rajkiyalive

शेतकरी संघटनांना फुटीचा शाप

 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी नुकताच पक्षनेतृत्वावर शंका व्यक्त केली आणि पक्षात फुटीचे वारे वाहू लागले. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षात झालेल्या राजकीय भूकंपानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही हादरा बसत आहे.
दिनेशकुमार ऐतवडे, सांगली

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी नुकताच पक्षनेतृत्वावर शंका व्यक्त केली आणि पक्षात फुटीचे वारे वाहू लागले. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षात झालेल्या राजकीय भूकंपानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही हादरा बसत आहे. राजू शेट्टी यांनी सर्व काही आलबेल असल्या चे सांगत असले तरी पक्षात ऑल ईज वेल आहे, असे म्हणता येणार नाही. राज्यातील शेतकरी संघटनांना स्थापनेपासूनच फुटीचा शाप आहे, ऐन निवडणुकीच्या काळात इतर पक्षासारखेच आता शेतकरी संघटनेतही फुटीची लागण झाल्याने संघटनेला आता निवडणुकांपेक्षा पहिल्यांदा पक्षाला सावरावे लागणार आहे.

शेतकरी संघटनेला शेकडो वर्षाची परंपरा

शेतकरी संघटनेला शेकडो वर्षाची परंपरा असली तरी राज्यात आणि भारतात शेतकरी नेते शरद जोशी यांच्या रूपाने शेतकर्‍यांचा एक तारणहार मिळाला. शरद जोशींनी आपली शेतकरी संघटना राज्यातील खेडोपाड्यात पोहोचवली. शरद जोशींनी जागतिकीकरणाचे जोरदार समर्थन केले. महेंद्रसिंग टिकैत हेही उत्तरेमध्ये शेतकर्‍यांना एकत्र करण्यात काही काळ यशस्वी झाले आहेत. परंतु सन 2000 नंतर भारतीय शेतकरी अधिक अडचणीत आल्याचे आणि निराधार बनल्याचे चित्र निर्माण झाले. शेतीमधील खर्च व उत्पन्नाचे गणित बिघडले, या संकटाची योग्य जाणीवच सरकारला प्रारंभी झाली नाही. परिणामी शेतकर्‍यांनी जगण्याची उमेद गमावली. 1997-2007 या कालावधीत देशातील दीड लाखांहून अधिक शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या. त्यांपैकी बहुसंख्य आत्महत्या कर्जबाजारीपणा व नापिकीमुळे झाल्या आहेत.

हेही वाचा

रघुनाथदादा पाटील बी.आर.एस. पक्षात

राजू शेट्टी यांनी ऊस व दूध उत्पादक शेतकर्‍यांना संघटित केले.

शरद जोशींंचा आदर्श घेउन सांगली कोल्हापूर जिल्ह्यात रघुनाथ पाटील, राजू शेट्टी, सदाभाउ खोत, संजय कोले, जयपाल फराटे हे हाडाचे कार्यकर्ते तयार झाले. शेतकर्‍यांच्या हद्यात त्यांनी मानाचे स्थान मिळवले. पश्चिम महाराष्ट्रात ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने ’ चे नेते आमदार राजू शेट्टी यांनी ऊस व दूध उत्पादक शेतकर्‍यांना संघटित केले. 2003 ते 2007 दरम्यान आमदार शेट्टी आणि रघुनाथ पाटील यांनी दूध व ऊस आंदोलनांव्दारे स्वाभिमानी संघटनेला लौकिक तर मिळवून दिलाच, पण राज्य शासनालाही त्यांच्या आंदोलनाची दखल घ्यावी लागली. त्यांनी ऊस उत्पादकांच्या तसेच दुधाच्या दरवाढीसंदर्भात लक्षणीय यश मिळविले 2007 त्यामुळे त्यांची प्रतिमा उजळलीच, पण राज्य पातळीवरही त्यांच्या संघटनेस मान्यता मिळाली.

सध्या सर्वात वरचढ आहे ती राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना.

सध्याच्या घडीला रघुनाथदादांची शेतकरी संघटना, संजय कोले यांची शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना, बी. जी. काका पाटील यांची बळीराजा शेतकरी संघटना, माजी राज्यमंत्री सदाभाउ खोत यांची रयत क्रांती संघटना, धनाजी चुडमुंगे यांची संघटना या कार्यरत आहेतच. पण सध्या सर्वात वरचढ आहे ती राजू शेट्टी यांची स्वाभिमानी शेतकरी संघटना. शेतकरी संघटनेत काम करीत असताना आयुष्यभर आपण केवळ आंदोलनच करायचे काय, असा प्रश्न अनेकांना पडला. सत्तेची खुर्ची प्रत्येकाला खुणावू लागली आणि प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या पक्षाचा आसरा घ्यावा लागला. खुद्द शरद जोशींही यापासून सुटले नाहीत.

राजू शेट्टींना जोरदार जनाधार मिळत गेला

भाजपने शरद जोशींना अचूक हेरले आणि राज्यसभेची खासदारकी बहाल केली. शदर जोशी भाजपच्या वळचणीला गेल्याचे कारण राजू शेट्टी यांना मिळाले आणि त्यांनी त्यांच्या संघटनेपासून फारकत घेत पश्चिम महाराष्ट्रात स्वत:ची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली. त्यांच्या सोबत सदाभाउ खोत, रविकांत तुपकर हेही कार्यकर्ते सामिल झाले. शिरोळ मध्ये जिल्हा परिषद सदस्य असलेल्या राजू शेट्टींना जोरदार जनाधार मिळत गेला आणि ते जिल्हा परिषद सदस्यांपासून आमदार, खासदारपर्यंत मजल मारली. काही काळ त्यांनी सत्तेत सहभागही घेतला. त्यांचे सहकारी सदाभाउंना विधानसभेत आमदारकी आणि मंत्रीपदही मिळाले.

हेही वाचा

हातकणंगलेची उमेदवारी भाजपची डोकेदुखी

सदाभाउ खोत यांना मंत्रीपद मिळाले आणि राजू शेट्टी यांची खासदारकी गेली.

सत्तेची नशा अनेकांना आपल्यापासून दूर नेते हा अनुभव राजू शेट्टींनाही आला. सदाभाउ खोत यांना मंत्रीपद मिळाले आणि राजू शेट्टी यांची खासदारकी गेली. सत्तेत सहभागी असल्यान सरकारविरोधी काही बोलता येईना, आणि कोणतेच आंदोलन करता येईना. साथीदार सदाभाउ खोत खुुद्द कृषीमंत्री असूनही शेतकरी दूर होत गेला. सदाभाउ खोत यांनीही राजू शेट्टी यांच्यापासून फारकत घेतली आणि स्वत:ची रयत शेतकरी संघटना काढली. भाजपनेही आपल्पा पडत्या काळात राज्यातील सर्वच लहान पक्षाना एकत्र करूर प्रत्येकाला आमदारकी आणि मंत्रीपद बहाल केले. परंतु सध्या भाजपला कोणत्याच लहान पक्षाची गरज नसल्याने सदाभाउ सध्या एकटे पडले आहेत. काहीकाही वेळा त्यांच्या तोंडूनही भाजप विरोधी वक्तवे येत आहेत.

रविकांत तुपकर यांनी पक्षनेतृत्वावर शंका व्यक्त करत मनातील खदखद बाहेर काढली

आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मुलुखमैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे रविकांत तुपकर यांनी पक्षनेतृत्वावर शंका व्यक्त करत मनातील खदखद बाहेर काढली आहे. तुपकरांचीही ही काही पहिली वेळ नाही. या अगोरदही त्यांनी पक्ष सोडण्याची तयारी केली होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार असलेल्या यांचीही पक्षविरोधी कारवाया केले म्हणून राजू शेट्टी यांनी हकालपट्टी केली आहे.
शरद जोशींपासून दूर झालेल्या त्यांच्या सहकार्‍यांनी त्यानंतरही आपापल्यापरीने वेगवेगळ्या स्वरूपांतील शेतकरी चळवळी उभ्या करण्याचा प्रयत्न केला. वर्ध्याचे विजय जावंधिया व अकोल्याचे प्रकाश पोहरे यांनी कोणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाच्या जवळ न जाता आपापल्या भागात शेतकर्‍यांच्या प्रश्नांना वाचा फोडली.

शरद जोशींनाही आपल्पा उतारत्या वयात सवार्र्ंना एकत्र पाहणे गरजेचे वाटू लागले.

शरद जोशी यांचे सर्व सहकारी सोडून आपआपल्या भागात आपली स्वत:ची संघटना काढून स्थानिक राजकारण करण्यात यशस्वी होत असताना शरद जोशींनाही आपल्पा उतारत्या वयात सवार्र्ंना एकत्र पाहणे गरजेचे वाटू लागले. त्यांनी तशी सवार्ंना हाकही दिली. सांगलीत एक मोठा मेळावाही झाला परंतु त्यामध्ये त्यांना यश आले नाही.शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथदादा पाटील यांनी नुकताच तेलंगणचे मुख्यमंत्री राजशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएस या पक्षात प्रवेश केला. बीआरएस पक्षाचे ध्येय धोरण शेतकरी हिताची आहेत. त्यामुळे बीआरएस हा पक्षच आता शेतकर्‍यांचा तारणहार बनणार आहे, असे सांगून त्यांनी पक्षात प्रवेश केला.

रविकांत तुपकर सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या संपर्कात

रघुनाथदादा हा काही पहिला पक्ष प्रवेश नाही. या अगोदरही त्यांनी अनेक पक्षात प्रवेश केला आहे. आपचे वारे होते त्यांनी त्यावेळी आपमध्ये प्रवेश केला होता. आपली संपूर्ण आयुष्य ज्या शेतकरी संघटनेत घालवले त्या पक्षाची ध्येय धोरण शेतकरी विरोधी होती काय असा प्रश्न आता निर्माण होत आहे.राजू शेट्टींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक वर्षे महत्वाच्या पदावर काम केलेल्या रविकांत तुपकर यांनी आता पक्ष नेतृत्वावार शंका व्यक्त केली आहे. या मागे खुर्चीचेच कारण असून, दुसरे कोणतेही कारण नाही. रविकांत तुपकर सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या संपर्कात आहेत. त्यामुळे त्यांना कोणतेतरी कारण हवेच होते ते त्यांना मिळाले, एवढेच.

एकंदरीत शेतकरी संघटनेला फुटीचा शाप पहिल्यापासूनच आहे. अनेकांना सत्तेच्या उकळ्या फुटल्याने वारंवार ते निदर्शनास येते हे तुपकर्‍यांच्या वर्चस्वातून अधोरेखीत होत आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज