sangli-sarpancj-news-keys-of-360-villages-in-sangli-district-in-hands-of-women स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांना समान वाटा मिळावा म्हणून 50 टक्के आरक्षण देण्यात आले. चूल आणि मूल या पारंपारिक रितीरिवाजात अडकलेल्या महिला पुढे आल्या. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, नगरपालिका यासारख्या संस्थांमध्ये महिलांच्या आरक्षणामुळे प्रतिनिधित्व वाढले आहे. जिल्ह्यात 696 ग्रामपंचायती असून त्यामध्ये तब्बल 360 ग्रामपंचायतींच्या चाव्या महिलांच्या हातात आहेत.
sangli sarpancj news : सांगली जिल्ह्यात 360 गावच्या चाव्या महिलांच्या हातात
त्याचे आता सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. महिला आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत. वर्षानुवर्षे असलेले पुरुषांचे वर्चस्व मोडून काढण्याची संधी मिळाल्याने महिला सक्षमीकरण आणि लोकशाही प्रक्रियेत सहभाग वाढल्याचे दिसून येत आहे.
सरकारी आणि निमसरकारी विभागात महिलांसाठी 30 टक्के आरक्षण देणारे महाराष्ट्र पहिले राज्य होते. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये 33 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय पुढे घेतला गेला. तो सर्वप्रथम महाराष्ट्रात. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिलांचे आरक्षण 50 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आले. आज राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमधील पन्नास टक्के महिला आरक्षणामुळे 14 हजार महिला सरपंच, पंचायत समिती सदस्या आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निवडून येत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये ग्रामपंचायत हे गावचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखले जाते. जिल्ह्यात तब्बल 696 ग्रामपंचायती असून त्यापैकी 360 ग्रामपंचायतींमध्ये महिला सरपंच कारभारी म्हणून काम करीत आहेत. जत तालुक्यात सर्वाधिक 57 महिला सरपंच आहेत, त्यापाठोपाठ वाळवा तालुक्यात 49 महिला सरपंच कारभार पाहत आहेत.
कामाचा ठसा उमटवून गावं विकासाच्या वाटेवर, पुरुषांचे वर्चस्व मोडण्यात यश
गावगाढा हाकत असताना महिलांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रश्नांचे उत्तमरित्या क्रम बदलले आहेत. गावातले कार्यालय खुलं केले. दारूच्या पार्ट्या सगळीकडे बहुदा बंद झाल्या. गरीब व महिलांचे येणं-जाणं सुरू झाले असल्याचे दिसून येते. संविधानांच्या समता व न्याय मूल्यांची जपणूक महिलांनी नक्की वाढवली. गावाच्या विकासाचं, विकासकामांचं गरजेनुरुप प्रमाण वाढले. यामुळे स्थानिक प्रस्थापितांचं धाबं खरचं दणाणलं.
गावागावात पुरुषांचे वर्चस्व असताना ग्रामसभाही महिला चालवू लागल्या आहेत. कवठेपिरान, हरिपूर, कवलापूर, दुधगाव, बुधगाव, माधवनगर, समडोळी, सावळवाडी मालगाव यासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या गावात महिला कारभारी म्हणून यशस्वी होत आहेत. गावच्या विकासासाठी त्यांच्याकडून प्रयत्न होताना दिसतात. गावात दिवा-बत्तीसह विकासकामे करण्याची जबाबदारी त्यांनी पेलली आहे.
समडोळीमध्ये सुनीता हजारे, कवठेपिरानमध्ये सौ. अनिता माने, सावळवाडीमध्ये सौ. पूजा माणगावे आणि दुधगावमध्ये सौ. करिष्मा पाखरे या महिला सरपंच आपली जबाबदारी अगदी चोख पार पाडत आहेत. गावच्या विकासासाठी त्यांचे मोठे प्रयत्न सुरू आहेत.
पाणीपुरवठा योजना, स्वच्छता अभियानासह केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी करुन गावच्या विकासात योगदान देत आहेत. गाव पातळीवर जोरदार कामगिरी बजावणार्या या महिला लोकप्रतिनिधींंना पुढची कवाडं मात्र बंद होती. त्यांना महिला आरक्षणामुळे संधी मिळाली. महिला आणि पुरूषांच्या विचारसरणीत खूप फरक आहे. महिला तिच्या कामाचा ठसा उमटवते हे तिने सिद्ध केले आहे. महिलांची काम करण्याची पद्धत विकेंद्रित होत असल्याचे चित्र दिसून येते.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



