shetfle news : शेटफळे येथील वृद्धेला आर्थिक वादातून नात जावयानेच पेटवून मारले

SHARE:

shetfle news : शेटफळे येथील वृद्धेला आर्थिक वादातून नात जावयानेच पेटवून मारले : आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे एका वृद्धेच्या घरात घुसून दागिने लुटत तिला पेटवून देत गंभीर जखमी केल्याचा प्रकार घडला होता. यामध्ये मालन मारुती जाधव (वय 85) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोणताही पुरावा तसेच सीसीटिव्ही नसताना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने कौशल्य पणाला लावून आव्हानात्मक गुन्ह्याचा छडा लावला.

shetfle news : शेटफळे येथील वृद्धेला आर्थिक वादातून नात जावयानेच पेटवून मारले

स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने आव्हानात्मक गुन्ह्याचा केला उलगडा : संशयित तरुण जेरबंद

आर्थिक आणि जमिनीच्या वादातून नात जावयाने हे भयानक कृत्य केल्याचे तपासात उघड झाले. या प्रकरणी संशयित जावई राजेश दिलीप गायकवाड (वय 30, रा. बलवडी, ता. खानापूर) याला अटक केली आहे. या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याबाबत सखोल सुरु असल्याची माहिती पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिली.

या घटनेची माहिती अशी, मृत मालन जाधव या शेटफळे येथे एकट्याच राहत होत्या. दि. 30 जून रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञातांनी त्यांच्या घरात घुसून त्यांच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना पेटवून दिले तसेच त्यांचे दागिने लुटले. उपचार सुरु असताना मालन जाधव यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर आटपाडी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. परंतु परिस्थितीजन्य कोणताच पुरावा पोलिसांच्या हाती लागला नाही. तसेच सीसीटिव्ही परिसरात नसल्याने चोरट्याचा देखील काहीच ठावठिकाणा कळला नाही.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तपासाची सूत्रे हाती घेतली. मयत मालन जाधव यांना तीन मुले, एक मुलगी तसेच नातवंडे आणि नात सून असा परिवार होता. कुटुंबातील सदस्यांसमवेत तसेच माहेरील लोकांसमवेत मालन यांचे पटत नव्हते. त्यामुळे बर्‍याच वर्षापासून विभक्त राहून त्या उदर निर्वाह करीत होत्या. मालन यांच्या नावावर त्यांचे माहेर असलेल्या बलवडी (ता. खानापूर) येथे आणि शेटफळे गावी त्यांची शेतजमीन आहे. सदरची जमीन तिने मुलांना न देता नातू प्रविण जाधव याच्या नावावर केली होती.

त्यामुळे कुटुंबातील सदस्य त्यांच्यावर चिडून होते. मागील दिड महिन्यापासून मालन या त्यांचा नातू प्रविण जाधव राहत असलेल्या घरातील एका खोलीत राहण्यास होत्या. दि. 30 जून रोजी पहाटेच्या सुमारास मयत मालन हिच्या नातीचा नवरा राजेश गायकवाड हा तिच्या घरात घुसला. त्याने त्यांना मारहाण करुन त्यांच्या अंगावरील सोने – चांदीचे दागिने जबरदस्तीने काढून घेतले. यावेळी तिने प्रतिकार केला असता त्याने मालन जाधव यांना पेटवून दिले.वृध्देला जिवंत जाळल्यानंतर आरोपीने तेथून पलायन केले होते. फिर्यादी विठ्ठल जाधव यांनी मालन यांना तातडीने प्राथमिक उपचार केंद्रात दाखल केले.

तेथून त्यांना सांगलीतील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. पोलीस मालन जाधव यांच्यापर्यत पोहोचेपर्यत गंभीररित्या भाजल्यामुळे त्या बेशुध्द पडल्या होत्या. त्यामुळे त्यांचा जबाब नोंदविण्यात आला नाही. साहजिकच आरोपीच्या संबंधी कोणतीच माहिती पोलिसांना मिळाली नाही. बेशुध्द होण्यापूर्वी मालन यांनी नातेवाईकांशी संपर्क साधला होता. त्या ऐकीव माहितीवरच पोलिसांनी तपास केला.

तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी नात जावई राजेश गायकवाड यास ताब्यात घेवून चौकशी केली. त्यावेळी त्याने वृध्देला पेटवून दिल्याची कबुली दिली. दागिने देण्यास विरोध केल्याने पेटवून दिल्याचे कारण या कृत्यामागे नसावे असा पोलिसांना अंदाज आहे. त्यामुळे त्या दृष्टीने तपास सुरु केल्यावर जमिनवादातील आर्थिक कारणातूनच वृध्देला पेटवून दिल्याचे पोलीस तपासात पुढे आल्याचे समजते.

सदर घटनेचा तपास पोलीस अधिक्षक तुषार दोशी आणि अपर पोलीस अधिक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक संजीव झाडे आणि संतोष पवार यांच्यासह सहाय्यक निरिक्षक प्रशांत निशानदार, उपनिरिक्षक कुमार पाटील, फौजदार संजय पाटील, अंमलदार उदय साळुंखे, अतुल माने, सुशांत चिले, विजय पाटणकर आदींनी केला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *