जनप्रवास । सांगली
सांगली जिल्ह्यात 50 हजार शेतकरी पीक कर्जाच्या ब्लॅकलिस्टमध्ये :: सांगली ः यंदा पावसाला सुरुवात झाली असून खरीप हंगामातील पीककर्ज वाटपाला बँकांनी सुरुवात केली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसह राष्ट्रीयीकृत बँकांकडील सुमारे 50 हजारावर शेतकर्यांचे 900 कोटी रुपयांचे कर्ज थकित आहे. या पीक कर्जाची परतफेडच केली नाही. यामुळे थकबाकीदार शेतकरी बँकेच्या ब्लॅक लिस्टमध्ये आले आहेत. या कर्जामुळे बँकांचा एनपीए वाढला आहे. परिणामी, जुन्या कर्जाची परतफेड केल्यानंतरच नवीन कर्ज बँका शेतकर्यांना देणार आहे. त्यामुळे थकबाकीदार शेतकर्यांपुढे खरिपातील नव्या पीक कर्जाचा पेच निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
सांगली जिल्ह्यात 50 हजार शेतकरी पीक कर्जाच्या ब्लॅकलिस्टमध्ये
जिल्हा मध्यवर्तीसह राष्ट्रीयीकृत बँकांचे 900 कोटींचे कर्ज थकित,
जिल्ह्यात खरीप हंगाम सुरू होण्याअगोदर शेतकर्यांना कर्जपुरवठा करण्यासाठी बँका तयारी करतात; मात्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वगळता खासगी आणि राष्ट्रीयीकृत, व्यापारी बँका शेतकर्यांना कर्जपुरवठा करण्यासाठी सातत्याने पाठीमागे राहतात. जिल्हा बँक आणि ग्रामीण बँकांकडून कर्जवाटपाचा आलेख वाढता असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील मध्यवर्ती सहकारी बँकेसह, राष्ट्रीयीकृत, ग्रामीण बँकांना 1 हजार 800 हजार कोटी उद्दिष्ट देण्यात आले होते. निश्चित केलेल्या उद्दिष्टाच्या 78 टक्के कर्जपुरवठा करण्यात आला होता. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेला चौदाशे कोटींचे उद्दिष्ट होते. जिल्हा बँकेने 90 टक्के शेतकर्यांना कर्जवाटप केले होते.
यंदा मान्सूनचे वेळेत आगमन झाले असून समाधानकारक पाऊस होत आहे.
त्यामुळे खरीपाला सुरुवात झाली आहे. हंगामासाठी नवीन कर्जवाटप सुरु करण्यात आले आहे. परंतु प्रत्यक्षात कर्जाची परतफेड न केल्यामुळे दिलेल्या कर्जाचे उद्दिष्ट पूर्ण करताना बँकांपुढे नवा पेच निर्माण होणार आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत आणि जिल्हा मध्यवर्ती बँकांकडे पन्नास हजाराहून अधिक शेतकर्यांचे 900 कोटी रुपयांचे कर्ज थकले आहे. या कर्जाची परतफेड न केल्याने बँकांनी शेतकर्यांना नोटीस बजावली आहे. हे सर्व कर्ज शेतीतील पीक कर्जासाठी घेतलेले आहे.
जिल्हा बँकेने वाटप केलेल्या पीक कर्जापैकी जुनी आणि चालू मिळून सुमारे 2237 कोटी इतकी थकबाकी होती.
यापैकी 1494 कोटी मार्चअखेर वसुली झाली. आता जुन अखेरीच्या वसुलीचे नियोजन बँकेने केले आहे. जुनअखेर सुमारे 743 कोटी वसुली शिल्लक आहे. या वसुलीसाठी बँकेने कार्यवाही सुरु केली आहे. थकबाकी न भरणार्यांवर बँकेकडून कडक कारवाई केली जाणार आहे.
जिल्ह्यातील 50 हजारांहून अधिक शेतकर्यांना विविध कारणांमुळे घेतलेल्या कर्जाची निर्धारित कालावधीमध्ये परतफेड करता आली नाही. यामुळे असे शेतकरी थकबाकीदार झाले आहेत. या शेतकर्यांचे खाते एनपीएमध्ये गेले आहे. खाते एनपीएमध्ये गेल्यामुळे बँकांनी शेतकर्यांना कर्ज परतफेडीसाठी नोटीस पाठविल्या आहेत. यानंतरही कर्जाची परतफेड न झाल्याने ही खाते थकबाकीत आली आहेत. थकबाकीदार शेतकर्यांना नव्याने कर्ज मिळणार नाही, यासाठी त्यांना जुन्या कर्जाची परतफेड करावी लागणार आहे. यानंतरच नवीन कर्जासाठी हे शेतकरी प्रात्र ठरणार आहेत.
30 जूनपर्यंत कर्ज परतफेडीची मुदत
हंगामासाठी बँकाकडून नियमित पतपुरवठा सुरु करण्यात आला आहे, परंतु थकबाकीदार शेतकर्यांमुळे कर्ज वाटपाची प्रक्रिया अडचणीत येत आहे. जिल्हा मध्यवर्तीसह राष्ट्रीयीकृत बँकांकडे कर्ज परतफेडीसाठी 30 जून ही अंतिम मुदत जाहीर करण्यात आली आहे. 30 जूनपर्यंत किती शेतकरी पुढे येतात वावरच बँकांच्या कर्ज वाटपाचे धोरण अवलंबून राहणार असल्याचे चित्र दिसत आहे.
कर्ज वाटपाची 20 रोजी बैठक
चालू खरीप हंगामासाठी बँकांना कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यासाठी 20 जून रोजी जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. त्यामध्ये राष्ट्रीयीकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती बँक आणि ग्रामीण सहकारी बँकांना कर्ज वितरणाबाबतच्या सूचना दिल्या जातील.
– विश्वास वेताळ, व्यवस्थापक अग्रणी बँक
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.