rajkiyalive

SANGLI LOKSABHA : जतला विलासराव जगताप दुर्लक्षित, पडळकरांची एंन्ट्री

जनप्रवास । प्रतिनिधी
SANGLI LOKSABHA : जतला विलासराव जगताप दुर्लक्षित, पडळकरांची एंन्ट्री : सांगली ः लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाल्याने राजकीय हालचाली गतीमान होत आहे. भाजपमध्ये सुरु असलेला वाद थांबायला तयार नसून माजी आमदार विलासराव जगताप यांची नाराजी दूर झालेली नाही. त्यातच खासदार संजयकाका पाटील यांनी जतमध्ये जगताप यांना वगळून आमदार गोपीचंद पडळकरांच्या उपस्थितीत मेळावा घेतला. पोस्टरवरुनही जगतापांचा फोटो नसल्याचे दिसून आले. खासदारांनी प्रचाराच्या भाषणात विधानसभेला पडळकरच भाजपचे उमेदवार असतील, असे संकेत दिले आहेत. त्यामुळे जगताप दुर्लक्षित झाले असून पडळकरांची एंन्ट्री झाल्याचे स्पष्ट झाले.

SANGLI LOKSABHA : जतला विलासराव जगताप दुर्लक्षित, पडळकरांची एंन्ट्री

खासदारांनी दिले विधानसभा उमेदवारीचे संकेत

सांगली लोकसभेसाठी विरोधी पक्षामध्ये उमेदवारीवरुन खल सुरु असताना भाजपकडून खा. संजयकाका पाटील यांना सलग तिसर्‍यांदा उमेदवारी देण्यात आली. जिल्ह्यात भाजपकडून निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे, संजयकाकांनी हॅटट्रिक करण्यासाठी चंग बांधला आहे, परंतु भाजप पक्षांतर्गत सुरु असलेली गटबाजी थांबायला तयार नाही. माजी आ. विलासराव जगताप आणि संजयकाका यांच्यातही मतभेद आहेत. गत विधानसभा निवडणुकीत खासदारांनी भाजपचे उमेदवार जगताप यांना पराभवास कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला होता. सध्याही त्यांचे अशाच प्रकारचे काम सुरुच आहे. त्यामुळे जगताप यांनी संजयकाकांची उमेदवारी जाहीर होताच विरोध दर्शविला.

भाजपने सांगली लोकसभा मतदारसंघात खासदार पाटील यांची उमेदवारी लादली आहे.

सर्वे, पक्ष निरीक्षकांचा अहवाल नकारात्मक असताना, अनेक नेत्यांच्या त्यांना विरोध असताना पुन्हा त्यानाच उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे पक्षात अनेक नेते नाराज आहेत. कोणत्याही परिस्थितीत संजयकाकांचे काम करणार नसल्याची भूमिका घेतली आहे. खासदारांनी रांजणी ड्रायपोर्ट, कवलापूर विमानतळाचा प्रश्न सोडविण्यात अपयश आल्याची आरोपही केला आहे. त्यामुळे जगताप यांच्या भूमिकेने खासदार पाटील हे नाराज आहेत.

मतदारसंघात खासदारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.

भाजपनेही कोणत्याही परिस्थितीत जागा कायम ठेवण्यासाठी फिल्डींग लावली आहे. त्यादृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. खासदारांनी नाराजांकडे अद्याप दुर्लक्षच केले आहे. त्यांनी चार दिवसांपूर्वी जतमध्ये जावून प्रचार केला. स्वतः खासदार पाटील यांनी विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत मेळावा घेतला. या मेळाव्यास जगताप यांना निमंत्रित करण्यात आले नाही. तेथील माजी आमदार असतानाही पोष्टरवर त्यांचे छायाचित्र नव्हते.

खासदारांनी जतमध्ये भाषण करीत असताना आ. पडळकर यांच्यावर स्तुतीसुमने उधळली.

आगामी विधानसभा निवडणुकीत जतमधून भाजपचे उमेदवार पडळकर हेच असतील, असे संकेत दिले आहेत. या कारणांमुळे यापुढे जतमध्ये पडळकर हे भाजपचे नेतृत्व करतील, असा अंदाज बांधला जावू लागला आहे. खासदार संजयकाका आणि माजी आमदार जगताप यांच्यातील वादाबाबत अद्यापही भाजपच्या वरिष्ट नेत्यांनी लक्ष घातलेले नाही. पाटील 18 रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे येणार आहेत. त्यामुळे वरिष्ट नेत्यांकडून दोन्ही नेत्यांच्या वादावर पडदा टाकला जाण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज