sangli political news : सांगली, जत, खानापुरात ‘सांगली पॅटर्न’, आठ जागांसाठी 99 उमेदवार रिंगणात, पाच मतदारसंघात दुरंगी : विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी तब्बल 85 जणांनी माघार घेतली. जिल्ह्यातील विधानसभेच्या आठ जागांसाठी 99 उमेदवार रिंगणात आहेत. सांगली, जत आणि खानापूर मतदारसंघात ‘सांगली पॅटर्न’ची पुनर्रावृत्ती झाली. सांगलीत काँग्रेसमध्ये, जतमध्ये भाजप तर खानापूर मतदारसंघात शरदचंद्र पवार राष्ट्रवादीतील बंडखोरी रोखण्यात वरिष्ठ नेत्यांना अपयश आले.
sangli political news : सांगली, जत, खानापुरात ‘सांगली पॅटर्न’, आठ जागांसाठी 99 उमेदवार रिंगणात, पाच मतदारसंघात दुरंगी
सांगलीत जयश्रीताई पाटील, जतमध्ये तम्मनगौडा रवि-पाटील आणि खानापूर-आटपाडीत राजेंदअण्णा देशमुख यांनी बंडाचा झेंडा हाती कायम ठेवला. इस्लामपूर, शिराळा, पलूस-कडेगाव, तासगाव-कवठेमहांकाळ व मिरज मतदारसंघात दुरंगी तर सांगली, जत, खानापूर-आटपाडी या मतदारसंघात तिरंगी लढत होईल. उमेदवारीचे चित्र स्पष्ट झाल्याने मंगळवारपासून प्रचाराचा धुरळा उडणार आहे.
जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी 22 ऑक्टोंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती.
सोमवार (दि. 4 नोव्हेेंबर) रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत होती. निवडणुकीसाठी 195 उमेदवारांचे 239 अर्ज दाखल झाले होते. अर्जांच्या छानणीत आठ मतदारसंघातील 65 जणांचे अर्ज अवैध ठरले. यामुळे निवडणुकीसाठी 184 उमेदवारांचे अर्ज राहिले होते. अर्ज माघारी घेण्याचा सोमवारी शेवटची मुदत होती. आठ विधानसभा मतदार संघातून अखेरच्या दिवशी 85 जणांनी माघार घेतली. निवडणुकीच्या रिंगणात आठ जागांसाठी 99 उमेदवार राहिले आहेत. शिराळा विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे सहा तर तासगाव-कवठेमहांकाळमध्ये सर्वाधिक 17 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
सांगलीत काँग्रेसच्या जयश्रीताई पाटील, खानापूरमध्ये शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख तर जतमध्ये भाजपचे तम्मनगौडा रवि-पाटील यांनी बंडखोरी केल्याने तीन मतदारसंघात सांगली पॅटर्नची पुनर्रावृत्ती झाली. पक्षांतर्गत झालेली बंडखोरी थोपविण्याचे नेत्यांपुढे आव्हान होते, जिल्ह्यात भाजप, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील बंडखोरी रोखण्यात वरिष्ठ नेत्यांना अपयश आले. शिराळ्यात भाजपमध्ये सम्राट महाडीक यांनी अपक्ष अर्ज भरुन बंडखोरी करण्याचा निर्णय घेतला होता. भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाडीक यांनी नाराजी दूर करण्यात यश आले,
त्यामुळे महाडीक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. मिरज मतदारसंघ शिवसेनेकडे गेला आहे, मात्र काँग्रेसमध्ये नव्याने प्रवेश केलेले मोहन वनखंडे यांनी अपक्ष अर्ज भरला होता. वरिष्टांच्या आदेशानुसार वनखंडे यांनी अर्ज मागे घेतला. खानापूर-आटपाडीची जागा एकनाथ शिंदे गटाकडे आहे. तेथे भाजपचे ब्रम्हानंद पडळकर यांनी अपक्ष अर्ज भरला होता, मात्र शेवटच्या दिवशी अर्ज मागे घेतला.
सांगली मतदारसंघात 23 उमेदवारांपैकी 9 जणांनी माघार घेतली असून 14 जण रिंगणात आहेत.
जयश्रीताई पाटील यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारली होती, त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय कायम ठेवला. पक्षाच्या नेत्यांनी अर्ज मागे घेण्याची विनंती केली, मात्र त्या लढण्यावर ठाम राहिल्या. त्यामुळे सांगलीत काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली. भाजपकडून शिवाजी डोंगरे यांनी अपक्ष भरलेला अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपला बंडखोरी रोखण्यात यश आले. भाजपचे आमदार सुधीर गाडगीळ, काँगे्रसचे पृथ्वीराज पाटील आणि अपक्ष जयश्रीताई पाटील अशी तिरंगी लढत होईल.
खानापूर मतदारसंघात 28 उमेदवारांपैकी 14 जणांनी माघार घेतली,
त्यामुळे 14 जण आखाड्यात आहेत. शरदचंद्र पवार राष्ट्रवादीकडून वैभव पाटील यांना उमेदवारी आली आहे, मागील महिन्यात भाजपमधून शरदचंद्र पवार राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख यांनी बंडखोरी केली आहे. महायुतीत ही जागा एकनाथ शिंदे सेनेकडे आहे, तेथे सुहास बाबर यांना उमेदवारी देण्यात आली आहे, मात्र भाजपचे ब्रम्हानंद पडळकर यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. वरिष्ट नेत्यांचा आदेश मानून पडळकर यांनी अर्ज मागे घेतला. याठिकाणी शिंदे शिवसेनेला बंडखोरी रोखण्यात यश आले.
जत विधानसभा मतदारसंघात 17 उमेदवारांपैकी 6 जणांनी माघार घेतली,
त्यामुळे 11 जण रिंगणात आहेत. जतला भुमिपुत्र विरुद्ध उपरा असा वाद उफाळून आला अल्याने भाजपमध्ये बंडखोरी झाली. माजी आ. विलासराव जगताप यांनी पुन्हा पक्षाविरोधात बंड केले आहे. माजी आ. जगताप आणि रवि-पाटील यांची भाजप नेत्यांकडून मनधरणीचा प्रयत्न झाला, मात्र यश आले नाही. भाजपचे आ. गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात भाजपच्याच तम्मनगौडा रवि-पाटील यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला. त्यामुळे जतमध्ये काँग्रेसचे आमदार विक्रमसिंह सावंत, भाजपचे पडळकर आणि अपक्ष रवि-पाटील यांच्यात तिरंगी लढत होईल.
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात 21 उमेदवारांपैकी 9 जणांनी माघार घेतली,
त्यामुळे 12 जण रिंगणात आहेत. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याविरोधात ऐन निवडणुकी भाजपमधून अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले निशिकांत पाटील यांच्यात दुरंगी सामना होईल. शिराळामध्ये पंधरा उमेदवारांपैकी 9 जणांनी माघार घेतली, त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात 6 जण आहेत. जिल्ह्यातील सर्वात कमी उमेदवार शिराळा मतदारसंघात असल्याचे स्पष्ट झाले. शिराळ्यात भाजपमध्ये सम्राट महाडीक यांनी अपक्ष अर्ज भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीचेे मानसिंगराव नाईक विरोधात भाजपचे सत्यजित देशमुख यांच्यात लढत होईल.
पलूस-कडेगाव मतदारसंघात 20 उमेदवारांपैकी 9 जणांनी माघार घेतल्याने 11 जण निवडणुकीच्या रिंगणात आहे.
येथे काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजीत कदम आणि भाजप नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्यात दुरंगी लढत होईल. तासगाव-कवठेमहांकाळ 33 उमेदवारांपैकी 16 जणांनी माघार घेतल्याने 17 जण निवडणुकीच्या रिंगणात राहिले. राष्ट्रवादीच्या आमदार सुमनताई पाटील यांचे पुत्र रोहित रिंगणात आहेत. भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे येथे दोन राष्ट्रवादीत लढत होईल.
मिरज मतदारसंघात 27 उमेदवारांपैकी 13 जणांनी माघार घेतली असून 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मिरजेच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही होती, मात्र उद्धव ठाकरे गटाने दावा कायम ठेवून जागा मिळविली. काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले मोहन वनखंडे यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे भाजपचे नेते व पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे आणि शिवसेनेचे तानाजी सातपुते यांच्यात दुरंगी लढत होईल.
आठ विधानसभा मतदार संघातील प्रमुख लढती
मतदारसंघ उमेदवार कंसात पक्ष
सांगली – आ. सुधीर गाडगीळ (भाजप), पृथ्वीराज पाटील (काँग्रेस), जयश्रीताई पाटील (अपक्ष)
मिरज – आ. सुरेश खाडे (भाजप), तानाजी सातपुते (ठाकरे गट सेना)
इस्लामपूर – जयंत पाटील (शरद पवार राष्ट्रवादी), निशिकांत पाटील (अजितदादा राष्ट्रवादी)
शिराळा – मानसिंगराव नाईक (शरद पवार राष्ट्रवादी), सत्यजित देशमुख (भाजप)
पलूस-कडेगाव – आ. विश्वजीत कदम (काँगे्रस), संग्रामसिंह देशमुख (भाजप)
खानापूर-आटपाडी – सुहास बाबर (शिवसेना), वैभव पाटील (शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस), राजेंद्रअण्णा देशमुख (अपक्ष)
तासगाव-कवठेमहांकाळ – रोहित पाटील (शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस), संजयकाका पाटील (अजितदादा राष्ट्रवादी)
जत – आ. विक्रमसिंह सावंत (काँग्रेस), आ. गोपीचंद पडळकर, तम्मनगौडा रवि-पाटील
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.