SANGLI LOKSABHA : सांगलीत शिवेसेनेची ‘मशाल’च

SHARE:

जनप्रवास । सांगली
SANGLI LOKSABHA : सांगलीत शिवेसेनेची ‘मशाल’च : सांगली लोकसभा मतदारसंघावरून महविकास आघाडीमध्ये सुरू असलेल्या जागेचा तिढा मंगळवारी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर संपला. सांगलीची जागा शिवसेने (उबाठा) गटाला मिळाली असून या ठिकाणी ‘मशाल’ चिन्हावर चंद्रहार पाटील निवडणूक लढणार आहेत. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित मुंबईत बसून ही घोषणा केली. त्यामुळे महिनाभरापासून सुरू असलेला सांगलीच्या जागेचा तिढा अखेर सुटला.

 

SANGLI LOKSABHA : सांगलीत शिवेसेनेची ‘मशाल’च

चंद्रहार पाटील आघाडीचे उमेदवार: नेत्यांची घोषणा

महाविकास आघाडीतील जागावाटपाचा पेच अखेर सुटला आहे. महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जागावाटपाचे सूत्र जाहीर करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे खा. शरद पवार, प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, शिवसेना (उबाठा) चे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, खा. संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते. शिवसेना (उबाठा) गट 21, काँग्रेस सतरा व राष्ट्रवादी काँग्रेस दहा जागांवर निवडणूक लढविणार आहे. सांगली व भिवंडीच्या जागेवरून जोरदार वाद सुरू होता. मात्र सांगलीची जागा शिवसेनेला तर भिवंडीची जागा राष्ट्रवादीला गेली आहे.

सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून गेल्या महिनाभरापासून शिवसेना (उबाठा) व काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू होती.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मिरजेत येऊन चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली. त्यामुळे जिल्हा काँग्रेसचे नेते आ. विश्वजीत कदम नाराज झाले, त्यांनी थेट दिल्ली गाठून सांगलीची जागा सोडू नये, अशी मागणी केंद्रीय नेत्यांकडे केली होती. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधीमंडळ गटनेते आ. बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील सांगलीची जागा सोडणार नसल्याचे शिवसेनेला स्पष्ट सांगितले होते. या वादाच्या काळातच शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी तीन दिवस सांगलीचा दौरा केला. त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाला लक्ष केले. त्यामुळे वाद आणखीच ताणाला गेला होता.

महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक मुंबईत सकाळी झाली.

या बैठकीत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात यांनी पुन्हा सांगलीच्या जागेवर दावा सांगितला. मात्र शिवसेनेने ही जागा देण्यास नकार दिला. मुंबई उत्तरची जागा काँग्रेसला देण्यात आली. आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या पत्रकार बैठकीत सांगलीतून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या जागेचा तोडगा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सुटला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *