kasbe digraj news : कसबे डिग्रज दिंडीतील चार महिला वारकर्‍यांचा दुर्दैवी मृत्यू

SHARE:

kasbe digraj news : कसबे डिग्रज दिंडीतील चार महिला वारकर्‍यांचा दुर्दैवी मृत्यू : जेजुरी, ता. पुरंदर : विठुरायाच्या दर्शनासाठी भक्तिभावाने निघालेल्या वारकर्‍यांवर सोमवारी सकाळी जेजुरीजवळ काळाने घाला घातला. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वासकर महाराज (कसबे डिग्रज) दिंडीवर बेलसर फाटा, राजवाडा लॉजसमोर झालेल्या भीषण अपघातात चार महिला वारकर्‍यांचा दुर्दैवी मृत्यू, तर सात महिला जखमी झाल्या. या हृदयद्रावक घटनेने संपूर्ण वारकरी संप्रदायासह सांगली जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

kasbe digraj news : कसबे डिग्रज दिंडीतील चार महिला वारकर्‍यांचा दुर्दैवी मृत्यू

जेजुरीत आषाढी वारीवर काळाचा घाला;

कसबे डिग्रज, मिरजवाडी, कवलापूर, मालगाव, आष्टा, दुधगाव, नांद्रे आदी भागांतील वारकरी दरवर्षीप्रमाणे यंदाही ज्ञानोबा-तुकारामचा गजर करत पंढरीच्या वाटेवर निघाले होते. 140 वारकर्‍यांचा हा भक्तिमय प्रवास सुरू होता. त्यामध्ये 60 महिला आणि 80 पुरुष वारकरी सहभागी होते. मात्र सोमवारी सकाळी साडेसातच्या सुमारास जेजुरीजवळ झालेल्या अपघाताने आनंदाच्या या वारीवर दुःखाची गडद छाया पसरली.

या भीषण अपघातात नंदा बाबुराव पवार (वय 60, कवलापूर), माधवी राजाराम सलगरे (वय 55, मालगाव), राजश्री शंकर भोसले (वय 55, कसबे डिग्रज) आणि शांता शिवाप्पा अलकोपर (वय 70, मिरजवाडी) या चार महिला वारकर्‍यांना आपले प्राण गमवावे लागले. विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या या माऊलींचा प्रवास कायमचाच थांबल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या अपघातात कासाबाई जगन्नाथ गस्ते (आष्टा), लक्ष्मी विठ्ठल गडदे (नांगोळे), अक्काताई बबन कोळी (शिरगाव), शैलजा दिनकर जगताप (कवलापूर), गीताबाई सदाशिव हंकारे (कसबे डिग्रज), मंगल विलास पाटील (कवलापूर) आणि महानंदा विनायक राजमाने (कसबे डिग्रज) या सात महिला जखमी झाल्या असून, त्यांच्यावर जेजुरी येथील आनंदी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

ही 21 दिवसांची वारी असून दिंडी 8 जुलै रोजी श्रीक्षेत्र आळंदी येथून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली होती. 25 जुलै रोजी पंढरपूर येथे पोहोचण्याचे नियोजन होते. एकादशीनंतर सर्व वारकरी आपल्या गावी परतणार होते. मात्र त्याआधीच नियतीने हा अकल्पित आघात केला.

वारकरी संप्रदायात सेवा, समता आणि भक्तीचा संदेश देणारी वारी ही आनंद, श्रद्धा आणि अध्यात्माचा सोहळा मानली जाते. पण जेजुरीतील या दुर्घटनेने विठ्ठलनामाच्या गजरात अश्रूंची वेदना मिसळली आहे. ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषात चालणार्‍या पावलांना आज दुःखाने थांबावे लागले. चार वारकरी माऊलींच्या अकाली निधनाने संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत असून, जखमी वारकरी लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना सर्वत्र केली जात आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *