेत. लोकसभा निवडणुकीत दुष्काळी फोरमने अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या पारड्यात वजन टाकले होते. जगताप, घोरपडे यांनी उघडपणे विशाल पाटील यांचा प्रवार केला, तर देशमुख यांची व्हायरल ऑडिओ क्लिप बरीच गाजली. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे नेते पुन्हा एकत्र आले आहेत. त्यांच्यात बंद खोलीत चर्चा झाली. ज्या-त्या तालुक्यात दुष्काळी फोरममधील नेत्यांच्या सोयीचे राजकारण करायचे, असे या बैठकीत ठरल्याची चर्चा आहे. अन्य काही वजनदार नेतेही जगताप, घोरपडे, देशमुख यांच्या संपर्कात आहेत. दुष्काळी फोरमची पुढील बैठक 3 ऑक्टोबरनंतर होणार असून त्यामध्ये विधानसभा निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा व निर्णय होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात गेल्या दहा वर्षापासून दुष्काळी फोरमच्या नेत्यांनी भाजप वाढवण्यासाठी प्रयत्न केले. भाजपसाठी प्रयत्न करणारे नेते विरोधात जाण्याच्या तयारीत आहेत. माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, विलासराव जगताप, अजितराव घोरपडे, राजेंद्रअण्णा देशमुख हे नेते भाजपपासून दुरावण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आगामी विधानसभेसाठी भाजपसाठी ही धोक्याची घंटा असू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात नेत्यांचे बंड
दुष्काळी फोरममधील नेत्यांनी सोयीचे राजकारण करायचे, असे सोमवारच्या बैठकीत ठरले आहे. अन्य काही वजनदार नेतेही विलासराव जगताप, अजितराव घोरपडे, पृथ्वीराज देशमुख यांच्या संपर्कात आहेत. दुष्काळी फोरमची पुढील बैठक 3 ऑक्टोबरनंतर होणार असून त्यामध्ये विधानसभा निवडणुकीसंदर्भात सविस्तर चर्चा करुन भाजपविरोधात बंड करण्याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज