sangli mahapalika news : माधवनगर, बुधगाव, कवलापूर, हरिपूर, अंकली आदी गावांचे सर्वेक्षण होणार : शहरांचा झपाट्याने विकास होऊ लागल्याने व शहरालगतची गावे सक्षम बनत असल्याने शासन ‘ड’ वर्ग महापालिकांसाठी हद्दवाढ करण्याचा विचार करत आहे. तसे झाल्यास सांगली महापालिका लगतची माधवनगर, बुधगाव, कवलापूर, हरिपूर, अंकली, धामणी, सुभाषनगर-मालगाव आदी गावे मनपा क्षेत्रात येऊ शकतात. लवकरच सांगली, मिरज व कुपवाड या शहरालगत असलेल्या गावांचा व लोकसंख्येचे सर्वेक्षण होण्याची शक्यता आहे. शिवाय मनपाने लोकसंख्येचा व दरडोई उत्पन्नाचा निकष पूर्ण केल्यास सांगली मनपा ‘ड’ वर्गातून ‘क’ वर्गात जाऊ शकते.
sangli mahapalika news : माधवनगर, बुधगाव, कवलापूर, हरिपूर, अंकली आदी गावांचे सर्वेक्षण होणार
महापालिकेच्या हद्दवाढीसाठी शासन आग्रही
राज्यात एकूण 29 महापालिका आहेत. त्यामध्ये मुंबई महापालिका ही स्वतंत्र आहे. त्याचा दर्जा ‘अ’ प्लस आहे. तर पुणे व नागपूर महापालिका ‘अ’ वर्गात आहेत. या बरोबर ठाणे, पिंपरी-चिंचवड व नाशिक या महापालिका ‘ब’ वर्गातील आहेत. कल्याण-डोंबवली, वसई-विरार, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई या चार महापालिका ‘क’ वर्गात आहेत. उर्वरित 19 महापालिका या ‘ड’ वर्गातील आहेत. लोकसंख्या, दरडोई उत्पन्न व क्षेत्रफळ या दृृष्टीने वर्गवारी ठरत असते.त्यामुळे राज्य शासनाकडून हद्दवाढीचे अनेक प्रस्ताव पुढे येत आहे.
शेजारी असलेल्या कोल्हापूर महापालिकेने हद्दवाढीचा प्रस्ताव अंतिम केला आहे. लवकरच हा शासनाच्या मान्यतेसाठी पाठविला जाणार आहे. सोलापुरी देखील हद्दवाढ झाली आहे. सांगली महापालिकेचा हद्दवाढीचा विषय आता पुन्हा चर्चेला येणार आहे. हद्दवाढ झाल्यास व ‘क’ वर्गात मनपाला नेण्यासाठी लोकसंख्येचा निकष मनपाला पार करावा लागणार आहे. दहा लाखांच्यावर लोकसंख्या आवश्यक असणार आहे.सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे क्षेत्रफळ 118.18 चौरस किलोमीटर आहे.
शेजारच्या कोल्हापूर महापालिकेचे क्षेत्रफळ 66 चौरस कि.मी. आहे. त्या तुलनेत सांगली महापालिकेचे क्षेत्रफळ बरेच मोठे आहे. लोकसंख्या मात्र तुलनेने सांगली महापालिका क्षेत्रात कमी आहे. मनपाची लोखसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 5 लाख 2 हजार 793 आहे. सध्या मनपाची लोकसंख्या सहा लाखांच्या घरात आहे. दहा लाखांच्यावर लोकसंख्या नेण्यासाठी भविष्यात हद्दवाढीचा विषय येऊ शकतो. त्यासाठी माधवनगर, बुधगाव, कवलापूर, हरिपूर, अंकली, धामणी, सुभाषनगर-मालगाव आदीसह शेजारची, लगतची गावे समाविष्ट करून लोकसंख्येचा निकष गाठण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मात्र महापालिका क्षेत्रात येण्यास या गावांचा मोठा विरोधही होऊ शकतो. यापूर्वी तसा विरोध झालेला आहे.तसा विरोध होऊ लागला तर सर्वपक्षीय सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे आवश्यक आहे.
महापालिका क्षेत्र व परिसरात पायाभूत सेवा-सुविधा निर्माण होणे, औद्योगिक व व्यापार विकास होणे गरजेचे आहे. ग्रामीण भागाचा शहरी भागात समावेश झाल्यानंतर शहरी सुविधा मिळणे आवश्यक आहेत. त्यामध्ये महापालिका क्षेत्र व परिसरात बाहेरील मोठे उद्योगधंदे आणले पाहिजेत. व्यापार वाढला पाहिजे. इथे एज्युकेशन हब, हेल्थ हब विकसित होऊ शकते. शेतीपूरक उद्योगांचे क्लस्टर तयार होऊ शकते. तेवढी क्षमता याठिकाणी आहे. मात्र त्यासाठी रस्ते, पाणी, वीज या पायाभूत सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. त्यासाठी राजकीय ताकद प्रयत्नपूर्वक लागणे गरजेचे आहे.या बरोबर ‘क’ वर्गात जाण्यासाठी दरडोई उत्पन्न देखील वाढविणे आवश्यक आहे.
‘क’ वर्गासाठी दरडोई महापालिकेचे स्वत:चे उत्पन्न 3 हजार रुपयांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. राज्य शासनाने महापालिकांची हद्दवाढ करण्याचा निर्णय घेतला तर भविष्यात सांगली शहरालगत असलेली गावे शहराला जोडली जाऊ शकतात. तर ‘क’ वर्गात जाण्यासाठी मनपा देखील प्रयत्न करेल. त्यामुळे विकासासाठी अधिकचा निधी मिळू शकतो.sangli-mahapalika-news-survey-of-villages-like-madhavnagar-budhgaon-kavalapur-haripur-ankali-etc-will-be-conducted
तर महापालिका ‘ड’ वरून ‘क’ वर्गात जाईल…
सांगली, मिरज व कुपवाड शहर महापालिका ‘ड’ वर्गात आहे. महापालिकेचा स्तर उंचावून मनपा ‘क’ वर्गात जाण्यासाठी मनपाला 10 लाखांपेक्षा अधिक व पंधरा लाखाच्या आत लोकसंख्या आवश्यक आहे. या बरोबर दरडोई उत्पन्न तीन हजाराच्यावर आवश्यक आहे. भविष्यात हे घडल्यास मनपाचे स्तर उंचावणार आहे.* मनपाचे क्षेत्रफळ 118.18 चौरस किलोमीटर * सध्याची लोकसंख्या अंदाजे 6 लाख * हद्दवाढ झाल्यास माधवनगर, बुधगाव, कवलापूर, हरिपूर, अंकली, धामणी, सुभाषनगर-मालगाव गावे मनपाच्या हद्दीत

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



