rajkiyalive

SANGLI VIDHANSABHA : काँग्रेस, भाजपमध्ये स्पर्धा, घटक पक्ष नामधारीच

SANGLI VIDHANSABHA : काँग्रेस, भाजपमध्ये स्पर्धा, घटक पक्ष नामधारीच

जनप्रवास । अनिल कदम

SANGLI VIDHANSABHA : काँग्रेस, भाजपमध्ये स्पर्धा, घटक पक्ष नामधारीच :  सांगली विधानसभेसाठी काँग्रेस आणि भाजपमध्ये चांगली स्पर्धा निर्माण झाली आहे. काँग्रेसमध्ये शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. दुसरीकडे भाजपमध्ये आमदार सुधीर गाडगीळ यांना थांबवण्यात येणार असल्याच्या चर्चेने इच्छुकांची संख्या वाढली आहे. माजी आ. दिनकर पाटील, लोकसभा प्रभारी शेखर इनामदार, भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांनीही आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहेत.

SANGLI VIDHANSABHA : काँग्रेस, भाजपमध्ये स्पर्धा, घटक पक्ष नामधारीच

लोकसभा निवडणुकीत भाजपला धक्का बसल्याने जिल्ह्यातील काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस सुसाट आहे. सांगली लोकसभा सलग दहा वर्षे भाजपकडे राहिल्यानंतर काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी काँग्रेसचा परंपरागत असलेला बालेकिल्ला पुन्हा हिसकावून घेतला. लोकसभा निवडणुकीत यश मिळाल्याने काँग्रेसमध्ये उर्जितावस्था निर्माण झाली आहे. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुका ऑक्टोबर महिन्यात होत आहेत.

या निवडणुकींना अवघे तीन महिने शिल्लक राहिल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून निवडणुकीची तयारी केली जात आहे. काँग्रेस लोकसभेला अधिक मजबुतीने एकजुट झालेली दिसली. आता हेच वारे विधानसभेला कायम रहावे, असा प्रयत्न इच्छुकांनी सुरु केला आहे. परंतु वातावरण तापू लागताच काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकीवरून चुरस निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे.

काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी 2019 मध्ये पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती.

त्यामध्ये अवघ्या त्यांना साडेसहा हजाराच्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला लागला होता. मात्र पराभवानंतरही जिल्हाध्यक्ष पाटील हे अ‍ॅक्टिव्ह राहिले. लोकसभेचा गुलाल लागताच पाटील यांनी अचूक टायमिंग साधत काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी ‘डिनर पार्टी’ आयोजित करून विधानसभा लढवणार असल्याचे स्पष्ट केले.

पाटील यांनी वेळोवेळी सत्ताधारी महायुतीच्या धोरणाविरोधात आंदोलने मोर्चे काढून निषेध करीत चर्चेत राहिले. अयोध्येतील राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यावेळी सांगलीत अयोध्येची प्रतिकृती उभारून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले होते. याशिवाय पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात सक्रिय असल्याचे यापूर्वीही दिसून आले आहे.

जयश्रीताई पाटील यांनीही अचानकपणे विधानसभा निवडणुकीत उडी मारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

माजी मंत्री स्वर्गीय मदन पाटील यांच्या पत्नी जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील यांनीही अचानकपणे विधानसभा निवडणुकीत उडी मारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जयश्रीताई यांनी लोकसभा निवडणुकीत बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांचा उघडपणे प्रचार केला होता. विधानसभा मतदारसंघात त्यांनी सभा-बैठका देखील घेतल्या. त्यांच्याबरोबर मदनभाऊ युवा मंचचे कार्यकर्ते देखील होते.

त्यामुळे मदनभाऊ प्रेमींनी जयश्रीताई विधानसभेच्या मैदानात, भावी आमदार अशात्यामुळे पोस्ट देखील सोशल मिडियावर शेअर केल्या होत्या. आषाढी एकादशीला अडीचशेहून अधिक नागरिकांना पंढरपूर दर्शन घडविले. त्यामुळे सांगली विधानसभा मतदारसंघात पृथ्वीराज पाटील व जयश्रीताई पाटील यांच्यातअसल्याचे उमेदवारीवरून संघर्ष होणार आहे.

भाजपचे सुधीर गाडगीळ हे दहा वर्षापासून आमदार आहेत. येथे भाजपची ताकद जास्त आहे. या कालावधीत त्यांच्यावर अनेकवेळा आरोप करण्यात आले, मात्र आरोपांना कधी प्रत्त्युत्तर न देता त्यांनी विकासकामांच्या माध्यमातून उत्तर दिले. सलग दुसर्‍यांदा संधी मिळाल्यानंतर साडेचार वर्षात 3 हजार कोटीची विकासकामे मंजूर केली. बहुतांशी कामे पूर्ण झाली. सांगलीत पाचशे बेडच्या हॉस्पिटलच्या बांधकामास मंजुरी मिळवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. कोट्यवधी रुपयांचा निधी आणण्यात हातखंडा आहे.

भाजपमध्ये त्यांच्याकडे स्वच्छ चेहरा म्हणून पाहिले जात असले तरी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न आहे. लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचे मते भाजप पासून दूर गेल्याने विधानसभेला गाडगीळ यांना थांबवण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे भाजपमध्ये इच्छुकांची भाऊ गर्दी होत आहे.

पृथ्वीराज पवार यांनीही विधानसभेच्या निवडणुकीत शड्डू ठोकण्याची तयारी सुरू केली आहे.

स्वर्गीय माजी आमदार संभाजी पवार यांचे पुत्र भाजप किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज पवार यांनीही विधानसभेच्या निवडणुकीत शड्डू ठोकण्याची तयारी सुरू केली आहे. महानगरपालिका क्षेत्रातील प्रश्नांसह शेतकर्‍यांच्या प्रश्नावर वेळोवेळी आंदोलन करून लक्ष वेधून घेत आहेत. सांगलीतील बंधारा, तसेच शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात जोरदार आंदोलन करून विरोध दर्शवला असून भाजपकडून उमेदवारी मिळेल असा आशावाद त्यांना आहे. लोकसभा प्रभारी शेखर इनामदार यांच्यावर पक्षातील वरिष्टांचा विश्वास आहे,

त्यामुळे त्यांचेही नाव पुढे येत आहे. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे यांनीही तयारी केली आहे. माजी आमदार दिनकर पाटील यांनाही भाजपची उमेदवारी आपल्याला मिळेल असा विश्वास आहे. त्यामुळे त्यांच्याकडून ही विधानसभेची रणनीती आखली जात आहे.

महायुतीमध्ये घटक पक्षात असलेला एकनाथ शिंदे यांची शिवसेना शहरात मर्यादित असल्याचे दिसत आहे. सेनेकडून कोणतीही बांधणी केली नसल्याने त्यांच्यासाठी विधानसभेचे मैदान दूरच असल्याचे दिसते. महाविकास आघाडी सोबत असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे अस्तित्व काहीसे असले तरी त्यांचा आवाका मर्यादितच आहे, हे लोकसभेच्या निवडणुकीवरून स्पष्ट झाले. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेले पक्ष नामधारीच असल्याचे दिसत आहे.

भाजपचा डिजिटल नेता

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे हे भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मागील काही वर्षे हजारो लोकांना अमरनाथ यात्रा घडवून लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. अमरनाथ यात्रा असो वा मोहरम यानिमित्ताने शहरात भव्य डिजिटल लावून आता माघार घेणार नसल्याचे सांगतात. मात्र विकास कामे आणि लोकांच्या प्रश्नाकडे फारसे लक्ष नसते. पक्षीय कार्यक्रमांमध्ये विशेष सक्रिय नसलेले डोंगरे निवडणूक आली की उगवतात, अशी चर्चाही भाजपमध्येच रंगली आहे. त्यामुळे डोंगरे हे प्रत्यक्ष निवडणूक लढवणार की शहरातील डिजिटलच्या माध्यमातून हवा करणार हे येत्या काळात समजेल

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज