जनप्रवास । प्रतिनिधी
संजयकाकांची नाराजांना वगळून स्ट्राँग फिल्डिंग : सांगली ः लोकसभेच्या रणधुमाळी वेगात सुरु असताना प्रचाराला रंग चढत आहे. भाजपचे खासदार संजयकाका पाटील यांनी हॅटट्रिेक साधण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री सुरेश खाडे यांनीही सांगलीच्या विकासासाठी संजयकाकांची गरज व्यक्त केली. भाजपमध्ये काही नाराजी आहे, त्या नाराजांना वगळून पर्यायी नेत्यांमार्फत स्ट्राँग फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. मिरज, सांगलीसह जत विधानसभा मतदारसंघ लक्ष केले आहे. तर खानापूर-आटपाडीत सर्वाधिक मताधिक्यासाठी चंग बांधल्याचे केल्याचे चित्र दिसून येते.
संजयकाकांची नाराजांना वगळून स्ट्राँग फिल्डिंग
खानापूर-आटपाडीत सर्वाधिक मताधिक्याचा चंग
निवडणुकीसाठी राजकीय वातावरण तापत चालले आहे. सांगली जिल्ह्यात तिसर्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान होणार असल्याने रणसंग्रामाला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने राजकीय पक्षांकडून प्रचाराला वेग येत आहे. भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना सलग तिसर्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. संजयकाकांनी हॅटट्रिक करण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. महाविकास आघाडीमध्ये गैरमेळ असताना भाजपमध्येही नाराजीचा सूर आहे. भाजप नेत्यांमध्ये अंतर्गत संघर्ष आहे. माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुखांनी उमेदवारी मागितली होती, याशिवाय खासदार संजयकाका पाटील यांना उमेदवारी देऊ नये, अशी मागणी भाजपमधील काही नेते व पदाधिकार्यांची होती. मात्र पक्षाने पुन्हा संजयकाका पाटील यांच्यावरच विश्वास दाखवला आहे.
संजयकाकांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत सांगलीत प्रचारसभा घेतली. त्यानंतर उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनीही बैठका घेतल्या आहेत. जतचे माजी आ. विलासराव जगताप यांनी नाराजी व्यक्त करीत पक्षाचा राजीनामा दिला आहे. परंतु खासदारांनी जगताप यांच्याकडे दुर्लक्ष करीत जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती तम्मनगौडा रवि-पाटील, डॉ. रविंद्र आरळी, पंचायत समितीचे माजी उपसभापती दिग्विजय चव्हाण, सांगली बाजार समितीचे माजी संचालक अभिजीत चव्हाण यांना सोबत घेवून जगतापांची पोकळी भरुन काढण्याचा प्रयत्न केला आहे.
ऐन निवडणुकीत मिरज मतदारसंघात मिरज पॅटर्नने तोंड वर काढले.
भाजपच्या काही नेत्यांनी विरोधकांना मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मिरज पॅटर्न म्हणजे सर्व काही नसल्याचे संजयकाकांना माहिती आहे. पालकमंत्री डॉ. खाडे यांचाही मोठा गट आहे. याशिवाय खासदारांचा स्वतःचा गटही कार्यरत आहे. सांगली मतदारसंघात आ. सुधीर गाडगीळ यांचे काम चांगले असून त्यांना मानणारा मोठा गट आहे. तसेच शहरातही खासदारांचा गटही कार्यरत आहे. याशिवाय मंत्री चंद्रकांतदादांनी सांगली आणि मिरजेत बैठका घेवून कार्यकर्त्यांना कामाला लागा, अशा सूचना दिल्या आहेत.
पलूस-कडेगावमध्ये माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी उमेदवारी मागितली होती,
परंतु खासदारांनीच पुन्हा बाजी मारली. त्यामुळे प्रचार यंत्रणेत देशमुख हे दिसत नाहीत. उमपुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेला त्यांनी हजेरी लावली. आम्ही पक्षााचे काम प्रामाणिकपणे करुन मताधिक्य देण्याचे जाहीर भाषणात सांगितले. परंतु संजयकाकांनी गाफील न राहता जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांना सोबत घेतले आहे. विधानसभा मतदारसंघातील जबाबदारी संग्रामसिंह यांच्यावर सोपवून जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
हेही वाचा
SANGLI LOKSABHA : जतला विलासराव जगताप दुर्लक्षित, पडळकरांची एंन्ट्री
खानापूर-आटपाडीत महायुतीचे मोठे प्राबल्य आहे.
विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रम्हानंद पडळकर यांनी जोरदार यंत्रणा लावली आहे. स्वर्गीय अनिल बाबर यांचे चिरंजीव सुहास यांच्यावर मदार आहे. त्यांचा मतदारसंघातील प्रत्येक गावागावात गट आहे. थेट लोकांच्या संपर्कात असल्याने त्यांच्याकडून जादा मताधिक्य मिळेल, असा खासदारांना विश्वास आहे. बाबर गटाचे नेते व जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील यांचा आटपाडी तालुक्यात मोठा गट आहे. महायुतीच्या घटक पक्षाचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. या सर्व नेत्यांमुळे संजयकाकांना खानापूर-आटपातून 65 ते 70 हजार मताधिक्याचा विश्वास आहे.
विशाल, चंद्रहार पाटलांमुळे मतविभागणीचा काकांना फायदा
काँग्रेसची उमेदवारी विशाल पाटील यांनाच मिळेल, असे संकेत होते. परंतु शिवसेनेचे चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडली आहे. सांगली लोकसभेची दुहेरी लढत होणे काँग्रेससाठी फायद्याचे ठरेल, असे ढोबळ संकेत होते. तिरंगी लढत झाली तर भाजपला फायदा होऊ शकतो. चंद्रहार आणि विशाल पाटील या दोघांची उमेदवारी कायम राहिल्यास मत विभागणीचा फायदा संजयकाकांनाच होणार असल्याचे स्पष्ट दिसते.

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.