pune padvidhar news : पदवीधर, शिक्षक मतदारसंघाचा आज फैसला : पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आज (मंगळवारी) जाहीर होणार असल्याने राजकीय वर्तुळातील उत्सुकता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीच्या मतमोजणीची प्रशासकीय तयारी पूर्ण झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी सांगितले. पदवीधरसाठी भाजपच्या स्मिता जाधव आणि महाविकास आघाडीच्या हर्षदा जाधव-देशमुख यांच्यासह 47 तर शिक्षकसाठी आघाडीचे आ. जयंत आसगावकर, भाजपचे कौस्तुभ गावडे आणि शिवसेनेचे सचिन सानप यांच्यासह 30 उमेदवारांचे भवितव्य ठरणार आहे. राजकीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनी विजयासाठी देव पाण्यात घातले आहेत.
pune padvidhar news : पदवीधर, शिक्षक मतदारसंघाचा आज फैसला
पुण्यात आज मतमोजणी, प्रशासकीय तयारी पूर्ण, भाजप, आघाडीसह अपक्ष. उमेदवारांचे देव पाण्यात
पुणे विभागात पदवीधर मतदारसंघासाठी 62.78 टक्के, तर शिक्षक मतदारसंघासाठी 85.87 टक्के मतदान झाले. सांगली जिल्ह्यात पदवीधर मतदारसंघासाठी 55.62 टक्के, तर शिक्षक मतदारसंघासाठी 87.83 टक्के मतदानाची नोंद झाली. त्यामुळे वाढलेल्या मतदानाचा फायदा नेमका कोणाला होणार, याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. मतमोजणी मंगळवारी श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडीच्या बॅडमिंटन हॉलमध्ये होणार आहे.
पदवीधर मतदारसंघात तब्बल 47 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, भाजपच्या स्मिता जाधव आणि महाविकास आघाडीच्या हर्षदा जाधव-देशमुख यांच्यात प्रमुख लढत होती. शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार जयंत आसगावकर, भाजपचे कौस्तुभ गावडे आणि शिवसेनेचे सचिन सानप यांच्यासह 30 उमेदवार रिंगणात होते.
मतमोजणीच्या फेरीदरम्यान शांततेत, चूक होऊ न देता आणि कोणतेही दडपण न घेता काम करावे. व्यवस्थित सर्व नमुने भरून संबंधित पथकाकडे जमा करावेत. नियुक्त अधिकारी-कर्मचार्यांना आवश्यक तेथे मार्गदर्शन, मदत देण्यात येईल. मतपत्रिका वैध अवैध बाबतचे मुद्दे, आक्षेप योग्यरित्या निकाली काढावेत. मतपत्रिकांवरील पसंतीक्रमानुसार मतमोजणीची प्रक्रिया असल्याने प्रत्येक टप्प्यावर विशेष काळजी घ्यावी, अशा सूचना तेली-उगले यांनी दिल्या.
यावेळी मतमोजणीची प्रक्रिया निर्धारित नियमांनुसार, वेळेत आणि काटेकोरपणे पार पाडण्याच्या दृष्टीने प्रशिक्षणात विविध बाबी स्पष्ट करण्यात आल्या. मतपेट्या उघडणे, 50 मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करणे, भरायचे विविध नमुने, मतपत्रिका वैध, अवैध अचूक वर्गीकरण करणे, प्रत्येक फेरीनुसार निकाल नमुना जमा करणे आदींसह मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया यांचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण देण्यात आले. मतमोजणीसाठी करण्यात आलेल्या सर्व सुविधा व नियोजनाची माहिती यावेळी देण्यात आली.
अशी होणार मतमोजणी….
– पदवीधर मतदार संघाच्या मतमोजणीसाठी 100 टेबल आहेत. यासाठी 5 कक्षात प्रत्येकी 10 टेबलच्या 2 रांगा अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
– शिक्षक मतदार संघाच्या मतमोजणीसाठी 42 टेबल असणार आहेत. यासाठी 3 कक्षात प्रत्येकी 7 टेबलच्या 2 रांगा अशी व्यवस्था आहे.
– प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी पर्यवेक्षक, दोन मतमोजणी सहायक आणि एक शिपाई असा कर्मचारी वर्ग नियुक्त करण्यात आला आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










