हजारो गणेशभक्तांची उपस्थिती, पोलिसांचा जागता पहारा, रथोत्सव शांततेत
जनप्रवास तासगाव:
TASGAON GANPATI : गुलाल पेढयांच्या उधळणीत तासगावचा रथोत्सव उत्साहात : गुलाल, पेढ्यांची उधळण मोरया मोरया असा तरुणाईचा जयघोष , व हजारो गणेशभक्तांच्या साक्षीने तासगावचा 245 वा ऐतिहासिक रथोत्सव रविवारी उत्साहात संपन्न झाला. गणेशभक्तांच्या उपस्थितीने तासगाव शहर फूलून गेले होते. सकाळी सहा वाजल्यापासूनच गणपती मंदिरात दर्शनासाठी भक्तांची झुंबड उडाली होती. पटवर्धन संस्थानच्या दीड दिवसाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन पावणे चार वाजता झाले. पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे कोणताही अनुचीत प्रकार न होता रथोत्सव सुरळीत पार पडला. तासगावच्या वाहतूक विभागाने वाहतुकीची उत्तम व्यावस्था ठेवली होती.
TASGAON GANPATI : गुलाल पेढयांच्या उधळणीत तासगावचा रथोत्सव उत्साहात
तासगावचा गणपती उजव्या सोंडेचा असून तो नवसाला पावतो. अशी महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातही ख्याती आहे. गणपती पंचायतन व पटवर्धन संस्थानच्या या रथोत्सवास 245 वर्षांची परंपरा आहे. 96 फूटी गोपुर, तीन मजली ,तीस फुट उंचीचा व चार चाकी रथ गणेशभक्तानी दोरखंडाच्या सहाय्याने ओढण्याची महाराष्ट्रातील एकमेव परंपरा आहे.

सार्वजनिक रथोत्सवाची सुरवात परशुरामभाऊ पटवर्धन यांनी लोकमान्य टिळक यांच्या अगोदरच तासगाव येथून केली होती.
सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्र येऊन हा रथ ओढण्याची परंपरा आहे . कोणताही भेदभाव न होता हा रथोत्सव सामाजिक ऐक्याची प्रेरणा देतो. शनिवारी वाजत गाजत तासगाव संस्थानच्या दीड दिवसाच्या शाडूच्या मातीच्या मातीच्या मुर्तीची मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना झाली. तर रविवारी सकाळी राजवाडयात श्रीमंत राजेंद्र पटवर्धन व डॉ आदिती पटवर्धन यांच्या हस्ते आरती झाली. दुपारी 1 वाजता वादयाच्या गजरात पालखीमधून मातीच्या मुर्तीचे व ऐतिहासिक 125 किलोंच्या पंचधातुच्या मुर्तीचे राजवाडयात आगमन झाले.
पालखीसमोर पारंपारिक गोंधळी, होलार व कैकाडी समाज मानाने वादन करीत होता.
तर संस्थानची गौरी हत्तीण दिमाखात डोलत चालत होती. गणेशमूर्ती मंदिरात आल्यावर तिची विधिवत पूजा अर्चा करण्यात आली. आरती नंतर दोन्ही मुर्त्या पालखीत ठेवण्यात आल्या. संस्थानचा रथ केळीचे खूंट, फुलांच्या माळा व नारळाच्या तोरणानी सजवला होता. नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असल्याने रथास तोरण बांधण्यासाठी गणेश भक्तांची झुंबड उडाली होती.

गणेश मंडळांसह अनेकांनी मंदिराबाहेर प्रसाद वाटपाचे स्टॉल उभारले होते.
रथासमोर अनेक झांज पथक व गोविंदा मंडळानी आपल्या कला सादर करत रथास मानवंदना दिली. मातीच्या व पंचधातुच्या मूर्ती रथामधे ठेवण्यात आली. पटवर्धन कुटुंबियांनी आरती म्हणल्यानंतर 1 वाजून 30 मिनिटांनी रथोत्सवास सुरवात झाली. झांज पथकाचा ठेका, मोरया, मोरया असा जयघोष व गुलाल पेढयांच्या उधळनीत रथ ओढन्यास सुरवात झाली. रथाचे सारथ्य पटवर्धन कुटुंबियांनी केले.
दुपारी 1 नंतर भाविकांमधे वाढ झाली.गणपतीबाप्पा रथात बसून मंदिरापासून 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या काशी विश्वेश्वर मंदिरात आपले वडील भगवान् शंकर यांना भेटण्यास जातात. त्या ठिकाणी दोघांची भेट होते. भेट झाल्यानंतर पंचधातूची व शाडूची मूर्ती कापुर ओढ्यानजीक विहरी पर्यन्त जाते.
त्यानंतर आरती करुण शास्त्रशुद्ध पद्धतीने मातीच्या मुर्तीचे तेथे विसर्जन झाले.
त्यानंतर रथाचा परतीच्या प्रवास सुरु झाला. 5 तास रथोत्सवाची मिरवणूक चालली. व 245 वा तासगावचा ऐतिहासिक रथोत्सव उत्साहात व शांततेत पार पडला. रथोत्सवास उत्पादक शुल्क मंत्री शंभूराजे देसाई, खासदार विशाल पाटील, माजी खासदार संजय पाटील,युवा नेते प्रभाकर पाटील, युवा नेते रोहित पाटील यांनी भेट देऊन पाहणी करत गणेश भक्ताना शुभेछ्या दिल्या

Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.



