मिरज फायनल, सांगलीच्या उमेदवारीवरुन घुमजाव
जनप्रवास । सांगली
sangli election news : जिल्ह्यातील भाजपमध्ये शांती, शांती है : विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी सुसाट असताना जिल्ह्यातील भाजपमध्ये शांती-शांती है… असे चित्र निर्माण झाले आहे. मिरजेतून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असल्याने कामाला लागले आहेत. सांगली मतदारसंघात पुन्हा आ. सुधीर गाडगीळ हेच रिंगणात राहणार की उमेदवार बदलणार याबाबत पक्षीय पातळीवर घुमजाव केले जात आहे. गाडगीळ थांबणार असल्याने तयारी केलेल्या इच्छुकांबाबत पक्षाकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही, त्यामुळे पदाधिकार्यांत नाराजीचा सूर आहे. जतमधील वाद मिटायला तयार नसल्याने वरिष्टांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
sangli election news : जिल्ह्यातील भाजपमध्ये शांती, शांती है
राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीत स्पर्धा निर्माण झाली आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता काबीज करण्याची रणनिती महाविकास आघाडीकडून आखली जात आहे. महायुती सत्ता कायम राखण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय हालचाली गतिमान झाल्या असल्याने इच्छुकांची संख्या वाढली आहे. सांगली आणि मिरज विधानसभा मतदारसंघ भाजपसाठी सेफ असल्याचे मानले जात होते. या दोन्ही मतदारसंघात विद्यमान आमदारांनाच संधी मिळणार असल्याचे स्पष्ट होते. त्यानुसार मिरजेतून पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांची उमेदवारी निश्चित झाली असून त्यांनी निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे.
सांगलीत आ. सुधीर गाडगीळ यांनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याचे संकेत होते. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मी पक्षाकडे तिकीट मागणार नसल्याची भूमिका जाहीर केली. त्यामुळे आमदार गाडगीळ निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार नसल्याची जोरदार चर्चा झाली. त्यानंतर भाजपच्या वरिष्ट नेत्यांनी आ. गाडगीळ यांची मनधरणी केली आहे. वरिष्ट नेत्यांच्या चर्चेनंतर गेली काही दिवस राजकीय घडामोडीपासून दूर असणारे आ. गाडगीळ पुन्हा सक्रिय झाले. मात्र उमेदवारी लढविण्याबाबत प्रश्न कायम आहे.
गाडगीळ थांबणार असल्याने भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, लोकसभा निवडणूक समन्वयक शेखर इनामदार यांनीही भाजपमधून उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले. त्यांनी भाजपच्या वरिष्ट नेत्यांच्या भेटी घेतल्या. परंतु अद्याप इच्छुकांना वरिष्ट नेत्यांकडून कोणताही निरोप नाही. त्यामुळे इच्छुकांच्या हालचाली थांबल्या असून त्यांच्यातून नाराजीचा सूर उमटला आहे.
तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभेवरुन माजी खासदार संजयकाका पाटील हे पक्षातील नेत्यांवर नाराज आहेत. त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यांचे पुत्र प्रभाकर पाटील हे राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर निवडणूक लढतील, असे चित्र आहे. याशिवाय इस्लामपूरमधून भाजप जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनीही भाजप सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपला धक्का बसणार असला तरी वरिष्ट नेत्यांनी जिल्ह्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
जतमधील सस्पेन्स कायम
जत विधानसभा मतदारसंघात भाजपमधील वाद विकोपाला गेला आहे. माजी आ. विलासराव जगताप यांनी जतमध्ये बाहेरील उमेदवार कोणत्याही परिस्थितीत स्वीकारणार नसल्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे विधानपरिषदेचे आ. गोपीचंद पडळकर यांची गोची झाली आहे. या पार्श्वभूमीवर जगताप यांच्याशी भाजपच्या वरिष्ट नेत्यांनी संपर्क साधला आहे. मात्र जगताप यांनी जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती तम्मनगौडा रवि-पाटील यांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. दोघांपैकी एकाला उमेदवारी देण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



