sangli savarde crime news : सावर्डेत टी.टी.चे इंजेक्शन का देत नाहीस म्हणत वैद्यकीय अधिकार्यास मारहाण : सावर्डे (ता. तासगाव) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य पथकाकडील औषध निर्माण अधिकारी जालिंदर महादेव कांबळे यांना टी.टी.चे इंजेक्शन का देत नाहीस, असा जाब विचारत सावर्डे येथील गजेंद्र शिवाजी पाटील याने शिवीगाळ करत मारहाण केली. तर वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा पाटील यांना शिवीगाळ केली. याप्रकरणी कांबळे यांनी गजेंद्र पाटील यांच्या विरोधात तासगाव पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
sangli savarde crime news : सावर्डेत टी.टी.चे इंजेक्शन का देत नाहीस म्हणत वैद्यकीय अधिकार्यास मारहाण
सावर्डे येथे जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य पथक आहे. याठिकाणी वैद्यकीय अधिकारी आणि औषध निर्माण अधिकारी कार्यरत आहेत. सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी डॉ. पाटील या मासिक अहवाल देण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाकडे गेल्या होत्या. याचवेळी तात्यासाहेब जगन्नाथ सदाकळे यांना जखम झाल्यामुळे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी, गजेंद्र शिवाजी पाटील हा आरोग्य पथकात घेऊन आला होता. यावेळी औषध निर्माण अधिकारी कांबळे यांनी सदाकळे यांचा केस पेपर नोंद करून त्यांच्यावर औषधोपचार केला. मात्र, यावेळी गजेंद्र पाटील याने कांबळे यांच्यासोबत वाद घालून शिवीगाळ केली. ‘टीटीचे इंजेक्शन का देत नाहीस?’ असा जाब विचारत शिवीगाळ करू लागला.
यावेळी त्यांनी ‘याठिकाणी इंजेक्शन देण्याची सोय नाही. तुम्ही चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जा,’ असे समजावून सांगितले. मात्र, पाटील याने शिवीगाळ करत, दमदाटी करून दवाखान्यातील साहित्य विस्कटून लावले. दवाखान्याबाहेर ओढत नेत चप्पलने मारहाण केली. शासकीय कामात अडथळा आणून पाठीत, हातावर, पायावर, डोक्यात मारहाण करून जखमी केले. त्याचवेळी डॉक्टर पाटील त्याठिकाणी आल्या. त्यांनी पाटील याला ‘मारहाण कशासाठी करत आहेस? असे विचारले असता, पाटीलने डॉ. पाटील यांनाही शिवीगाळ केली. अधिक तपास तासगाव पोलिस करत आहेत.
आरोग्य कर्मचार्यांची कारवाईची मागणी
औषध निर्माण अधिकार्यांना झालेेली मारहाण आणि वैद्यकीय अधिकार्यांचा अपमान केल्याप्रकरणी संबंधितावर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा संघटनेने जिल्हा आरोग्य अधिकार्यांकडे केली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजयकुमार वाघ यांना निवेदन देण्यात आले आहे, त्यात म्हटले आहे की, तासगाव तालुक्यातील चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्रांअंतर्गत सावर्डे येथे असलेले औषध निर्माण अधिकार्यांना गावातील काही व्यक्तींनी शिविगाळ करीत मारहाण केली. तसेच वैद्यकीय अधिकार्यांना देखील अपमानास्पद वागणूक दिली.
या घटनेमुळे आरोग्य कर्मचार्यांमध्ये संतापाची लाट आहे.
गावात काम करणार्या आरोग्य कर्मचार्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तातडीने दोषींवर कारवाई करावी, अन्यथा येत्या काही दिवसांत आरोग्य कर्मचारी संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जिल्हा सरचिटणीस महावीर उगारे, विभागीय कार्याध्यक्ष लक्ष्मण माने यांनी दिला.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



