जनप्रवास । सांगली
सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत शिवसेना (उबाठा) व काँग्रेसमध्ये खूपच ताणले गेले आहे. जागा वाटपाचा अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामध्येच शिवसेनेचे उध्दव ठाकरे यांनी मिरजेत जनसंवाद सभा घेतली आहे. त्यांच्या या सभेने तोडगा का तिढा? असा सवाल उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे वसंतदादा पाटील व बाळासाहेब ठाकरे यांच्यातील राजकीय संबंध सर्वांना ज्ञात आहेत. त्यामुळे उध्दव ठाकरे दादांच्या स्फूर्तीस्थळावर जाणार आणि दर्शन घेणार, पण दादांच्या नातवाला हवी असलेली लोकसभेची उमेदवारी देण्यासाठी उध्दव ठाकरे चाल देणार का? असा सवाल काँग्रेसचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
SANGLI LOKSABHA : उध्दव ठाकरेंच्या सभेने तोडगा का तिढा?
दादांच्या स्फूर्तीस्थळावर जाणार, पण नातवाला चाल देणार का?
राज्यात भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे), राष्ट्रवादी पार्टी (अजित पवार) गटाच्या महायुतीला शह देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टी, व शिवसेना (उबाठा) गटाने एकत्र येऊन महाविकास आघाडीची स्थापना केली आहे. महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा घोळ गेल्या वीस दिवसांपासून कायम आहे. त्यामध्ये सांगलीच्या जागेवरून काँग्रेस व शिवसेनेत (उबाठा) प्रचंड ताणले जात आहे. कोल्हापुरची जागा शिवसेनेची होती. मात्र ही जागा छत्रपती शाहू महाराज यांच्यासाठी काँग्रेसला सोडण्यात आली आहे. त्या बदल्यात काँग्रेसने सांगलीची जागा द्यावी, असा आग्रह शिवसेनेचा होता.
मात्र ही जागा देण्यास काँग्रेसचे नेते राजी झाले नाहीत.
तरी देखील डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना आठवड्यापूर्वी शिवसेनेत प्रवेश देऊन सांगली लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. या घोषणेमुळे काँग्रेसचे जिल्हा नेते आक्रमक झाले, त्यांनी दिल्ली व मुंबईत जाऊन प्रदेश व केंद्रीय नेत्यांची भेट घेतली. सांगली लोकसभा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये ही जागा सोडणार नाही, काँग्रेस लढणारच, असे त्यांनी स्पष्ट केले. अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे व प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेे यांनी देखील होकार दर्शविला. पण शिवसेनेचे नेते संजय राऊत सांगलीची जागा शिवसेनेला मिळाली असल्याचे सांगत आहेत.
शिवाय गुरूवारी उध्दव ठाकरे यांची मिरजेत जनसंवाद सभा होणार आहे.
तत्पूर्वी उध्दव ठाकरे सांगली येथील माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या स्फूर्तीस्थळावर जाऊन दादांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे व वसंतदादा पाटील यांचे स्नेह होते. शिवसेना पक्षाला त्यांची अप्रत्यक्षपणे खूप मदत असल्याचे राजकीय क्षेत्रात बोलले जात होते. मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात राहण्यासाठी अनेकवेळा काँग्रेस नेते देखील मदत करत असत. त्यामध्ये सांगलीचे वसंतदादा पाटील यांचे नाव देखील घेतले जात होते. त्यामुळे ठाकरे व दादा घराण्याचा स्नेह सवार्ंना ज्ञात आहे.
वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील सांगली लोकसभेसाठी इच्छूक आहेत.
गेल्या पाच वर्षांपासून ते लोकसभेची पेरणी करत आहेत. मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना शिवसेनेच्या उमेदवारापेक्षा विशाल पाटील चांगलीच फाईट देऊ शकतात. त्यामुळे भाजपचा पराभव करण्यासाठी उध्दव ठाकरे दोन पावले मागे जाऊन वसंतदादांचे नातू म्हणून विशाल पाटील यांना चाल देणार का? असा सवाल काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित करू लागले आहेत.
मिरजेत होणार्या सभेवर देखील अनेकांच्या नजरा लागल्या आहेत.
महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा निर्णय झालेला नाही. तरी देखील सभा घेतली जात आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते नाराज झाले आहेत. अनेकांनी या सभेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. उध्दव ठाकरे यांनी जर सभेत चंद्रहार पाटील यांना उमेदवारीचे संकेत दिले अथवा त्यांची उमेदवारी जाहीर केली तर या सभेमुळे महाविकास आघाडीत तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. जर वसंतदादांचे नातू म्हणून विशाल पाटील यांच्या उमेदवारीची संकेत दिले तर महाविकास आघाडीत चांगला तोडगा निघण्याची शक्यता आहे. तोडगा निघणार आहे. त्यामुळे गुरूवारी उध्दव ठाकरे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.