rajkiyalive

SANGLI LOKSABHA : विशाल पाटील करणार बंड?

जनप्रवास । सांगली

SANGLI LOKSABHA : विशाल पाटील करणार बंड? : सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला असताना महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा शिवसेना (उबाठा) गटाकडे गेली आणि चंद्रहार पाटील महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले. त्यामुळे काँग्रेसमध्ये संतापाची लाट पसरली असून विशाल पाटील देखील बंडखोरीच्या तयारीत आहेत. काँग्रेस समर्थकांचे विशाल पाटील ‘अपक्ष’ असे स्टेटस झळकू लागले असून काँग्रेस कमिटीसमोर विशाल पाटील समर्थनाच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या.

 

SANGLI LOKSABHA : विशाल पाटील करणार बंड?

दोन दिवसात नेत्यांची बैठक: कार्यकर्ते आक्रमक

दोन दिवसात जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांची बैठक होणार असून यामध्ये बंडखोरीचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची अंतिम बैठक मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर मुंबईत झाली. या बैठकीत सांगली व भिवंडी या वादग्रस्त जागेवर चर्चा करण्यात आली. मात्र सांगलीची जागा शिवसेना व भिवंडीची जागा राष्ट्रवादीने सोडण्यास नकार दिल्याने सांगलीतून चंद्रहार पाटील यांची महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाली. या निर्णयामुळे जिल्ह्यातील काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीपर्यंत प्रयत्न करून देखील आ. विश्वजीत कदम व इच्छूक उमेदवार विशाल पाटील यांना अपयश आले आहे. या घोषणेनंतर दोन्ही नेते नॉट रिचेबल झाले.

काँग्रेस कमिटीसमोर शुकशुकाट झाला.

तर काही वेळानंतर विशाल पाटील यांच्या संपर्क कार्यालयासमोर हळूहळू कार्यकर्त्यांची गर्दी जमू लागली. सांगलीच्या झालेल्या या निर्णयामुळे बाजार समितीचे संचालक शशिकांत नागे यांना अश्रू अनावर झाले. अनेक कार्यकर्त्यांनी भावना बोलून दाखविल्या. आमच्यासाठी अत्यंत वाईट दिवस आहे. महाराष्ट्रात काँग्रेस रुजवण्यासाठी छातीचा कोट वसंतदादांनी केला. सगळी वस्तूस्थिती माहिती असून जाणुनबुजून महाविकास आघाडीतील नेत्यांनी वाईट वागणूक दिली आहे. या निर्णयाचा निषेध करतो. घराघरात काँग्रेस कार्यकर्ते आहेत. आजचा निर्णय ऐकून डोळे भरून आलेत. ज्यांनी हा कार्यक्रम केला त्यांचा करेक्ट कार्यक्रम आता आम्ही करणार असल्याची भावना बोलून दाखविली.

महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगलीबाबत घेतलेला हा निर्णय दुर्दैवी आहे

दरम्यान, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. विक्रम सावंत म्हणाले, महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगलीबाबत घेतलेला हा निर्णय दुर्दैवी आहे. सांगलीची जागा मेरिटप्रमाणे मागत होतो. बुधवारी जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांची बैठक घेणार आहे. तालुकावार कार्यकर्त्यांची बैठक घेऊन यावर निर्णय घेणार आहोत. विशाल पाटील अपक्ष उभे राहणार का? यावर दोन दिवसांत निर्णय होईल. अद्याप आ. विश्वजीत कदम यांच्यासोबत अद्याप बोलणे झालेले नाही, असे आ. सावंत यांनी स्पष्ट केले.

सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद नसताना देखील त्यांनी ही जागा प्रतिष्ठेची का केली?

शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले, सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद नसताना देखील त्यांनी ही जागा प्रतिष्ठेची का केली? याचे उत्तर मिळालेले नाही. महाविकास आघाडीकडून जागा वाटप जाहीर झाले असले तरी अद्याप काही जागांवर उमेदवार निश्चित झालेले नाहीत. त्यामुळे भविष्यात जागा अदलाबदल होऊ शकते. भाजपच्या पराभवाची तयारी आम्ही केली आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसलाच मिळणे आवश्यक आहे. आ. विश्वजीत कदम, विशाल पाटील, आ. विक्रम सावंत, जयश्रीताई पाटील व मी आमच्या पाच जणांची बैठक दोन दिवसात होईल. त्यानंतर पुढील दिशा ठरवली जाईल.

‘अपक्ष’ स्टेटस अन् कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू…

महाविकास आघाडीत सांगलीच्या होणार्‍या निर्णयाची प्रतिक्षा जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते व कार्यकर्ते करत होते. अखेर निराशाजनक निर्णय झाला, त्यामुळे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. सांगली काँग्रेसचीच, अस म्हणणं चुकलं का?, दादा तुम्ही फक्त लढा, ‘आमचं काय चुकलं? आता लढायचं जनतेच्या कोर्टात’, अशा पोस्ट सोशल मिडियावर पडू लागल्या आहेत. दरम्यान, विशाल पाटील समर्थकांनी सोमवारपासून अर्ज भरण्यासाठी लागणार्‍या कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू केली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज