farmars news : सांगली जिल्ह्यातील 38 हजार शेतकर्‍यांना पहिल्या यादीत कर्जमाफी

SHARE:

farmars news : सांगली जिल्ह्यातील 38 हजार शेतकर्‍यांना पहिल्या यादीत कर्जमाफी : मागील काही महिन्यांपासून प्रतिक्षेत असलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ची सांगली जिल्ह्यातील 37 हजार 865 शेतकर्‍यांची पहिली यादी शनिवारी प्रसिद्ध झाली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्वाधिक 34 हजार तर राष्ट्रीयीकृत बँकांतील 3 हजार 865 शेतकर्‍यांची नावे यादीत आहेत. पहिल्या यादीत जत तालुक्यातील सर्वाधिक 11 हजार 518 शेतकर्‍यांची नावे आहेत. शेतकर्‍यांना प्रत्यक्षात किती रकमेची कर्जमुक्ती झाली, याबाबतची माहिती अद्याप संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेली नाही. यादीत नाव समाविष्ट असलेल्या शेतकर्‍यांना आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे. दरम्यान नियमित शेतकर्‍यांना पुन्हा प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले.

farmars news : सांगली जिल्ह्यातील 38 हजार शेतकर्‍यांना पहिल्या यादीत कर्जमाफी

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सर्वाधिक 34 हजार शेतकर्‍यांचा समावेश, शेतकर्‍यांना आधार प्रमाणीकरण करावे लागणार, नियमित कर्जदार शेतकरी वेटींगवर

राज्य सरकारच्या अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकर्‍यांची माहिती शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती. जिल्हा बॅँकेचे थकबाकीदार शेतकरी तब्बल 50 हजार 60 असून, त्यांच्याकडे मुद्दल 408.91 कोटी रुपये, व्याज 111.15 कोटी रुपये आहे. एकूण थकबाकी 520 कोटी 7 लाख रुपये आहे. नियमित कर्जफेड करणारे 1 लाख 77 हजार आहेत. जिल्ह्यातील कर्ज खात्यांची तपासणीही जवळपास पूर्ण झाली. खरीप हंगामात कर्जमाफी होईल, अशी शेतकर्‍यांची अपेक्षा होती. परंतु तसेच झाले नाही.

गेल्या काही दिवसांपासून कर्जमाफीबाबत उलटसुलट चर्चा सुरु होती. विरोधकांकडून राज्य सरकारवर टीकेची झोड उठविण्यात आली. त्यानंतर जुलैअखेर शेतकर्‍यांना कर्जमुक्ती देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले होते. चार दिवसांपूर्वी सातारा आणि पुणे जिल्ह्यातील काही शेतकर्‍यांची यादी प्रसिद्ध केली होती. परंतु सांगली जिल्ह्यातील शेतकर्‍यांची यादी प्रतिक्षेत होती. त्यामुळे राज्य शासनाच्या कर्जमुक्तीच्या यादीकडे जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे लक्ष लागले होते. सहकार विभागाकडून अखेर जिल्ह्यातील कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकर्‍यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यात आली.

जिल्ह्यातील 37 हजार 865 शेतकर्‍यांचा पहिल्या यादीत समावेश आहे. जिल्हा बँकेचे सर्वाधिक 34 हजार तसेच राष्ट्रीयीकृत बँकांतील 3 हजार 865 शेतकर्‍यांची नावे यादीत आहेत. पहिल्या यादीत जत तालुक्यातील सर्वाधिक 11 हजार 518 शेतकर्‍यांची नावांचा समावेश आहे. याशिवाय शिराळा तालुक्यातील 1425, सांगली अप्पर तहसिलदार कार्यालय 17, वाळवा 3481, मिरज 5403, आटपाडी 1725, कवठेमहांकाळ 2872, खानापूर 1617, पलूस 2516, कडेगाव 1795 आणि तासगाव तालुक्यातील 5496 शेतकर्‍यांचा यादीत समावेश आहे.

यादीत नावे असलेल्या शेतकर्‍यांना प्रत्यक्षात किती रकमेची कर्जमुक्ती झाली, याबाबतची माहिती अद्याप संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेली नसल्याचे सहकार विभागाच्यावतीने सांगण्यात आले. पात्र शेतकर्‍यांची यादी ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय तसेच विकास सेवा सोसायटीमध्ये प्रसिद्ध आली. यादीत नाव समाविष्ट असलेल्या शेतकर्‍यांना आधार प्रमाणीकरण करावे लागणार आहे.

या योजनेंतर्गत पात्र शेतकर्‍यांना मुद्दल आणि व्याजासह प्रति शेतकरी 2 लाख रुपयांपर्यंत थेट कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. यात मार्च 2026 अखेर थकीत असलेल्या कर्जाचा समावेश आहे. त्याचबरोबर नियमित कर्जफेड करणार्या शेतकर्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ दिला जाणार आहे. या योजनेअंतर्गत 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2026 या कालावधीत घेतलेल्या थकीत असलेल्या अल्पमुदत पीक कर्जासाठी मुद्दल व व्याजासह जास्तीत जास्त दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. ज्या शेतकर्‍यांची दोन लाख रुपयांहून अधिक थकबाकी आहे. अशा शेतकर्‍यांसाठी एकवेळ समझोता योजनेची तरतूद केली आहे. दरम्यान नियमित कर्जदार शेतकर्‍यांचा पहिल्या यादीत समावेश नाही, त्यामुळे त्यांना प्रतिक्षा करावी लागणार असल्याचे स्पष्ट झाले.

शेतकर्‍यांनी आधार प्रमाणीकरण करावे ः डॉ. मैनाक घोष, सुनिल चव्हाण
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची जिल्ह्यातील शेतकर्‍यांची पहिली यादी प्रसिद्ध झाली आहे. पात्र शेतकर्‍यांची यादी ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय तसेच विकास सेवा सोसायटीमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे. यादीत नाव असलेल्या शेतकर्‍यांनी तत्काळ आधार प्रमाणीकरण करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष आणि जिल्हा उपनिबंधक सुनिल चव्हाण यांनी केले आहे.

कर्जमाफीचे तालुकानिहाय शेतकरी (जिल्हा बँक व राष्ट्रीयीकृत बँक)
– तालुका शेतकरी संख्या
– जत 11,518
– शिराळा 1,425
– सांगली अप्पर 17
– वाळवा 3,481
– मिरज 5,403
– आटपाडी 1,725
– क.महांकाळ 2,872
– खानापूर 1,617
– पलूस 2,516
– कडेगाव 1,795
– तासगाव 5,496
– एकूण 37,865

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *