sangli bank election : अनिल शेगुणसे यांच्यामागे बहुसंख्य ठरावधारकांचा पाठिंबा मिरज सोसायटी गटात निवडणुकीची रंगत वाढली! : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे. येत्या 1 नोव्हेंबर रोजी होणार्या या निवडणुकीत अनेक गटांमध्ये राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरू असतानाच मिरज तालुका सोसायटी गटाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले आहे. सुरुवातीला एकतर्फी वाटणार्या या लढतीत आता चुरस निर्माण झाल्याचे चित्र उमटत आहे.
sangli bank election : अनिल शेगुणसे यांच्यामागे बहुसंख्य ठरावधारकांचा पाठिंबा मिरज सोसायटी गटात निवडणुकीची रंगत वाढली!
या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत आलेले नाव म्हणजे अनिल शेगुणसे! सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या शेगुणसे यांनी मिरज सोसायटी गटात आपली उमेदवारी दाखल केल्यानंतर निवडणुकीच्या मैदानात वेगळीच समीकरणे तयार होऊ लागली आहेत. प्रस्थापित राजकीय ताकदीसमोर उभे राहत त्यांनी आपली भूमिका आक्रमकपणे मांडली आहे. त्यामुळे ही निवडणूक आता केवळ दोन उमेदवारांमधील लढत न राहता स्थानिक पातळीवरील नेतृत्व, प्रतिनिधित्व आणि ठरावधारकांचा कौल याभोवती केंद्रित झाली आहे.
विशेष म्हणजे, बहुतांश ठरावधारक आपल्या पाठीशी असल्याचा दावा स्वतः अनिल शेगुणसे यांनी केला आहे. सुरुवातीला निवडणुकीचे चित्र एका बाजूने झुकल्याचे बोलले जात होते. मात्र, आता ठरावधारकांमधील हालचाली आणि बदलत्या राजकीय चर्चांमुळे या गटातील लढतीकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे. शेगुणसे यांच्या दाव्यामुळे निवडणुकीतील चुरस आणखी वाढली आहे.
दरम्यान, काँग्रेसचे उमेदवार आण्णासाहेब कोरे यांच्यावरही आता लोकांमधून जोरदार टीका होत आहे. काँग्रेस कमिटी, सांगली बाजार समिती, मिरज पंचायत समिती आणि आता सांगली जिल्हा बँक अशा विविध संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकाच व्यक्तीचे नाव वारंवार समोर येत असल्याचा मुद्दा लोक उपस्थित करीत आहेत.
एकाच माणसाला किती ठिकाणी पाहायचे? लोकांनाही आता याचा कंटाळा आला आहे. दुसरा कोणी लायक नाही का? नव्या चेहर्यांना संधी मिळायला नको का? असा सवाल लोक उपस्थित करीत आहेत.
दरम्यान, निवडणुकीच्या या रणधुमाळीत कोण कोणाच्या पाठीशी उभे राहणार, ठरावधारकांचा अंतिम कौल कोणाच्या बाजूने जाणार आणि मतपेटीतून कोणाला पसंती मिळणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
शेगुणसे यांनी मात्र आपल्या विजयाबाबत ठाम विश्वास व्यक्त केला आहे. कोणी काहीही म्हटले तरी माझा विजय पक्का आहे, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










