sangli vidhansabha news : जयश्रीताई, राजेंद्रअण्णा, तमणगौंडाचे डिपॉझिट जप्त : जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांतील 99 उमेदवारांपैकी केवळ सहा पराभूत उमेदवारांची अनामत वाचली आहे. सांगलीत जयश्री पाटील, जतमध्ये तम्मनगौडा रवी पाटील व खानापुरात राजेंद्र देशमुख या बंडखोर उमेदवारांची अनामत जप्त (डिपॉझिट) झाली. शासनाच्या खात्यामध्ये 20 लाख 75 हजार रुपयांची अनामत जमा होणार आहे.
sangli vidhansabha news : जयश्रीताई, राजेंद्रअण्णा, तमणगौंडाचे डिपॉझिट जप्त
उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर मतदारसंघात एकूण झालेल्या मताच्या एकषष्ठांश मते मिळणे गरजेचे आहे. उमेदवाराला तेवढी मते मिळाली नाही, तर त्याची अर्ज भरताना जमा केलेली अनामत रक्कम शासनाकडे जमा होते. या सूत्रानुसार जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांतील 83 पराभूत उमेदवारांना साधारण 34 ते 35 हजार मते मिळणे गरजेचे आहे.
या उमेदवारांचे डिपॉझिट वाचले..
सांगली विधानसभा मतदारसंघातील एकूण 14 उमेदवार रिंगणात उतरले होते. यापैकी काँग्रेसचे पराभूत उमेदवार पृथ्वीराज पाटील यांना 76 हजार 363 मते मिळाल्यामुळे ते अनामत रक्कम वाचविण्यात यशस्वी झाले. पण, काँग्रेस बंडखोर जयश्रीताई मदन पाटील यांना 32 हजार 636 मते मिळाल्यामुळे त्यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. या मतदारसंघातील उर्वरित 11 उमेदवारांचीही अनामत रक्कम जप्त झाली.
खानापूर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे वैभव पाटील यांची अनामत रक्कम वाचली असून, बंडखोर माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांच्यासह 12 उमेदवारांची अनामत जप्त झाली. जत विधानसभा मतदारसंघातही लक्षवेधी लढत झाली असून, तेथेही भाजप बंडखोर तमन्नगोडा रवी पाटील यांना 19 हजार 120 मते मिळाल्यामुळे त्यांची अनामत जप्त झाली. अन्य आठ उमेदवारांचीही अनामत जप्त झाली आहे. आठ विधानसभा मतदारसंघांतील 83 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाल्यामुळे 20 लाख 75 हजार रुपयांची रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा होणार आहे.
अनामत रक्कम कधी जप्त होते ?
उमेदवाराला मतदारसंघातील एकूण वैध मतांच्या एकषष्ठांश म्हणजेच 16.33 टक्के मते किंवा त्यापेक्षा कमी मते मिळाल्यास, त्यांची अनामत रक्कम जप्त केली जाते. याचा अर्थ असा की, ज्या उमेदवाराने 25,000 रुपये किंवा 10,000 रुपये रक्कम जमा केली असल्यास, त्यांना निवडणूक आयोगाकडून कोणताही परतावा दिला जाणार नाही. उदाहरणार्थ- जर विधानसभेच्या जागेवर एकूण 2,00,000 मते पडली, तर सुरक्षा ठेव वाचविण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला एकूण वैध मतांपैकी एक-षष्ठांश मते मिळवावी लागतील. याचा अर्थ प्रत्येक उमेदवाराला 33,332 पेक्षा जास्त मते मिळणे आवश्यक आहे. 2024 विधानसभा निवडणुकीत एकूण उमेदवारांपैकी जवळपास 83.83 टक्के उमेदवारांनी त्यांची अनामत रक्कम गमावली आहे.
विधानसभा मतदारसंघनिहाय उमेदवार
मतदारसंघ – एकूण उमेदवार – अनामत जप्तची संख्या
मिरज 14 – 12
सांगली 14 – 12
इस्लामपूर 12 – 10
शिराळा 06 – 04
पलूस-कडेगाव 11 – 09
खानापूर 14 – 12
तासगाव-क.महांकाळ 17 – 15
जत 11 – 09
एकूण 99 – 83

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



