ईश्वरपूर रिंग रोडवर स्वाभिमानीचे आंदोलन; 100 हून अधिक ट्रॅक्टरची ऊस वाहतूक रोखली…

SHARE:

ईश्वरपूर रिंग रोडवर स्वाभिमानीचे आंदोलन; 100 हून अधिक ट्रॅक्टरची ऊस वाहतूक रोखली…  चालू गळीत हंगामात उसाला प्रतिटन 5 हजार 500 रुपये पहिली उचल मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वाळवा तालुक्यात आंदोलनाची धार तीव्र केली आहे. ईश्वरपूर येथील रिंग रोडवर राजारामबापू सहकारी साखर व य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्यांची ऊस वाहतूक करणारे 80 ते 100 हून अधिक ट्रॅक्टर अडवून संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाहतूक रोखली. ऊसदराचा प्रश्न मार्गी लागल्याशिवाय साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरळीत चालू देणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.

ईश्वरपूर रिंग रोडवर स्वाभिमानीचे आंदोलन; 100 हून अधिक ट्रॅक्टरची ऊस वाहतूक रोखली…

राजारामबापू आणि य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्यांनी चालू गळीत हंगाम सुरू केला आहे. मात्र, ऊसदराचा निर्णय झाल्याशिवाय कारखाने सुरू करू नयेत, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवेदनाद्वारे केली होती. या मागणीकडे कारखाना प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत संघटनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी ईश्वरपूर रिंग रोडवर ऊस वाहतूक रोखली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत ऊस उत्पादक शेतकर्‍यांना योग्य दर देण्याची मागणी केली.

यापूर्वी दोन दिवसांपूर्वी बहे येथे, तसेच नवेखेड येथेही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस वाहतूक रोखली होती. आता वाळवा तालुक्यात आंदोलन अधिक तीव्र करण्यात आले असून, कार्यकर्ते मोटारसायकल रॅली काढून ऊस उत्पादक शेतकर्‍यांमध्ये जनजागृती करत आहेत.
शेतीची मशागत, ऊस लागवड, खते, औषधे, मजुरी तसेच ऊसतोडणी आणि वाहतुकीच्या खर्चात मोठी वाढ झाली आहे. त्या तुलनेत ऊस उत्पादक शेतकर्‍यांना मिळणारा दर अपुरा असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे चालू हंगामात उसाला प्रतिटन 5 हजार 500 रुपये पहिली उचल मिळावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

साखरेच्या बाजारभावाचा लाभ ऊस उत्पादक शेतकर्‍यांनाही मिळाला पाहिजे. मात्र, शेतकर्‍यांना योग्य दर देण्याबाबत कारखानदारांकडून ठोस निर्णय घेतला जात नसल्याचा आरोप संघटनेने केला. मागणी मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करून साखर कारखाने बंद पाडण्याचा इशाराही संघटनेने दिला.

आंदोलनस्थळी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील, संचालक शैलेश पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक विजय मोरे आणि ईश्वरपूरचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी उर्वरित ऊस वाहतूक बंद ठेवण्याबाबत आश्वासन देण्यात आल्याचे सांगण्यात आले.

या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते भागवत जाधव,तानाजी साठे,दत्ताजी जाधव,अनिल करळे,शिवाजी पाटील, मच्छिंद्र साळुंखे, प्रसाद कुलकर्णी अनिल करळे, सुमित सलगर, आकाश साळुंखे, प्रदीप पाटील, शिवाजी पाटील, प्रताप नांगरे,भुषण विकळे यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

शेतकर्‍यांनो, ऊसतोडीसाठी थोडा धीर धरा!
साखर कारखानदार सात ते आठ टक्के रिकव्हरी असलेला ऊस गाळपासाठी नेत असल्याने शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होत आहे. यामुळे प्रतिटन 500 ते 600 रुपयांचा फटका बसण्याची शक्यता आहे. यंदा देशात साखरेची टंचाई निर्माण होण्याची शक्यता असून, दिवाळीच्या काळात साखरेच्या दरात वाढ होऊ शकते. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांनी ऊसतोडीसाठी थोडा धीर धरावा. तुमच्या उसाच्या कांडीला भंगाराचा भाव मिळू देणार नाही; तिला सोन्याचा भाव मिळवून देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना कटीबद्ध आहे. असे आवाहन भागवत जाधव यांनी केले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *