rajkiyalive

सांगली मनपा क्षेत्रात 16 हजार भटकी कुत्री

जनप्रवास । सांगली

महापालिकेच्या माध्यमातून भटक्या कुत्र्यांची संख्या कमी करण्यासाठी निर्बीजीकरणासारख्या उपाययोजना करण्यात येत असतानाही भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून ही संख्या आता 17 हजारांवर गेली आहे. तर गेल्या तीन वर्षात सुमारे 5 हजार 400 जणांना भटक्या कुत्र्यांनी नागरिकांना चावा घेतला आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांची शहरात दहशत निर्माण झाली आहे. मनपाच्यावतीने वर्षाला दीड हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण होते. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव कमी करण्यासाठी पालिकेने प्रभावी उपाययोजना निर्माण करण्यासाठी गरज आहे.

महापालिका क्षेत्रात 2016 मध्ये साधारण 13 हजार भटक्या कुत्र्यांची संख्या असल्याचे पशुसंवर्धन व प्राणी मित्र संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले होते. भटक्या कुत्र्यांची संख्या रोखण्यासाठी प्रशासानाला विविध उपाययोजना करण्याच्या सूचना त्यावेळी नगरसेवकांनी केल्या होत्या. मात्र तशा उपाययोजना झाल्या नाहीत. कुत्र्यांच्या हल्ल्यात लहान मुलाचा बळी जाण्याचा प्रकार देखील शहरात घडला होता. तर अनेकांवर जीवघेणे हल्ले झाले होते. सन 2018 मध्ये भाजप सत्तेवर आल्यानंतर तत्कालिन स्थायी समितीचे सभापती अजिंक्य पाटील यांनी भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या रोखण्यासाठी कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एजन्सी नेमण्यात आली. मात्र एजन्सीचे काम समाधानकारक न झाल्याने महापालिकेने एका पशुवैद्यकीय अधिकार्‍याची नेमणूक करून कुत्र्यांचे निर्बीजीकरण सुरू केले आहे.

मनपाला पांढरा हत्ती सोसणार का?

निर्बीजीकरण करण्यापूर्वी कुत्र्यांना भुलीचे इंजेक्शन देणे आवश्यक असते. इंजेक्शनचा साठा पुरेशा प्रमाणात होत नसल्याने निर्बीजीकरणाचा वेग देखील मंदावत आहे. दररोज साधारण चार ते पाच कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जाते. कुत्र्यांची एकूण संख्या पाहता ते काम तितक्या प्रभावीपणे होत नाही. याचा त्रास आता नागरिकांना सहन करावा लागत आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांना त्रास होत आहे. रस्त्यांवर, गल्ल्यांमध्ये कुत्र्यांची टोळकी तयार झाली आहेत. पहाटे कामावर जाणारे आणि रात्री उशिरा कामावरुन घरी परतणार्‍यांना या भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यांकडून खूप त्रास होतो.

दुचाकीस्वारांच्या मागे कुत्रे लागत असल्याने अपघात होतात. लहान मुलांवर कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अंगावर धावून येणे, झुंडीने हल्ला करणे अशा घटना वाढल्या आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये सध्या भितीचे वातावरण आहे. कुत्रे चावण्यामुळे रेबीज होण्याची भीती आहे. कुत्रा चावल्याने होणार्‍या वेदना, घ्यावी लागणारी इंजेक्शन यामुळे नागरिक त्रस्त आहेत. गेल्या तीन वर्षात सुमारे 5 हजार 400 लोकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे. यामुळे कुत्र्यांनी शहरात दहशत निर्माण केली आहे. मोकाट कुत्रे हे रात्री-अपरात्री मोठ्या प्रमाणावर भुंकतही असतात. त्यामुळे नागरिकांच्या झोपेवर परिणाम होतो.

तसेच, ते कुठेही घाण करत असल्याने दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. महापालिका प्रशासनाने भटकी कुत्री पकडण्यासाठी डॉग व्हॅनची देखील खरेदी केली होती. मात्र अनेक भटकी कुत्री डॉग व्हॅनच्या वासाने लांब पळतात. त्यामुळे भटक्या कुत्र्यांवर आता ठोस उपाययोजना राबविणे आवश्यक आहे.

सरासरी दररोज चार कुत्र्यांचे निर्बीजीकरण…

भटक्या कुत्र्यांची एक मादी चार पिलांना जन्म देते, त्यामुळे महापालिका क्षेत्रात कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर न्यायालयाच्या निर्देशानुसार आणि भारतीय प्राणी कल्याण मंडळाने घालून दिलेल्या निर्देशांनुसार महापालिका क्षेत्रात दररोज सरासरी चार भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण महापालिकेकडून करून कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवली जाते. वर्षाला 1500 ते 1600 कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले जाते. कुत्र्यांना भुलीचे इंजेक्शन देऊन त्यांचे निर्बीजीकरण केले जाते.

चिकन-65 चे स्टॉल, चिकन, मटण सेंटरला हवे निर्बंध

भटकी कुत्री साधारणपणे शहरातील चिकन, मटण शॉपसह चिकन-65 च्या स्टॉल परिसरात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. चिकनचे पडलले वेस्ट मांस खाऊन भटकी कुत्री आक्रमक बनतात. त्यामुळे ते लहान मुले व वृध्दांवर हल्ले करत असतात. अशा ठिकाणी महापालिकेने काही निर्बंध लादणे आवश्यक आहेत. पूर्वी मनपा प्रशासनाने चिकन-65 च्या दुकानदारांना वेस्ट कचरा टाकण्यासाठी बकेट ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानंतर काही महिने दुकानदारांनी मनपाच्या सूचनांचे पालन केले, मात्र आता बकेट नसल्याचे दिसून येत आहे. त्यांना निर्बंध लादणे आवश्यक आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज