rajkiyalive

SANGLI LOKSABHA : संजयकाकांच्या राजकीय अस्तित्वाचा ‘निकाल’

जनप्रवास : अमृत चौगुले

SANGLI LOKSABHA : संजयकाकांच्या राजकीय अस्तित्वाचा ‘निकाल’ : सांगलीचा नगरसेवक ते जिल्ह्याचा खासदार अशी मजल मारलेल्या संजयकाका पाटील यांच्या राजकीय अस्तित्वाचा मंगळवारी लोकसभा निवडणूक मतमोजणीतून निकाल होणार आहे. या निकालातून होाणारी ‘हॅटट्रिक व्हिक्ट्री’ त्यांना पक्षांतर्गत रोषानंतरही अडचणीवर मात करीत जायंटकिलर ठरवेल. मात्र पराभव झाल्यास भाजप अन् त्यांच्याही रिव्हर्स काऊंटडाऊनची वाटचाल ठरेल. एवढेच नव्हे तर पुन्हा राजकीय संघर्षच वाट्याला येणारा हा निकाल ठरेल. हा निकाल त्यांचा आणि जिल्ह्यातील त्यांच्या समर्थकांच्या राजकीय भवितव्याचाच फैसला करणारा ठरणार आहे.

SANGLI LOKSABHA : संजयकाकांच्या राजकीय अस्तित्वाचा ‘निकाल’

हॅटट्रिक झाल्यास ‘जायंटकिलर’; पराभवातून पुन्हा संघर्ष वाट्याला

माजी आमदार स्व. दिनकरआबा पाटील यांचा राजकीय वारसा असतानाही राजकारणात संजयकाकांना सहजासहजी काही मिळालेच नाही. सांगलीत काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणाची सुरुवात केलेल्या संजयकाकांना फौजदार गल्लीतून नगरपालिकेचा नगरसेवक, उपनगराध्यक्ष अशी मजल मारता आली. त्यानंतर त्यांनी मूळगाव चिंचणी गाठून दिनकरआबा पाटील यांच्या मदतीसाठी तासगाव मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले.

माजी गृहमंत्री आर.आर.आबा पाटील यांच्याही राजकारणाची सुरुवात दिनकरआबांसोबत आणि नंतर त्यांच्या विरोधात झाली. त्यात आर. आर. आबांना सहकारमहर्षी स्व. विष्णुअण्णा पाटील आणि नंतर जाणते नेते शरद पवार यांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर वरदहस्त लाभला आणि त्यांची कारकीर्द बहरत गेली. दरम्यान, दिनकरआबांच्या पश्चात संजयकाकांनी आर. आर. आबांच्या विरोधात काँग्रेसमधून दंड थोपटत लढा उभारला. पण दुर्दैवाने राष्ट्रवादीतून आर. आर. आबा गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते अशा माध्यमातून राज्यव्यापी नेतृत्वापर्यंत पोहोचले.

संजयकाकांना लढूनही नेहमी आर. आर. आबांच्याविरोधात अपयश येत राहिले.

तरीही संजयकाकांनी संघर्ष सुरूच ठेवला. अखेर आर. आर. आबांच्या वाटेतील संजयकाकांची अडचण दूर करण्यासाठी त्यांना राष्ट्रवादीत घेऊन विधान परिषदेवर संधी देण्यात आली. त्यामुळे काही काळ संजयकाकांच्या संघर्षाला अल्पविराम मिळाला होता. पण विधान परिषद समाप्तीदरम्यान पुन्हा राजकीय मतभेद उफाळून आल्याने संघर्षाची सुरुवात झाली.

याचदरम्यान संजयकाकांच्या जोडीला दुष्काळी फोरमच्या माध्यमातून रमाजी आमदार विलासराव जगताप, राजेंद्रअण्णा देशमुख, पृथ्वीराज देशमुख आदींनी मजबूत गट्टी जमवत दबावगट निर्माण केला. जोडीला आर. आर. आबांचे पक्षांतर्गत रस्सीखेचमधून जयंत पाटील यांनी त्यांना छुपे पाठबळ दिले होते. हाच दुष्काळी फोरम 2014 च्या मोदी लाटेला हातभार लावणारा ठरला. यात संजयकाकांना सांगलीतून लोकसभेसाठी उमेदवारीची लॉटरी लागली. तीच उशिरा का होईना त्यांच्या राजकीय कारकीर्दीला भरारी मारणारी आणि जिल्हा, राज्यात आणि केंद्रात पोहोचविणारी ठरली.

या संधीतून मोदी लाटेत दुष्काळी फोरम आणि भाजपच्या साथीने संजयकाकांनी सांगलीचा लोकसभेचा आणि वसंतदादा घराण्याचा बालेकिल्ला काबिज केला. त्यावेळी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील यांचा रेकॉर्डब्रेक 2 लाख 29 हजार मतांनी पराभव केला. त्यांच्या विजयाने जिल्ह्यात भाजपची मोदी लाटच आली. सांगली, मिरज भाजपल जत कायम राटखलेच, खानापूर-आटपाडी, आणि शिराळ्यातही बाजी मारत काँग्रेसने 8 पैकी 5 जागा महायुतीने मिळविल्या. त्याच जोरावर जिल्हा परिषद, महापालिकेसह नगरपालिका, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींमध्येही सर्वाधिक मोठा पक्ष भाजप बनला.

अर्थात एवढे होऊनही संजयकाकांच्या भिडस्त स्वभावामुळे आणि काँग्रेस-राष्ट्रवादीशी अधिक सलगीने भाजपचे जिल्ह्याचे नेते काही होऊ शकले नाहीत. भाजपमध्ये राज्य आणि जिल्ह्यात दबदबा निर्माण करू शकले नाहीत. परिणामी याचा भाजपमधील विलासराव जगताप, पृथ्वीराज देशमुख युतीतील स्व. अनिल बाबर, आणि विशेषत: तासगावमधील सख्खे सोबती अजितराव घोरपडे यांच्याशी संघर्ष वाढत गेला. यामुळे सन 2019 मध्ये त्यांना लोकसभा निवडणुकीत विरोध झाला. त्यात त्यावेळचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी मधयस्थी करीत वादावर पडदा टाकला. दुसरीकडे काकांवर नाराज गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीतून मदविभागणीचा फायदा मिळाला. त्यातून सन 2019 मध्ये स्वाभिमानीचे विशाल पाटील यांच्याविरोधात संजयकाकांचे मताधिक्य कमी झाले तरी 1 लाख 64 हजार मतांनी विजय मिळविता आला होता.

त्यानंतरही संजयकाकांच्या स्वभावात काही बदल झाला नाही. त्यांनी आपला बाणा कायम ठेवला तर दुष्काळी फोरमसह सर्वच भाजप नेत्यांचे मतभेद वाढतच गेले. गेल्या पाच वर्षांत हा रोष वाढत गेला. परिणामी संजयकाकांना 2024 मध्ये उमेदवारीला विरोध झालाच. तरीही पक्षाने उमेदवारी दिली आणि हा संघर्ष उफाळून बाहेर पडला. त्यातून झालेल्या लढाईत उमेदवारीचा खेळ झाला अन् महाविकास आघाडीची उमेदवारी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पै. चंद्रहार पाटील मिळाले.

दुसरीकडे काँग्रेसवर अन्यायाचा रोष तापला. त्यातून विशाल पाटील अपक्ष मैदानात उतरले. त्यांना विलासराव जगताप यांनी पक्ष सोडून, तर अजितराव घोरपडे यांनी उघडपणे व्यासपीठावर जावून पाठिंबा दिला. भाजपचे आणि विशेषत: मिरज पॅटर्नचे कारभारी नगरसेवक सुरेश आवटी, निरंजन आवटी, संदीप आवटी, शिवाजी दुर्वे, आनंदा देवमाने यांनी भाजपला लाथाडून तर राष्ट्रवादीचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्यासह अनेकांनी उघडपणे विशाल पाटील यांनी प्रचाराचे मैदान तापविले.

पृथ्वीराज देशमुख यांच्यासह भाजपमधील अनेक दिग्गजांनीही प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विशाल पाटील यांना संजयकांविरोधात बळ दिले आहे. वंचित बहुजन आघाडीनेही विशाल पाटील यांना पाठिंबा दिल्याने हत्तीचे बळ मिळाले. एकूणच या तापलेल्या वातावरणात विशाल पाटील यांचा ‘लिफाफा’ सर्वत्र पोहोचला आहे. दुसरीकडे चंद्रहार पाटील यांची उमेदवारी मागील वेळेस गोपीचंद पळकर यांच्याप्रमाणे मतविभागणीस फोल ठरली. यामुळे संजयकाकांचे यावेळचे सर्व विरोध-अडचणीनंतरही विजयाचे मनसुबे अडचणीत आले आहेत. आतापर्यंतच्या सर्व्हेतही संजयकाकांपेक्षा विशाल पाटील सरस असल्याचे समोर आले आहे.

यामुळे उद्याच्या मतमोजणीतून आता संजयकाकांच्या विजय किंवा पराभवाचा नव्हे तर राजकीय अस्तित्वाचा निकाल लागणार हे स्पष्ट आहे. जर संजयकाका एवढ्या अडचणीनंतर विजयी झाले तर खरोखरच ते मोदी लाटेच्या कृपेने ‘जायंटकिलर’ ठरतील. मोदींच्या हॅटट्रिकबरोबरच काकांची हॅटट्रिक त्यांना मंत्रिपदाची दारे उघडणारी ठरतील. सोबत भाजपचे जिल्हास्तरीय नेतृत्व त्यांच्या ताब्यात जाईल.

शिवाय ज्यांनी विरोध केला त्यांचा त्यांनी दिलेल्या इशार्‍याप्रमाणे हिशेब करायला ताकद मिळेल. पण जर पराभव झाला तर मात्र भाजपमधील त्यांचे अस्तित्व धोक्यात येईलच. शिवाय भाजपमध्ये त्यांना जांनी विरोध केला त्यांचा आवाज भाजपमध्ये बळकट होईल. परिणामी संजयकाकांच्या राजकीय गाडीला रिव्हर्स गिअर लागणार आहे. पुन्हा त्यांना आणि तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभेला पुत्र प्रभाकर पाटील याला लाँच करण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.

भाजपचे लक्ष विशाल पाटलांवर…!

या लढाईत विशाल पाटील हे निवडून आल्यास अपक्ष असल्याने भाजपचे त्यांच्यावर लक्ष राहणार आहे. दुसरीकडे ज्यांनी त्यांना भाजपमधून मदत केली तेही त्यांनी भाजपकडे यावे म्हणून आग्रही राहणार आहेत. अर्थात विशाल पाटील यांच्या भाजपमध्ये एंट्रीने जिल्ह्याचे नेतृत्व त्यांच्याकडे येऊ शकते. विशाल पाटील भाजपमध्ये येण्यामागे दुसरीकडे संजयकाका विरोधकांना बळ मिळून संजयकाकांची कोंडी करण्याची खेळी यशस्वी होऊ शकते. त्यादृष्टीनेही व्यूहरचना ठरू शकते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज