rajkiyalive

HATKANANGALE LOKSABHA : आवाडेंच्या भूमिकेने धैर्यशील मानेंच्या उमेदवारीपुढे प्रश्नचिन्ह

जनप्रवास । दिनेशकुमार ऐतवडे

HATKANANGALE LOKSABHA : आवाडेंच्या भूमिकेने धैर्यशील मानेंच्या उमेदवारीपुढे प्रश्नचिन्ह : लोकसभा निवडणूक जसजसे जवळ येउ लागले आहे तसे राजकारण तापले जावू लागले आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघात माजी खासदार राजू शे्ट्टी यांनी एकला चलोरेची भूमिका घेवून प्रचारही सुरू केला आहे. महाविकास आघाडी अजूनही उमेदवारीच्या शोधात आहे तर महायुतीमध्ये जागा शिवसेना शिंदे गटाकडे गेल्यास धैर्यशील माने यांची उमेदवारी पक्की आहे, भाजपकडे गेल्यास उमेदवारीसाठी झुंबड उडणार आहे. सध्या आमदार प्रकाश आवाडेंनी मात्र राजू शेट्टी आणि धैर्यशील माने दोघांवरही टीकास्त्र सोडले आहे.

HATKANANGALE LOKSABHA : आवाडेंच्या भूमिकेने धैर्यशील मानेंच्या उमेदवारीपुढे प्रश्नचिन्ह

राज्यात कोणत्याही परिस्थितीत 45 प्लस उमेदवार निवडून आणायचे असा चंग भाजपने बांधला आहे. त्यासाठी त्यांनी प्रत्येकाचे स्वागत भाजपमध्ये करीत आहेत. राज्यातील मोठ मोठे नेते भाजपच्या गळाला लागले आहेत. नुकतेच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही भाजपचा मफलर गळ्यात टाकला आहे. जयंत पाटील यांच्यावरही भाजपचा डोळा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि माढा या चार लोकसभा मतदार संघात भाजपला कोणतीही रिस्क घ्यायची नाही, त्यामुळे भाजप ताकही फुंकून पित आहे.

सध्या हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे नेतृत्व खास. धैर्यशील माने करीत आहेत.

गेल्या निवडणुकीत महिनाभरापूर्वी त्यांनी मातोश्रीवर जावून हातात शिवबंधन बांधले आणि एका महिन्यात खासदार झाले. राजू शेट्टी यांच्या खासदारकीची हॅटट्रीक त्यांनी चुकवली. त्यानंतर राजकारणातील पुलाखालून बरेच पाणी गेले. शिवसेना फुटली शिंदे गट भाजपला जावून मिळाला. धैर्यशील मानेंनेही एकनाथ शिंदे यांना साथ दिली. हातकणंगले ही जागा पहिल्यापासून शिवसेनेकडे आहे. त्यामुळे येथे शिंदे गटाचे धैर्यशील माने यांची उमेदवारी पक्की आहे. त्यांनी प्रचारही सुरू केला आहे. परंतु त्यांना महायुतीमधील नेतेच विरोध करीत आहेत.

इचलकरंची विधानसभा मतदार संघांचे विद्यमान आमदार प्रकाश आवाडे हेही भाजपचे सहयोगी सदस्य आहेत.

त्यांनीही आपल्या मुलासाठी राहूल आवाडेसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. कोणत्याही परिस्थितीत ही जागा भाजपच्या वाट्याला घ्यायची आणि राहूल आवाडेंचा खासदारकीचा मार्ग सुकर करायचा त्यांनी चंग बांधला आहे. धैर्यशील मानेंशी त्यांनी उघडउघड पंगा घेतला आहे. गेल्या निवडणुकीत इचलकरंची विधानसभा मतदार संघात इंचलकरंजी मतदार संघातून मानेंना 73 हजाराचे लीड मिळाले होते. यामागे प्रकाश आवाडे होते हे आता लपून राहिले नाही.

या अगोदरही आवाडे घराण्यांनी या मतदार संघांचे नेतृत्व केले आहे.

कल्लापाण्णा आवाडे या अगोदर या मतदार संघातून निवडून येत होते. तसेच बाळासाहेब मानेंनेही या मतदार संघाचे कित्येकदा नेतृत्व केले आहे. त्यानंतर निवेदिता माने याही दोन वेळा खासदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यामुळे या मतदार संघात माने आणि आवाडे यांना मानणारा मोठा गट आहे. तसे ते पारंपरिक एकमेकांचे विरोधक. पण महायुतीमध्ये सध्या दोघेही एकाच विचारधारेत आले आहेत. परंतु सध्या खरी अडचण आहे ती उमेदवारी मिळविण्याची.

महायुतीकडे धैर्यशील माने, राहूल आवाडे, माजी आमदार हाळवणकर, माजी मंत्री सदाभाउ खोत यांनी उमेदवारीची मागणी केली आहे.

मुळात पहिला जागा कोणाकडे जाते हे पहावे लागेल. त्यानंतर उमेदवारीचा घोळ मिटणार आहे. ऐनवेळी जर कोणी मोठी नेता भाजपमध्ये आला तर त्याचाही विचार भाजपला करावा लागणार आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी झुंबड उडणार यात शंका नाही.

परंतु उमेदवारीची काहीही होवू द्या प्रकाश आवाडे यांनी रूद्रावतार धारण केला आहे.

राजू शेटृटी आणि धैर्यशील माने यांना त्यांनी उघडउघड विरोध केला आहे. कोणत्याही परिस्थिती राहूल आवाडे यांना राजकारणात पुढे चाल द्यायचीच असा चंग त्यांनी बांधला आहे. एकंदरीत त्यांच्या या भूमिकेने धैर्यशील मानेंच्या उमेदवारीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे हे नक्की..

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज