rajkiyalive

sangli news : सांगली जिल्ह्यात 1.16 लाख विद्यार्थी दुसर्‍या गणवेशापासून वंचित

वर्ष संपत आले तरी दुसरा गणवेश मिळालाच नाही, शिक्षण विभागाचा अजब कारभार

sangli news : सांगली जिल्ह्यात 1.16 लाख विद्यार्थी दुसर्‍या गणवेशापासून वंचित : राज्य सरकारने गाजावाजा करत ‘एक राज्य एक गणवेश’ ही योजना जाहीर केली. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी गणवेश पहिल्या दिवशी देण्यात येणार असे जाहीर केले, मात्र शाळा सुरू होऊन शैक्षणिक वर्ष संपत आले तरी तरी जिल्ह्यातील 1 लाख 16 हजार विद्यार्थी दुसर्‍या गणवेशापासून वंचित आहेत. गणवेश शिवण्यासाठी कापड उपलब्ध झाले असून ते तालुकास्तरावर पडून आहे. या कारणांनी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार की नाही, याबाबत तर्कवितर्क लढवले आहेत. शिक्षण विभागाने डिसेंबरपूर्वी गणवेश मिळतील, असा दावा केला होता, मात्र तो फोल ठरला.

sangli news : सांगली जिल्ह्यात 1.16 लाख विद्यार्थी दुसर्‍या गणवेशापासून वंचित

राज्यातील सरकारी, स्थानिक संस्थाच्या शाळांना शासनाने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक राज्य, एक गणवेश’ ही योजना अंमलात आणली आहे. जिल्ह्यात 15 जूनपासून शाळांना सुरुवात झाली. बालवयात मुलांच्या मनात एकमेकांबद्दल जातीय भेदभाव निर्माण होऊ नये, यासाठी शासनाने तसा निर्णय घेतला आहे. गेली काही वर्षे ठराविक मुलांनाच मोफत गणवेश मिळत असल्याने शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांच्या मनात जातीसंदर्भात भेदभावाची भावना निर्माण होत आहे. तो दूर करण्यासाठी सर्वच मुलांना गणवेश देण्याची मागणी काही शिक्षक संघटनांनी केली होती. या मागणीचा विचार करुन सर्व मुलांना गणवेश देण्याचा निर्णय घेतला.

विद्यार्थ्यांसाठी गणवेश शिवणाचे काम महिला आर्थिक विकास महामंडळाला देण्यात आले आहे.

बचत गटातील सुमारे 3 हजार महिलांकडून गणवेश शिवून घेण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर महिलांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. मात्र अद्याप कापड व त्यामुळे कामच उपलब्ध नाही. या बचत गटातील अनेक महिला शेतकरी कुटुंबातील असल्याने पावसाळा सुरू झाल्याने खरीप हंगामातील कामांमुळे पहिला गणवेश मिळायला विलंब झाला होता. विद्यार्थ्यांच्या दुसर्‍या गणवेशासाठी कापड येवून दोन महिने होवून गेले तरी अद्याप शिलाईचा पत्ताच नाही.

जिल्ह्यात पहिली ते आठवीचे दहा तालुक्यातील 52 हजार 245 विद्यार्थी संख्या आहे.

तर मुलींची संख्या 51 हजार 709 ऐवढी आहे. मुले आणि मुली मिळून जिल्ह्यात 1 लाख 16 हजार अशी विद्यार्थी संख्या आहे. या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरावर गणवेशासाठी कापड उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र शिलाईबाबतची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. चालू शैक्षणिक वर्ष संपण्यास अवघे चार महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे.

शिक्षण विभागाने डिसेंबर महिना संपण्यापूर्वी जिल्ह्यातील सर्व विद्यार्थ्यांना दुसरा गणवेश मिळेल, असा दावा केला होता.

आज डिसेंबर महिना संपणार आहे, मात्र दुसर्‍या गणवेशाचा अद्याप पत्ताच नाही. प्राथमिक शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराने गणवेश शिलाईबाबतची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. जिल्ह्यातील 22 विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्य दिन गणवेशाविना साजरा झाला होता. जानेवारी महिना सुरु होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 1 लाख 16 हजार विद्यार्थी दुसर्‍या गणवेशाविना प्रजासत्ताक दिन साजरा करणार काय अशी शंका उपस्थित होत आहे.

पहिली ते आठवीचे विद्यार्थी संख्या
तालुका मुले मुली
पलूस 1989 1998
क.महांकाळ 3336 3417
कडेगाव 3156 3314
शिराळा 2730 2715
तासगाव 6242 5851
आटपाडी 3447 3179
खानापूर 3362 3178
जत 12984 13201
मिरज 8397 8101
वाळवा 6602 6755
एकूण 52245 51709

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज