rajkiyalive

vidhansabha election 2024 : महाविकास आघाडीत सांगली, मिरज व खानापूर-आटपाडीवरून रस्सीखेच

जनप्रवास । प्रतिनिधी
vidhansabha election 2024 : महाविकास आघाडीत सांगली, मिरज व खानापूर-आटपाडीवरून रस्सीखेच विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सांगली, मिरज व खानापूर-आटपाडी या मतदारसंघाच्या जागेवरून काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट व शिवसेना (उबाठा) गटामध्ये रस्सीखेच सुरू आहे. लोकसभेच्या सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच झाली होती. त्याचप्रमाणे या तिन्ही विधानसभा मतदारसंघावरून तिन्ही पक्षात रस्सीखेच असणार आहे. दरम्यान, शिराळा, इस्लामपूर व तासगाव-कवठेमहांकाळ हे मतदारसंघ राष्ट्रवादी शरद पवार गट, पलूस-कडेगाव व जत काँग्रेसला निश्चित होतील.

vidhansabha election 2024 : महाविकास आघाडीत सांगली, मिरज व खानापूर-आटपाडीवरून रस्सीखेच

विधानसभेच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होणार आहेत. तर सप्टेंबरच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या चर्चा सुरू होणार आहे. तिन्ही पक्षाकडून चाचपणी देखील झाली आहे. सांगली लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये बरेच राजकारण झाले. सांगलीची जागा शिवसेना (उबाठा) गटाने मागितली, काँग्रेसने देण्यास नकार दिला, तरी देखील उध्दव ठाकरे यांनी जाहीर सभेत उमेदवार जाहीर करून टाकला. काँग्रेसचे विद्यमान खासदार विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यामुळे लोकसभेचे पडसाद पुन्हा विधानसभा निवडणुकीत जागा वाटपावरून उमटू नयेत, याची दक्षता महाविकास आघाडीतील राज्य व केंद्रीय नेतृत्वाने घेणे आवश्यक आहे.

सांगली जिल्ह्यात विधानसभेचे सांगली, मिरज, जत, तासगाव-कवठेमहांकाळ, खानापूर-आटपाडी, पलूस-कडेगाव, इस्लामपूर, शिराळा हे आठ मतदारसंघ आहेत. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार आहेत. ती जागा त्या पक्षाला देण्याचा निर्णय झाला आहे. तशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे सध्या महाविकास आघाडीचे जिल्ह्यात पाच आमदार आहेत. पलूस-कडेगावची जागा आ. विश्वजीत कदम (काँग्रेस), जतची आ. विक्रमसिंह सावंत (काँग्रेस), तासगाव-कवठेमहांकाळची आ. सुमनताई पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट), इस्लामपूर आ. जयंत पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट), शिराळा आ. मानसिंगराव नाईक (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) या जागा मिळणार आहेत.

 खानापूर-आटपाडी, मिरज व सांगली या तीन मतदारसंघाच्या जागावरून महाविकास आघाडीत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

खानापूर-आटपाडी मतदारसंघाची जागा शिवसेनेची जिंकली होती. त्यामुळे ही जागा पुन्हा शिवसेना (उबाठा) गटाकडे ठेवण्यासाठी उध्दव ठाकरे व संजय राऊत प्रयत्नशील असणार आहेत. मात्र या जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे. तर दुसरीकडे सांगली व मिरजेच्या जागेवरून काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट व शिवसेना (उबाठा) यांच्यामध्ये वाद सुरू आहे. सांगली विधानसभेची जागा प्रत्येकवेळी आघाडीच्या जागा वाटपात कॉँग्रेसकडे असते. पण माजी आमदार दिनकर पाटील यांचा 1999 चा अपवाद वगळता ही जागा काँग्रेसला जिंकता आली नाही. त्यामुळे या जागेवर शरद पवार गट व उध्दव ठाकरे गट दावा करत आहेत.

काँगे्रसला जिल्ह्यात दोनच जागा आहेत.

त्यामुळे त्यांनी सांगली व मिरज या दोन्ही जागा प्राधान्याने मागितल्या आहेत. सांगलीत काँग्रेसचाच उमेदवार असतो. शिवाय लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य मिळाले आहे. ही जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून देखील जागा मागितली जात आहे, प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील देखील भाषणात सांगलीच्या जागेचा दावा करत आहेत. पण त्यांच्या पक्षाची ताकद मर्यादीत आहे. शिवसेनेची देखील तीच परिस्थिती आहे. त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. मात्र मिरजेची जागा राष्ट्रवादी शरद पवार गट किंवा शिवसेना (उबाठा) गटाला मिळण्याची शक्यता आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने आठपैकी चार जागा लढविल्या होत्या.

त्यामुळे या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाला किमान दोन तरी जागा देणे आवश्यक आहे. त्यामुळे मिरजेची जागा शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीने दोनवेळा या मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यामुळे ही जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता कमी आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवसेना (उबाठा) गटामध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.

महाविकास प्राथमिक बैठक आज: 20 ला महत्वपूर्ण बैठक

विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील तीन प्रमुख पक्षांची पहिली प्राथमिक बैठक बुधवार दि. 7 ऑगस्ट होणार आहे. त्यांनतर दि. 20 ऑगस्टची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (उबाठा) गटाचे उध्दव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या बैठकीत जागा वाटपाची एक फेरी पूर्ण होणार आहे.

2019 मध्ये कोणाकडे होते कोणते मतदारसंघ
मतदारसंघ                  आघाडी                        युती
सांगली                       काँग्रेस                        भाजप
मिरज                 स्वा.शे.संघटना                    भाजप
जत                        काँग्रेस                             भाजप
शिराळा           राष्ट्रवादी शरद पवार                 भाजप
इस्लामपूर        राष्ट्रवादी शरद पवार           शिवसेना (उबाठा)
तासगाव-क.महां. राष्ट्रवादी शरद पवार         शिवसेना (उबाठा)
पलूस-कडेगाव       काँग्रेस                           शिवसेना (उबाठा)
खानापूर-आटपाडी      अपक्ष                        शिवसेना (उबाठा)

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज