jayant patil news : देवस्थान जमिनींचे रॅकेट, स्मार्ट मीटर आणि सरकारवर जयंत पाटील यांचा जोरदार हल्लाबोल : विटा येथील म्हसोबा सिद्ध देव, रेवणसिद्ध देव, त्र्यंबकेश्वर देव आणि सीतारामचंद्र देवस्थानांच्या कोट्यवधी रुपयांच्या इनामी जमिनी भूमाफियांनी बेकायदेशीररीत्या विकल्याचा आरोप आ. जयंत पाटील यांनी विधीमंडळात केलाा. देवस्थानांच्या जमिनींवर डल्ला मारणार्या भूमाफिया आणि संबंधित अधिकार्यांवर कठोर कारवाई करून हिंदू देवस्थानांच्या संरक्षणाबाबत सरकारने कृतीतून संदेश द्यावा, असेही ते म्हणाले.
jayant patil news : देवस्थान जमिनींचे रॅकेट, स्मार्ट मीटर आणि सरकारवर जयंत पाटील यांचा जोरदार हल्लाबोल
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते यांनी विधानसभेत नियम 293 अंतर्गत झालेल्या चर्चेत राज्य सरकारवर विविध
मुद्द्यांवर जोरदार टीका केली. देवस्थानांच्या इनामी जमिनींतील कथित घोटाळे, वक्फ व देवस्थान जमिनींचे रॅकेट, स्मार्ट मीटर योजना आणि हिंदुत्वाच्या राजकारणावर त्यांनी सरकारला धारेवर धरले.
भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी मुख्यमंत्री निवडणूक प्रचारादरम्यान म्हणत असलेल्या जागो तो इक बार हिंदू जागो तो… या गाण्याचा उल्लेख करत, आज खर्या अर्थाने हिंदूंना जागे होण्याची गरज आहे, असे सांगितले. जयंत पाटील यांनी यांच्या नावावरील सुमारे 4,121.14 एकर इनामी जमिनीमध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोप केला. निजाम काळात देण्यात आलेल्या या जमिनींची कायद्यानुसार खरेदी-विक्री होऊ शकत नसतानाही महसूल अधिकारी आणि काही राजकीय व्यक्तींनी संगनमताने हजारो एकर जमीन हडप केल्याचा दावा त्यांनी केला.
राज्यात देवस्थानांच्या जमिनी बळकावण्याचे संघटित रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप करत त्यांनी विशेषतः बीड आणि सांगली जिल्ह्यातील अनेक प्रकरणांकडे सरकारचे लक्ष वेधले. यापूर्वी सभागृहात कारवाईचे आश्वासन देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याची टीकाही त्यांनी केली.
बीड जिल्ह्यातील चिंचेपूर (ता. आष्टी) येथील मशीद व दर्ग्याच्या इनामी जमिनीच्या प्रकरणाचाही त्यांनी उल्लेख केला. बनावट ’खालसा’ आदेशाच्या आधारे जमीन बेकायदेशीररीत्या हस्तांतरित करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच जामखेड परिसरातील मौल्यवान इनामी जमिनी अकृषिक करून प्लॉटिंगद्वारे कोट्यवधी रुपयांची विक्री झाल्याचाही त्यांनी दावा केला.
या प्रकरणात विशेष तपास पथकाच्या चौकशीत 95 बनावट खालसा आदेश उघड झाल्याचे सांगत, मुख्य सूत्रधाराला तातडीने अटक करावी आणि विभागीय आयुक्तांकडे प्रलंबित पुनरीक्षण प्रक्रिया निश्चित कालमर्यादेत पूर्ण करून जमिनी मूळ देवस्थान किंवा संस्थांकडे परत वर्ग कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी त्यांनी राज्यातील स्मार्ट मीटर योजनेवरही तीव्र आक्षेप घेतला. महावितरणमार्फत सुरू असलेल्या या प्रकल्पामुळे सर्वसामान्य नागरिक, घरगुती ग्राहक आणि व्यापार्यांमध्ये तीव्र नाराजी असल्याचा दावा त्यांनी केला. आपल्या मतदारसंघातील आष्टा येथे घरमालकांच्या अनुपस्थितीत स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न झाल्याचा उल्लेख करत, नागरिकांनी तो हाणून पाडल्याचे ते म्हणाले.
देशातील 100 स्मार्ट सिटींचे काय झाले, हे सर्वांनी पाहिले आहे. त्याचप्रमाणे स्मार्ट मीटर योजना देखील जनतेवर लादू नये. सरकारने जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवू नयेत आणि तसे आदेशही काढू नयेत, अशी मागणी जयंत पाटील यांनी सभागृहात केली.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










