जनप्रवास । सांगली
SANGLI LOKSABHA : संसदेचा दरवाजा फोडून जनता मला खासदार करेल : सांगली लोकसभा निवडणुकीत भाजपाला उमेदवारी सोपी जावी म्हणून दिल्ली, मुंबईत बसून सांगलीचा उमेदवार ठरवला. यामागे कोण आहे हे लवकरच जाहीर करू. काँग्रेसच्या अस्तित्वासाठी व सांगलीच्या अस्मितेसाठी माझे हे काँग्रेसचेच बंड आहे. जनता माझ्याबरोबर आहे. त्यामुळे संसदेचा दरवाजा फोडून जनता मला खासदार करेल, असा विश्वास काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
SANGLI LOKSABHA : संसदेचा दरवाजा फोडून जनता मला खासदार करेल
विशाल पाटील म्हणाले, लोकसभेसाठी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यावेळी माघार घ्यायची नाही, असे ठरले होते. पक्षाला व महाविकास आघाडीच्या नेत्यांना दि. 19 एप्रिलपर्यंतची मुदत दिली होती. या मुदतीत एबी फॉर्म देण्याची मागणी होती. मात्र फॉर्म दिला नाही. त्यामुळे अत्यंत दुःख वाटले. त्यानंतरही आज दुपारपर्यंत अशी आशा होती की महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवारी मिळेल. आणि एकास-एक लढत होईल. मात्र ते शक्य झाले नाही. मला वैयक्तिकरित्या आणि आमच्या कुटुंबियांना वेगवेगळ्या प्रकारची पदे देण्याची ऑफर दिली, मात्र कोणत्याही अमिषाला बळी पडणार नाही. मी स्वत:च्या स्वार्थासाठी काम करत नाही.
काँग्रेस हायजॅक करण्याचा प्रयत्न झाला आहे.
काँग्रेसचे चिन्ह जिल्ह्यातून हद्दपार होत आहे. त्याच्यामागे कोण आहे हे काही दिवसांत आम्ही सांगू. काँग्रेसच्या अस्तित्वाचा व जिल्ह्याच्या अस्मितेचा प्रश्न असल्याने निवडणूक लढत आहे. त्यामुळे नवीन चिन्ह घेऊन निवडणूक लढवत आहे. मी जनतेचा उमेदवार आहे. सांगलीचा खासदार आता जनता ठरविणार आहे. मी काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून समजतो. काय षड्यंत्र झाले हे सर्वांना माहिती आहे. काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता भक्कमपणे माझ्यापाठीशी उभा आहे. आगामी निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा पराभव हा काँग्रेस पक्षच या जिल्ह्यात करू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्व. मदनभाऊ पाटील यांना देखील विधानसभेची उमेदवारी मिळाली नव्हती.
त्यांनी बंद दरवाजा फोडून विधानसभेत प्रवेश केला होता. तीच परिस्थिती आता पुन्हा आली आहे. संसदेचे दरवाजे भक्कम बनवले आहेत. पण मी जनतेच्या पाठबळावर लोकसभेचे दरवाजे फोडून संसदेत जाणार असल्याचा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केला. तर आमचे काँग्रेसवर प्रेम आहे. वसंतदादा पाटील यांनी काँग्रेस उभी केली. काँग्रेसच हा देश वाचवू शकते, यावर आमचा विश्वास आहे. ही लढाई सांगलीतील काँग्रेस वाचवण्याची आहे. ती मी लढत असताना माझ्यावर कारवाई होईल, असे वाटत नसल्याचे विशाल पाटील यांनी स्पष्ट केले.
जयंतराव यांच्यावर बोलायचे नाही…
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी भाषणात बोलताना सांगलीची उमेदवारी मी ठरवली नाही, असे सांगितले होते. यावर विशाल पाटील यांनी बोलण्यास नकार दिला. ‘या विषयावर मला ठरवून बोलायचे नाहीय’, असे सांगितले. दादा-बापू हा वाद आता नाही. आमच्यात काही मतभेद शिल्लक राहिले नसल्याचा खुलासा विशाल पाटील यांनी केला.
प्रचाराचा आज शुभारंभ; जत दौरा
काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी होणार आहे. हनुमान जयंतीनिमित्त तुंग येथील मारूती दर्शन त्यानंतर औदुंबरला दत्त मंदिराचे दर्शन घेऊन जत तालुक्यात प्रचारासाठी जाणार असल्याचे विशाल पाटील यांनी सांगितले.
विशाल पाटील म्हणाले…
* काँग्रेसच्या अस्तित्वाची तर सांगलीच्या अस्मितेची लढाई
* माझी उमेदवारी जनतेची; संसदेत जाणार
* काँग्रेस वाचविण्यासाठी लढाई, कारवाई होणार नाही
* वंचित आघाडीचा पाठिंबा मिळणार
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.