rajkiyalive

vidhansabha election 2024 : धोक्यातला पश्चिम महाराष्ट्र महायुतीकडून वार्‍यावर

साखर पट्ट्यात शरद पवारांची पुन्हा पेरणी

जनप्रवास । सांगली
vidhansabha election 2024 : धोक्यातला पश्चिम महाराष्ट्र महायुतीकडून वार्‍यावर : आता विधानसभेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून राज्याच्या राजकारणाला दिशा देणार्‍या पश्चिम महाराष्ट्राच्या ऊस पट्ट्यात महाविकास आघाडीकडून राजकीय पेरणी सुरु आहे. सहकाराची पंढरी समजल्या जाणार्‍या पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पुन्हा कमबॅक केल्याचं दिसून आले. तर भाजपची पिछेहाट झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शरद पवार यांनी सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात जोरदार पुनर्बांधणी करण्याचा चंग बांधला आहे. एक-एक नेते पवारांच्या गळाला लागत आहेत.

vidhansabha election 2024 : धोक्यातला पश्चिम महाराष्ट्र महायुतीकडून वार्‍यावर

कोल्हापुरात समरजित घाटगे, सांगलीत माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी तुतारी हातात घेतली. आणखी काही भाजप महायुतीचे नेते महाविकास आघाडीच्या वाटेवर आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सांगलीत आले मात्र, विकास कामांचे उद्घाटन करून ते निघून गेले. भाजप अथवा महायुतीकडून पक्ष वाढीसाठी काहीच चर्चा झाली नाही, त्यामुळे मागील दहा वर्षे काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला हिसकावणार्‍या भाजपने पश्चिम महाराष्ट्राला वार्‍यावर सोडल्याचे चित्र दिसत आहे.

लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रामध्ये हायहोल्टेज लढती झाल्याचे दिसून आले होते.

त्यामध्ये बारामती, पुणे, कोल्हापूर, माढा, सोलापूर, शिरूर आणि सांगलीचा समावेश होता. 2019 च्या निवडणुकीत भाजपला चार ठिकाणी, शिवसेनेला तीन ठिकाणी आणि राष्ट्रवादीला तीन ठिकाणी विजय मिळाला होता. त्या उलट यंदा चित्र पलटल असून दोन ठिकाणी शिवसेना शिंदे गट, दोन ठिकाणी भाजप, दोन ठिकाणी काँग्रेस, तीन ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि एका ठिकाणी अपक्षाने बाजी मारली. लोकसभा निवडणूकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त जागा जिंकत राज्यात सत्ता आणण्यासाठी महाविकास आगाडीने कंबर कसली आहे. शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील शेतीच्या प्रश्नासह विविध नेत्याच्या नाराजीवर लक्ष केंद्रीत केले आहे. ते सध्या विविध भागात नाराजांसह दुरावलेल्या नेत्यांची मोट बांधत आहेत.

भाजपचे नेते समरजित घाटगे यांनी तुतारी हाती घेतली.

परत एकदा साखर पट्टा असणार्‍या पश्चिम महाराष्ट्राकडे पावले टाकली आहेत. आता विधानसभा काबीज करण्याचेच असे एकच लक्ष महाविकास आघाडीसमोर असल्याने भाजपला कोंडीत पाडणार्‍या नेत्यांचा पक्ष प्रवेश करून घेतला जात आहे. यात भाजपचे नेते समरजित घाटगे यांनी तुतारी हाती घेतली. सांगलीचे अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसला हात दिला आहे. सोलापूरातही मोहिते-पाटलांनी देखील भाजपला रामराम करत तुतारी फुंकली. शरद पवार पुन्हा एकदा भाजपला धक्का देण्यास तयार झाले आहेत. त्यांच्या पक्षात आता राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचाच प्रवेश निश्चित झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधुडाक्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी देखील साखर पट्ट्यात दौरे सुरु केले आहेत. जेष्ठ नेते शदर पवार आणि काँग्रेस नेते राहुल गांधी भाजपला रोखण्यासह साखर पट्ट्यात मविआला मजबूत करण्यासाठी रणनिती आखत आहेत.

गेली दोन दिवस शरद पवार हे सांगली जिल्ह्याच्या दौर्‍यावर होते.

या काळात त्यांनी अनेक ठिकाणी बैठका घेऊन महाविकास आघाडी भक्कम करण्याचा प्रयत्न केला. खानापूर-आटपाडी मतदारसंघातील भाजपमध्ये नाराज असलेले व माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतले. देशमुख यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने सांगली जिल्ह्यात आल्यानंतर पवारांनी भाजपला धक्का दिला आहे. अजितदादा पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील हे ही तुतारी हातात घेण्याच्या तयारीत आहेत. जिल्ह्यातील इस्लामपूर शिराळा आणि तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ हे राष्ट्रवादीचे भक्कम गड मानले जात आहेत. पलूस-कडेगाव काँग्रेससाठी सेफ आहे. जत आणि सांगली विधानसभेवर काँग्रेसने जोरदार तयारी केली आहे. जिल्ह्यात महाविकास आघाडीकडून दमदार तयारी केली जात आहे. या जागांवरील विजय हा निश्चित मानला जात आहे. पवार यांच्याकडून सहयोगी पक्ष असलेले काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शिवसेनेला ही कानमंत्र दिला जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सुसाट असल्याचे दिसते.

दुसरीकडे भाजपमध्ये सर्व काही अलबेल नसल्याचे दिसून येते.

मिरज विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या विरोधात त्यांचे स्वीय सहायक मोहन वनखंडे यांनीच मैदानात उतरण्याचा चंग बांधला आहे. स्वतःचे लोक विरोधात गेल्याने पालकमंत्री डॉ. खाडे यांना विरोधकांकडून खिंडीत गाठण्याचा प्रयत्न आहे. जत मतदारसंघात भाजपमध्ये उमेदवारीवरून मतभेद सुरू झाले आहेत. माजी आमदार विलासराव जगताप यांनी विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उमेदवारीला विरोध केलो. जतमध्ये बाहेरील उमेदवार स्वीकारणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे जत मध्ये भाजपमध्ये फूट पडणार असल्याचे स्पष्ट झाले. सांगली विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार सुधीर गाडगीळ यांनी निवडणूक लढणार नसल्याची भूमिका जाहीर केली होती. मात्र ते पुन्हा सक्रिय झाले आहेत. गाडगीळ यांच्या व्दिधावस्थेतील भूमिकेने सांगली भाजपमधील इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांकडून एक-एक मतदारसंघ मजबूत केला जात आहे.

धोक्यातल्या पश्चिम महाराष्ट्राकडे भाजप नेत्यांनी मात्र दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट दिसत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे शुक्रवारी सांगली जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले होते. रस्त्यांसह विविध विकास कामांच्या उद्घाटनांच्या कार्यक्रमांना गडकरी यांनी हजेरी लावली. मंत्री गडकरी जिल्ह्यात आल्याने राजकीय खलबते होतील, अशी चर्चा भाजपच्या नेत्यांकडून बाळगण्यात आली, मात्र तसे काहीच झाले नाही. गडकरी यांनी विविध कामांच्या उद्घाटनं करून पुन्हा दिल्ली गाठली. जिल्ह्यातील भाजप नेत्याशी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे चित्र समोर आले.

भाजपमध्ये नेमकं चाललंय काय? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

दहा दिवसापूर्वी राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे जिल्हा दौर्‍यावर आले होते. त्यांनी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात जावून निवडणुकीबाबतचा आढावा घेतला. मात्र कोणताही कानमंत्र दिलेला नाही. त्यामुळे भाजपमध्ये नेमकं चाललंय काय? असा सवालही यानिमित्ताने उपस्थित होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून यापूर्वी सांगलीतील नेत्यांना बळ दिले होते. परंतु गेल्या काही वर्षात फडणवीस यांच्याकडूनही पश्चिम महाराष्ट्राकडे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट झाले. गेल्या दहा वर्षात भाजपने पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस राष्ट्रवादीच्या गडाला सुरुंग लवला होता. मात्र सध्या भाजप महायुतीचे दिवस फिरल्याचे चित्र दिसून येत आहे.

भाजप नेते घेताहेत फुंकताहेत तुतारी

पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार पुन्हा एकदा भाजपला धक्का देत आहेत. भाजपचे नेते समरजित घाटगे यांनी काही दिवसांपूर्वी तुतारी हाती घेतली. सोलापूरातही मोहिते-पाटलांनी देखील भाजपला रामराम करत तुतारी फुंकली. त्यांच्या पक्षात आता राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचाच प्रवेश निश्चित झाला आहे. खानापूर-आटपाडी मतदारसंघातील भाजपमध्ये नाराज असलेले व माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांना पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेतले. अजित पवार राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील हे ही तुतारी हातात घेण्याच्या तयारीत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील आमदार बबनदादा शिंदेही अजितदादांना रामराम करुन मोठ्या साहेबांची साथ धरण्याच्या तयारीत असल्याचे चित्र दिसते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज