shetkrisangatna news : आंदोलन पेटलं, तरी कारखानदारांचे तोंडावर बोट?

SHARE:

shetkrisangatna news : आंदोलन पेटलं, तरी कारखानदारांचे तोंडावर बोट? : साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरु झाला असताना साखरेच्या दरात चांगली वाढ झाल्याने त्याचा ऊस उत्पादकांना फायदा मिळण्यासाठी आता शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. ऊसाला पहिली उचल साडेचार हजार रुपये देण्याच्या मागणीसाठी जिल्ह्यात आंदोलनाची ठिणगी पडली.

shetkrisangatna news : आंदोलन पेटलं, तरी कारखानदारांचे तोंडावर बोट?

जिल्ह्यात ऊस दराची कोंडी फुटेना, शेतकरी संघटना आक्रमक

ट्रॅक्टरची जाळपोळ, बैलगाड्यांची अडवून हवा सोडण्याचे प्रकार वाढले असून ऊसदराचे आंदोलन पेटले. साखर कारखान्यांनी अर्थकारण मांडत सद्य:स्थितीत फारशी वाढ देता येणार नसल्याचा मुद्दा पुढे करीत तोंडावर बोट ठेवले आहे. त्यामुळे शेतकरी संघटना आणि कारखानदार यांच्यात संघर्ष सुरु झाला आहे. आता ऊस दराची कोंडी फुटणार कशी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

राज्याच्या सहकार क्षेत्रावर सत्ताधारी आणि काही प्रमाणात विरोधी पक्षांमधील नेत्यांचे नियंत्रण आहे. त्यामुळे साखरेच्या तेजीतून मिळणार्‍या अतिरिक्त नफ्यात शेतकर्‍यांना हक्काचा हिस्सा मिळवून देण्याचा लढा आता एकप्रकारे राजकीय रंग घेऊ लागला आहे. जुलै महिन्यात प्रति किलो 45 रुपये असणारी साखर गेल्या आठवड्यामध्ये देशातील काही भागात प्रति किलो 70 ते 80 रुपयांपर्यंत वाढलेली होती. साहजिकच, साखर कारखान्यांना या वाढीव दराचा चांगला आर्थिक लाभ झाला असल्याचे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूर जिल्ह्यात गत हंगामातील उसासाठी प्रतिटन 300 रुपयांची मागणी आक्रमकपणे पुढे करत थेट साखर कारखान्यांना आणि कार्यालयांना लक्ष्य केले आहे. जय शिवराय, शेतकरी संघटना, किसान मोर्चा आदी अन्य काही संघटनांनी 525 रुपयांपर्यंतच्या हप्त्याची मागणी करत दर वाढवून मागण्याची स्पर्धा निर्माण केली आहे. सांगली जिल्ह्यातील संघटनांनी गतवर्षीचे दोनशे रुपये देण्याची मागणी केली, त्याला कारखानदारांनी केराची टोपली दाखवली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यंदाच्या हंगामासाठी उसाला पहिली उचल साडेचार हजार रुपये प्रतिटन देण्याची मागणी केली आहे. मात्र, साखर कारखानदारांनी ऊसदर जाहीर न करताच कारखाने सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकरी आक्रमक होत असून, इस्लामपूर, आरग येथील ट्रॅक्टर पेटविण्याच्या घटना घडल्या. घटनेमुळे ऊसदर आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे स्पष्ट झाले. सांगली जिल्ह्यात यंदा सतरा साखर कारखान्यांनी हंगाम सुरु करण्यासाठी परवाना घेतला आहे. बहुतांशी कारखान्यांनी गाळप सुरु केले आहे, पण ऊस दराबाबतची भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे, त्यामुळे शेतकर्‍यांमध्ये नाराजी वाढली आहे.

बाजारात साखरेचे दर वधारलेले असताना कारखानदार नफा कमावत आहेत आणि त्याचा योग्य मोबदला शेतकर्‍यांना मिळत नाही, हा शेतकरी संघटनांचा युक्तिवाद सामान्य जनतेमध्ये आणि ग्रामीण भागात सहानुभूती निर्माण करणारा ठरत आहे. यामुळे सत्ताधारी व विरोधक यांच्यातील राजकीय श्रेयवादाची लढाई तीव्र होण्याची चिन्हे आहेत. शासन, प्रशासन वा कारखानदारांनी यावर तातडीने तोडगा काढला नाही, तर शेतकरी संघटनांचे आंदोलनाचे हत्यार ऊस गळीत हंगामाच्या सुरुवातीलाच राजकीय पटलावर सत्ताधार्‍यांच्या अडचणी वाढवू शकते. ऊस उत्पादकांच्या या रोषाला शांत करण्यासाठी सहकार आणि राजकारण यांच्यात कोणता मध्यम मार्ग निघतो, यावरच साखर पट्टयातील आगामी राजकीय भविष्य अवलंबून असणार आहे.

तर तीव्र आंदोलन उभारावे लागेल ः माजी खा. राजू शेट्टी
मागील दोन महिन्यात साखरेचे दर दीडपटीने वाढले असल्याने त्याचा मोठा आर्थिक फायदा कारखान्यांना झाला आहे. एकीकडे वाढलेला उत्पादन खर्च, खतांचे व मजुरीचे वाढलेले दर यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. आम्ही साडेचार हजार रुपये ऊसाची पहिली उचल मागितली आहे. त्यानुसार कारखानदारांनी ऊसाचे दर जाहीर न केल्यास तीव्र आंदोलन उभारावे लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *