rajkiyalive

संजयकाका नेटवर्क अन् विकासकामांत बॅकफूटवर

 

 

निवडणुकीच्या तोंडावर चर्चेला उधाण, पक्षांतर्गत विरोधामुळे डोकेदुखी

 

अनिल कदम, जनप्रवास 
लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आली असल्याने राजकीय पक्षांकडून तयारी सुरु झाली आहे. भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांची दुसरी टर्म सुरु आहे. गेल्या नऊ वर्षात खासदारांकडून उठावदार कामगिरी झाली नसल्याची चर्चा रंगली आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठा प्रकल्पही आणता आलेला नाही. उद्योग, व्यवसाय वाढीसाठीही त्यांच्याकडून प्रयत्न झाला नाही. रांजणी येथे ड्रायपोर्टवरुन लक्ष वेधून घेतले मात्र तो होणारच नसल्याने खासदार बॅकफूटवर गेले आहेत. केंद्राच्या निधीतून हजारो कोटीच्या रस्त्यांच्या कामांवरुन सुसाट असल्याचा त्यांच्याकडून बोलबाला असला तरी दिवसेंदिवस पक्षांतर्गंत विरोध वाढला आहे. ग्रामीण भागात स्वतःचा गट आहे, परंतु बळ दिले नाही. महानगरपालिका क्षेत्रातही स्वतःचा गट करण्याकडे दुर्लक्ष झाले, त्यामुळे खासदार नेटवर्क आणि विकासकामांत बॅकफूटवर असल्याचे चित्र सद्यस्थितीत दिसते.

2014 साली लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर संजयकाका पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नऊ वर्षे पूर्ण झाल्यानंतर महाजनसंपर्क अभियान राबविले जात आहे. सांगली जिल्ह्यातही भाजपकडून तयारी केली जात असताना खासदार संजयकाका पाटील यांच्या कामकाजाबाबत चर्चाही जोरदार सुरु आहे. 2014 साली लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर संजयकाका पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना थेट खासदारकीची उमेदवारी दिली. भाजपचा हा विश्वास सार्थ ठरवत त्यांनी वसंतदादा पाटलांचे नातू आणि काँग्रसचे उमेदवार प्रतीक पाटील यांचा पराभव केला. नंतरच्या काळात त्यांनी सांगली जिल्ह्यात भाजप पक्षाचा आणखी विस्तार केला. त्यामुळे 2019 मध्ये भाजपकडून पुन्हा एकदा संजयकाका पाटील यांनाच उमेदवारी देण्यात आली. या निवडणुकीतही त्यांनी स्वाभिमानीच्या विशाल पाटील आणि वंचित बहुजन आघाडीच्या गोपीचंद पडळकर यांना पराभवाची धूळ चारली होती. सलग दोन वेळा खासदारकी मिळाल्यानंतर त्यांच्याकडून केल्या जाणार्‍या विकासकामांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

हेही वाचा

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी

खासदारांनी जोरदार गाजावाजा केलेला ड्रायपोर्ट म्हणजे भुलभूलैय्या असल्याचे उजेडात आले.

खासदारांनी जोरदार गाजावाजा केलेला ड्रायपोर्ट म्हणजे भुलभूलैय्या असल्याचे उजेडात आले. सांगली जिल्ह्यात सलगरे किंवा रांजणी (ता. कवठेमहांकाळ) यापैकी कोठेही ड्रायपोर्ट होणार नसल्याचा धक्कादायक खुलासा जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने माहिती अधिकारात विचारलेल्या प्रश्नावर उघडकीस आले. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट व महाराष्ट्र सरकार यांच्यात एप्रिल 2018 मध्ये सामंजस्य करार झाला होता. त्यानुसार सांगलीतील ड्रायपोर्टच्या विकासासाठी भूसंपादन आणि जेएनपीटीला मदतीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला जमिन अधिग्रणासाठी नोडल एज न्सी म्हणून नामांकित करण्यात आले. सीमा शुल्क विभागाने औद्योगिक वसाहतीची विद्यमान संख्या आणि भविष्यातील आवश्यकतेच्या आधारावर राज्यांचे झोनमध्ये वर्गीकरण केले आहे. त्यानुसार, महाराष्ट्राचा समावेश रेड झोनमध्ये करण्यात आला. मोठ्या संख्येने वसाहती अस्तित्वात असल्याने कोणत्याही नवीन वसाहती किंवा ड्रायपोर्टला परवानगी दिली जाणार नाही असे स्पष्ट केले. पोर्ट ट्रस्टच्या या खुलाशाने अनेक प्रश्न उपस्थित झाले.

काय आहेत खासदारांच्या उणीवा

– खासदारांचा ड्रायपोर्टचा निर्णय फसला,
– कवलापूर विमानतळ मंजुरीसाठी पिछाडीवर,
– पक्षांतील नेत्यांशी जुळवून घेण्यास नकार,
– ग्रामीण भागात काही ठिकाणीच स्वतःचा गट मात्र तो अपुरा
– शहरी भागाला निधी देण्यांकडे दुर्लक्ष
– नऊ वर्षात मोठा प्रकल्प आणता आला नाही
– शहरी भागात भाजपला बळ देता आले नाही
– महानगरपालिका क्षेत्रात स्वतःच्या गटाची उणीव

 

विमानतळासाठी खासदारांनी पर्यायी जागा शोधण्यासाठी आटापिटा केला.

कवलापूर विमानतळासाठी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी प्रयत्न करीत असताना खासदारांनी पर्यायी जागा शोधण्यासाठी आटापिटा केला. सांगली शहराजवळ असलेल्या कवलापूर येथे विमानतळ व्हावे, अशी जिल्हावासियांची इच्छा आहे. याबाबत केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला. कवलापूर विमानतळाला तत्वतः मंजुरी मिळाली, परंतु खासदारांकडून मंजूर असलेल्या जागेला विरोध का झाला, याबाबतही तर्कविकर्त लढविले जात आहेत. केंद्र सरकारच्या माध्यमातून मागील नऊ वर्षात एकही मोठा प्रकल्प आणता आलेला नाही. उद्योग आणि व्यवसाय वाढीसाठीही त्यांच्याकडून म्हणावे तसे प्रयत्न झालेले नाहीत. केंद्र सरकार राष्ट्रीय महामार्गासाठी हजारो कोटी खर्च करीत आहेत, त्या माध्यमातून रस्त्यांसाठी निधी आला. सांगली-पेठ रस्ते कामासाठी म्हणावा तसा पाठपुरावा खासदारांकडून झाला नाही. त्यामुळे विकासकामांमध्येही ते पिछाडीवर आहेत.

पक्षात राहून सोयीची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप

दुसरीकडे भाजप पक्षांतर्गत सुरु असलेली गटबाजी थांबायला तयार नाही. खासदार संजयकाका आणि माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यात अनेक कारणांवरुन सातत्याने वाद उफाळून येतात. पक्षविरोधात कारवाया खासदार गटाकडून सुरु आहेत, पक्षात राहून सोयीची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप अनेकवेळा माजी जिल्हाध्यक्षांनी केला होता. माजी आ. विलासराव जगताप आणि संजयकाका यांच्यातही मतभेद आहेत. गत विधानसभा निवडणुकीत खासदारांनी भाजपचे उमेदवार जगताप यांना पराभव घडवण्यात भूमिका बजावल्याचा आरोप करण्यात आला. सध्याही त्यांचे अशाच प्रकारचे काम सुरुच आहे. त्यामुळे जगताप गट खासदारविरोधात आक्रमक होत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि संजयकाका पाटील यांच्यातील सख्य हे कायमच चर्चेचा विषय असतो. मात्र, संजयकाकांनी राष्ट्रवादीशी जवळीक वाढत असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

हेही वाचा

जयंत पाटील यांच्यापुढे प्रत्येकवेळी नवा उमेदवार

वारसा असूनही… न झालेले आमदार…

सांगा ‘सरकारांनी’ करायचं काय?

खासदार पाटील यांच्याकडून ग्रामीण भागात गट बांधणी झालेली नाही.

पक्षांतील माजी आमदारांचा वाढता विरोध असतानाही खासदार पाटील यांच्याकडून ग्रामीण भागात गट बांधणी झालेली नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्याच्या भरवशावर त्यांची वाटचाल सुरु आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातही त्यांना गट बांधता आला नाही. विरोधी नगरसेवकांवर दोन्ही निवडणुकीत मतांची बेरीज करता आली होती. याशिवाय शहरांच्या विकासांसाठी निधी देण्यात खासदारांचा हात आखडता राहिला आहे. त्यामुळे खासदार नेटवर्क आणि विकासकामांत मागे आहेत. परंतु आगामी निवडणुकीत स्वपक्षीय नेत्यांशी जुळवून घेणार की पुन्हा विरोधी पक्षांतील नेत्यांवर विश्वास ठेवणार हे लवकरच स्पष्ट होईल.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज