sangli mnp news : सांगली, कुपवाडमध्ये शोध मोहिमेत सापडले कोट्यवधीचे भूखंड : महापालिका क्षेत्रातील बिगशेतीसाठी लेआऊट (रेखांकन) मंजूर झाल्यानंतरही 2016 पूर्वी मुळ मालकाच्या नावावर असलेले सुमारे 750 भूखंड सांगली व कुपवाड शहरात नव्याने सापडले आहेत. त्याची किंमत कोट्यावधी रूपयांच्या घरात आहे. या माहिमेमुळे महापालिकेच्या अनेक मालमत्ता आता ताब्यात येणार आहेत. या भूखंडांच्या सातबर्यावर मनपाचे नाव लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, सांगली, मिरज व कुपवाड शहरात या भूखंडांची संख्या 1500 च्या घरात जाण्याची शक्यता आहे.
sangli mnp news : सांगली, कुपवाडमध्ये शोध मोहिमेत सापडले कोट्यवधीचे भूखंड
महापालिकेच्या मालमत्तेत 750 भूखंडांची नव्याने भर पडणार
महापालिका क्षेत्रातील अनेक खुल्या भूखंडांवर नगरपालिका अथवा मनपाचे नाव लागले नाही, तसे अनेक प्रकार उघडकीस आले होते. अडीच वर्षांपूर्वी सांगलीतील एका मोक्याच्या ठिकाणच्या भूखंडाचा बाजार झाल्याचे चव्हाट्यावर आल्यानंतर महापालिका प्रशासनाला जाग आली होती. त्यानंतर भूखंडाची शोध मोहिम सुरू केली होती. तत्कालिन आयुक्तांनी मनपा क्षेत्रातील खुले भूखंड शोधून त्या भूखंडांच्या सातबार्यावर मनपाचे नाव लावण्यासाठी निवृत्त नायब तहसीलदार शेखर परब यांची नियुक्ती केली. याबरोबर एक अधिकारी व चार निवृत मंडल अधिकार्यांची नेमणूक केली आहे. गेल्या काही महिन्यांपासून शेखर परब व त्यांची टीम बेवारस भूखंड शोधण्याचे काम करत आहे. सुमारे 325 भूखंड मनपाच्या नावावर झाले आहेत.
बेडग रस्त्यावरील कचरा डेपोच्या 52 एकर जागेवर 1969 पासून ‘शासन ड्रेनेज’ असे नाव होते.
या जागेला महापालिकेचे नाव लावण्यासाठी प्रयत्न झाले. त्यानुसार या जागेवर नाव लागले आहे. तर हनुमाननगर येथील ऑक्सिडेशन पॉण्डजवळील 16 एकर 20 गुंठे जागा 1971 पासून शासन जमा होती. या जागेला 54 वर्षांनी महापालिकेचे नाव लागले आहे. तर धुळगाव योजनेसाठी कवलापूर येथील 30 गुंठे जागा महापालिकेने खरेदी केली होती. वीस वर्षानंतर या जागेवर मनपाचे नाव लागले आहे. यासह अनेक भूखंड आता मनपाच्या नावावर झाले आहेत. त्यानंतर मनपा क्षेत्रात भूखंड शोधासाठी विशेष मोहिम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मोहिम सुरू करण्यात आली.
तत्कालिन नगरपालिका काळातील 1986 पासूनचे सर्व महसुली व नगरभूमापन विभागाकडील अभिलेखे तपासून घेण्याचे काम सुरू आहे.
त्यानुसार नव्याने अनेक भूखंड निष्पन्न होत आहेत. 2016 पर्यंत हस्तलिखिल कागदपत्रांच्या आधारे सांगली शहरातील सुमारे 450 हून अधिक तर कुपवाड शहरातील 273 व वानलेसवाडीतील 11 भूखंडावर अद्याप मनपा अथवा नगरपालिकेचे नाव लागले नसल्याचे दिसून आले. या भूखंडांची तातडीने महसुली कागदपत्रे गोळा केली गेली आहेत. त्यानुसार गृहनिर्माण संस्था व इतर संस्थांची माहिती उपनिबंधक कार्यालयाकडून घेतली जात आहे. हे भूंखड नावावर करण्याची संपूर्ण प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी कागदपत्रांची सर्व तयारी मनपाने केली आहे. अभिलेख्यांचे पुनर्लेखन व संगणीकरण करताना अनेक दोष राहिले आहेत. ते दुरूस्त करण्यासाठी कार्यवाही व त्यांचे प्रस्ताव तयार करणे याचे कामही सुरू आहे.
Plots worth crores found in search operation in Sangli, Kupwad
महापालिका क्षेत्रातील अनेक खुल्या भूखंडांचा परस्पर बाजार झाला आहे. त्यातून महापालिकेचे मोठे नुकसान झाले आहे. पण या शोध मोहिमेमुळे मनपाच्या मालमत्तेत वाढ होणार आहे. सांगली व कुपवाडमधील शोधामेहिम संपली आहे. मिरज शहरात भूखंड तापसाणीसाठी आणखी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणार आहे. पण सांगली, मिरज व कुपवाड या तिन्ही शहरात सुमारे 1500 भूखंड मिळण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे महापालिकेच्या मालमत्तेत वाढ होणार आहे. शिवाय अनेक ठिकाणी भूखंड विक्रीला देखील या मोहिमेमुळे चाप बसला आहे.
कोट्यावधींच्या भूखंडांवर लागणार मनपाचे नाव: शेखर परब
तत्कालिन नगरपालिकेपासून अनेक खुले भूखंडांवर मनपा अथवा नगरपालिकेचे नाव नव्हते. त्यामुळे मनपा क्षेत्रात आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीमच्यावतीने भूखंड शोध मोहिम राबवली जात आहे. त्यामध्ये सांगली व कुपवाड शहरात 750 हून अधिक भूखंड आढळून आले आहेत. मनपा क्षेत्रातील ही संख्या दीड हजारावर जाईल. या भूखंडांच्या सातबार्यावर मनपाचे नाव लावण्यात येणार आहे. या संदर्भातील सर्व कागदपत्रे महसूल व उपनिबंधक कार्यालयाकडून घेतली जात आहेत. लवकरच या भूखंडावर मनपाचे नाव लागेल, असा विश्वास मनपाचे विशेष नोंदणी अधिकारी, निवृत्त नायब तहसीलदार शेखर परब यांनी व्यक्त केला.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.