sangli dcc election : जिल्हा बँकेत महाविकास आघाडी तहात हरली, भाजपची चांदी : सांगली जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी सत्ताधारी आघाडी आणि विरोधी भाजपने सर्व जागांवर लढण्याची भाषा केली. उमेदवारीवरून सुरू असलेली रस्सीखेच आणि काही अर्जांबाबत न्यायालयापर्यंत गेलेला वाद सार्या जिल्ह्याने पाहिला. मात्र, सर्वपक्षीय नेत्यांच्या चर्चेतून 21 पैकी 15 जागांवर बिनविरोध झाल्या.
sangli dcc election : जिल्हा बँकेत महाविकास आघाडी तहात हरली, भाजपची चांदी
यापैकी उर्वरित सहा जागांसाठी निवडणूक लागली. मतदानाचा गठ्ठा नसताना भाजपला तब्बल 5 पैकी 4 जागा बिनविरोध मिळाल्या. सत्ताधारी आघाडीतील शरद पवार राष्ट्रवादी चार आणि काँग्रेस दोन ठिकाणी निवडणूक लढावी लागल्याने कात्रीत सापडले.
जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात जोरदार संघर्ष सुरु राहिला. बँकेत सध्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची आघाडी आहे. परंतु बँकेवर आ. जंयत पाटील यांचेच वर्चस्व राहिले. या निवडणुकीत मात्र त्यांना धक्का देण्याच्या हालचाली भाजपकडून सुरु राहिल्या. त्यांना जिल्हा बँकेच्या कारभारावरुन टार्गेट करण्यात आले. जिल्हा बँकेचा विषय भाजप नेत्यांनी राज्यभर गाजवला. वर्षभर बँकेच्या कारभारावर सातत्याने आक्षेप घेवून बदनामी केली.
निवडणुकीत भाजपा पूर्ण ताकदीने उतरण्यासाठी प्रयत्नशिल असली तरी सत्तेचे सोपान गाठण्याचे मोठे आव्हान होते. त्यामुळे नेत्यांसह उमेदवारांचा चांगलाच कस लागणार असल्याचे स्पष्ट झाले. सुरुवातीला निवडणुकीची तयारी आणि सर्व जागांवर लढण्याची भाषा झाली असतानाच दुष्काळाचे कारण पुढे करून जागा वाटपाचा समझोता झाला.
निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी राजकीय हालचाली गतीमान झाल्या होत्या. भाजपनेही एक पाऊल मागे येत दुष्काळी परिस्थितीमुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आ. जयंत पाटील यांच्याशी चर्चा करुन निवडणूक टाळण्याची विनंती केली. यानंतर महायुती व महाविकास आघाडीत बिनविरोध करण्याच्यादृष्टीने चर्चा झाल्या. त्यानुसार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट सात, काँग्रेस पाच, भाजप चार, शिवसेना एकनाथ शिंदे तीन व अजित पवार राष्ट्रवादी पक्ष एक असे जागा वाटप निश्चित झाले.
थेट मुख्यमंत्री फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडून मोर्चेबांधणी केली. त्यामुळे तासातासाला उमेदवार बदलत होते. अखेर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ संपत आली तशी यादी निश्चित झाली. मात्र यातही जत, कवठेमहांकाळ, तासगाव व मिरज सोसायटी गटाचा तिढा कायम राहिला. तसेच अनुसूचित जाती व भटक्या जाती जमाती या गटातही वेळेत अर्ज माघारी न झाल्याने निवडणूक लागली.
बिनविरोधाच्या फॉर्म्युल्यात सत्ताधारी आघाडीला सहा ठिकाणी लढावे लागत आहे. जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीचे चार ठिकाणी उमेदवार आहेत. त्यापैकी आ. रोहित पाटील यांच्या मतदारसंघातील तासगाव आणि कवठेमहांकाळ सोसायटभ गटात निवडणूक होत आहे. माजी आमदार सुमनताई पाटील यांच्याविरोधात माजी खासदार संजयकाका पाटील यांनी दोन हात केले आहेत. कवठेमहांकाळला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष टी. व्ही. पाटील यांच्याविरोधात अजितदादा राष्ट्रवादीच नेते व माजी मंत्री अजितराव घोरपडे लढत आहेत.
जतमध्ये भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात भाजपचे जिल्हा परिषद सदस्य सुनिल पवार यांचे बंधू विनोद पवार यांचा ऐनवेळी शरद पवार राष्ट्रवादीत प्रवेश घेवून उमेदवारी दिली. तेथे बिग फाईट होत आहे. भटक्या जाती व जमातीमधून शरद पवार राष्ट्रवादीचे संभाजी कचरे यांच्याविरोधात अमित पारेकर यांचा अर्ज राहिला. मिरज सोसायटी गटात काँग्रेसचे अण्णासाहेब कोरे यांच्याविरोधात अनिल शेगुणसे यांचा अर्ज आहे. अनुसूचित जाती गटात काँग्रेसचे के. डी. कांबळे यांच्याविरोधात मधाळे व विलास बेले यांचा अर्ज आहे.
या दोन्ही गटात आघाडी एकतर्फी निवडणूक होत आहे. जत वगळता सर्वत्र आघाडीचे पारडे जड असले तरी बिनविरोध झालेल्या तालुक्यातील मतदारांनाही भटक्या जाती व अनुसूचित जाती या दोन्ही गटासाठी मतदान करावे लागणार आहे. भाजपकडे मताचा गठ्ठा नसतानाही चार जागा सहज पदरात पडल्या. अन् सत्ताधारी आघाडीला लढावे लागले.
आघाडीचे नेते युद्धात जिंकले अन् तहात हरले…
जिल्हा बँकेवर सातत्याने आरोपांची राळ उठविणार्या भाजपशी सत्ताधारी आघाडीने हातमिळवणी केली. दुष्काळामुळे निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न झाला. त्यामध्ये काही प्रमाणात यश आले असले तरी आघाडीच दुष्काळाच्या चक्रव्युहात अडकल्याचे स्पष्ट झाले. सहा जागांवर निवडणूक होत असून तीन जागा दुष्काळी पट्टयातील आहेत. त्यामुळे आमदार जयंत पाटील, खासदार विशाल पाटील आणि आमदार विश्वजीत कदम यांनी युद्ध जिंकले, परंतु तहात हरल्याच्या चर्चेला जोर आला आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










