rajkiyalive

VISHWAJIT KADAM : सांगलीतील उमेदवार ठरविणार विश्वजित कदम

जनप्रवास । प्रतिनिधी

VISHWAJIT KADAM : सांगलीतील उमेदवार ठरविणार विश्वजित कदम : सांगली लोकसभेच्या निवडणुकीत किंगमेकर ठरलेले काँग्रेसचे आ. विश्वजीत कदम यांचे दिल्ली दरबारी वजन वाढले आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचे काम त्यांच्याकडून होत असते. त्यांना आता विधानसभेची मोठी जबाबदारी हायकमांडने दिली आहे. सांगली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघांसह आणखी काही जिल्ह्यामध्ये उमेदवार ठरविण्याचे अधिकार त्यांना दिले आहेत.

VISHWAJIT KADAM : सांगलीतील उमेदवार ठरविणार विश्वजित कदम

दिल्ली दरबारी वजन वाढले: विधानसभेची मोठी जबाबदारी

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हायकमांडने राज्यातील नेत्यांवर लोकसभा मतदारसंघांची विभागनिहाय जबाबदारी टाकण्याचा प्रयोग केला होता. तो प्रयोग यशस्वी झाला असल्याने आता आागमी विधानसभा निवडणुकीत नेत्यांवर विभागनिहाय मतदारसंघांची जबाबदारी टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आ. बाळासाहेब थोरात, आ. विश्वजीत कदम, आ. सतेज पाटील, आ. अमित देशमुख, खा. वर्षा गायकवाड यांच्यासह काही नेत्यांवर विभागनिहाय जबाबदारी दिली आहे. विधानसभेला हे विभागीय नेते किंवा जिल्ह्यातील नेतृत्व जे उमेदवार सांगतील त्या उमेदवाराला काँग्रेसची उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे आ. विश्वजीत कदम यांच्यावर जबाबदारी वाढली आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी म्हणून त्यांनी मुंबई, दिल्ली दरबारी प्रयत्न केले होते. मात्र त्यांना अपयश आले होते. तरी देखील त्यांनी विशाल पाटील यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून विजयासाठी फिल्डिंग लावली होती. यामुळे विशाल पाटील यांचा विजय सोपा झाला, त्यानंतर अवघा दोन दिवसातच खा. विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यामुळे आ. विश्वजीत कदम यांचे दिल्ली दरबारी वजन वाढले आहे. आता विधानसभेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे.

सांगली जिल्ह्यात सांगली, पलूस-कडेगाव, जत या विधानसभा मतदारसंघाबरोबर काँग्रेस खानापूर-आटपाडी व मिरज या मतदारसंघासाठी आग्रही आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात जिल्ह्यातील जास्तीत जास्त मतदारसंघ काँग्रेसकडे राखण्यासाठी त्यांचे प्रयत्न असणार आहेत. शिवाय काँग्रेसचे उमेदवार निश्चित करणे, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी देखील त्यांच्या खांद्यावर आहे. सांगलीसह शेजारी असलेल्या सोलापूर, सातारा, पुणे जिल्ह्यासह विभागाची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे.

विधानसभेसाठी काँग्रेसने फुंकले रणशिंग 10 ऑगस्टपर्यंत इच्छुकांकडून मागवले अर्ज

लोकसभेत राज्यात जोरदार कमबॅक केल्यानंतर विधानसभेसाठी काँग्रेसने बांधणी सुरू केली आहे. त्यासाठी राज्यातील 288 मतदारसंघात चाचपणी सुरू केली आहे. सांगली जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघातून इच्छूक असलेल्या उमेदवारांचे अर्ज मागविले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेसचे इच्छूक आता तयारीसाठी लागणार आहेत.

राज्यातील लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला चांगले यश मिळाले. त्यामुळे काँग्रेसने राज्यातील 288 विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांकडून अर्ज मागवले जाणार आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगली लोकसभेची जागा काँग्रेसला हवी होती. मात्र ही जागा काँग्रेसला मिळाली नाही. तरी देखील आ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली खा. विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष आ. विक्रम सावंत, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील या पाच नेत्यांनी जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची एकी केली. अपक्ष म्हणून विशाल पाटील लढले आणि निवडून आले. मतदारसंघातील सहा पैकी पाच मतदारसंघात खा. विशाल पाटील यांना मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे.

पलूस-कडेगाव व जत विधानसभा मतदारसंघात सध्या काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. सांगली देखील काँग्रेसचा मतदारसंघ आहे. या ठिकाणी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील इच्छूक आहेत. खानापूर-आटपाडी मतदारसंघातून डॉ. जितेश कदम इच्छूक आहेत. याबरोबर मिरज मतदारसंघावर देखील काँग्रेस दावा करण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाने आता इच्छुकांचे अर्ज मागवले आहेत. दि. 10 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. जिल्हा काँग्रेस कमिटीकडून प्रदेश काँग्रेसला अर्ज जाणार आहेत. त्यामुळे कार्यकर्ते देखील आता रिचार्ज होणार आहेत.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज