pune padvidhar election : भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; अंतर्गत नाराजीने महायुतीचा धुव्वा! : पुणे पदवीधर विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अनपेक्षित विजयाची नोंद करत भाजपसह संपूर्ण महायुतीला जोरदार धक्का दिला. महायुतीच्या उमेदवार सौ. स्मिता जाधव यांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सौ. हर्षदा देशमुख यांनी पराभव केला आणि एकेकाळी भाजपचा अभेद्य बालेकिल्ला मानल्या जाणार्या पुणे पदवीधर मतदारसंघात सत्ताधार्यांना आत्मपरीक्षण करण्याची वेळ आणली. हा केवळ एका उमेदवाराचा विजय किंवा दुसर्या उमेदवाराचा पराभव नाही, तर राजकीय ताकदीच्या जोरावर निवडणुका जिंकता येतात, या समजुतीला मतदारांनी दिलेला एक मोठा धक्का आहे.
pune padvidhar election : भाजपच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; अंतर्गत नाराजीने महायुतीचा धुव्वा!
विशेष म्हणजे, एका बाजूला भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशा तीन पक्षांची एकत्रित ताकद महायुतीच्या पाठीशी होती. दुसरीकडे काँग्रेसची संघटनात्मक अवस्था फारशी प्रभावी नव्हती. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मिळवलेला हा विजय अनेक राजकीय समीकरणे बदलणारा ठरला आहे. महायुतीकडे सत्ता होती, संघटन होते, नेत्यांची मोठी फळी होती; मात्र या सगळ्या ताकदीचे मतांमध्ये रूपांतर करण्यात महायुती अपयशी ठरली. याउलट मर्यादित साधनसामग्री असतानाही राष्ट्रवादीने विजयाचा गुलाल उधळला.
शरद लाड यांची उमेदवारी डावलली अन् नाराजीचा वणवा पेटला!
गेल्या अनेक वर्षांपासून पुणे पदवीधर मतदारसंघाची तयारी करणारे आणि या मतदारसंघात स्वतःचे संघटन उभे करण्यासाठी प्रयत्नशील असलेले शरद लाड यांना ऐनवेळी उमेदवारी नाकारण्यात आली. निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी केलेल्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षांवर त्यामुळे पाणी फिरले. अनेक वर्षांच्या मेहनतीनंतरही संधी मिळत नसेल, तर कार्यकर्त्यांनी नेमके कोणासाठी आणि कशासाठी काम करायचे, असा प्रश्न त्यांच्या मनात निर्माण होणे स्वाभाविक होते.
त्यातच कोल्हापूरच्या भैय्या माने यांना थांबवण्यात आले आणि भाजपमध्ये नसलेल्या व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली. पक्षासाठी वर्षानुवर्षे घाम गाळणार्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून बाहेरच्या व्यक्तीला संधी दिल्याची भावना मूळ भाजप कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाली.
शरद लाड यांची नाराजी दूर केल्याचा दावा केला गेला, मात्र नेत्यांची नाराजी दूर झाली म्हणजे कार्यकर्त्यांचीही नाराजी दूर होतेच असे नाही. नेत्यांनी हातमिळवणी केली, तरी तळागाळातील कार्यकर्त्यांच्या मनातील सल कायम राहिली तर त्याचे परिणाम मतदानातून दिसून येतात. पुणे पदवीधर निवडणुकीत नेमके हेच घडले असावे, असे म्हणण्यास वाव आहे.
पाच जिल्ह्यांत मेळावे झाले; पण प्रत्यक्ष मैदानात भाजप कुठेच दिसला नाही!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाचही जिल्ह्यांत पदवीधर आणि शिक्षक मतदारांचे मेळावे घेतले. या माध्यमातून निवडणुकीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. मात्र या मेळाव्यांपलीकडे भाजपची प्रत्यक्ष निवडणूक यंत्रणा कितपत सक्रिय होती, हा मोठा प्रश्न आहे.
भाजपच्या अनेक नेत्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून प्रचार करण्याऐवजी बंद वातानुकूलित खोल्यांमध्ये बसून नियोजन करण्यावरच भर दिल्याचे चित्र दिसले. कागदावरची रणनीती आणि प्रत्यक्ष मैदानातील लढाई यामध्ये मोठे अंतर असते. या अंतराची जाणीव महायुतीला निकालानंतर झाली असावी.
शिक्षक मतदारसंघातील राजकारणाचाही पदवीधर निवडणुकीला फटका!
पदवीधर आणि शिक्षक विधानपरिषद निवडणुकीच्या राजकीय घडामोडी एकमेकांशी जोडल्या गेल्या. शिवसेनेने शिक्षक विधानपरिषद निवडणुकीत सचिन सानप यांना पाठिंबा दिल्याने महायुतीतील राजकीय गणित अधिक गुंतागुंतीचे झाले. भाजप आणि शिवसेनेच्या रणनीतीत एकवाक्यता दिसली नाही. परिणामी, महायुतीची ताकद एकाच दिशेने केंद्रित होण्याऐवजी विभागली गेली.
सांगलीत जिल्हा बँकेची धामधूम; पदवीधर निवडणूक मात्र दुर्लक्षित!
सांगली जिल्ह्यात भाजपचे बहुतांश नेते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत व्यस्त होते.जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय प्रतिष्ठा, उमेदवारांची जुळवाजुळव, ठरावधारकांची गणिते आणि स्थानिक पातळीवरील संघर्ष यामध्ये भाजपच्या नेत्यांचे लक्ष अधिक केंद्रित झाले. त्यामुळे पदवीधर मतदारसंघातील प्रचाराला अपेक्षित गती मिळाली नाही. सांगलीत सर्वांत कमी मतदान झाले, ही बाबही दुर्लक्ष करण्यासारखी नाही.
दुसरीकडे कोल्हापुरात महायुतीच्या घटक पक्षांना गोकुळच्या राजकारणाचा झटका बसला होता. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीशी संबंधित राजकीय घडामोडी आणि स्थानिक पातळीवरील नाराजी यामुळे महायुतीच्या नेत्यांसमोर वेगळीच आव्हाने होती. त्यामुळे कोल्हापुरातही पदवीधर निवडणुकीसाठी अपेक्षित एकजूट आणि गांभीर्य दिसून आले नाही.
भाजपचा बालेकिल्ला ढासळला; आत्मपरीक्षणाची वेळ!
एकेकाळी पुणे पदवीधर विधानपरिषद मतदारसंघ म्हणजे भाजपचा बालेकिल्ला, असे राजकीय समीकरण होते. या मतदारसंघात भाजपची संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांचे जाळे आणि नेत्यांचा प्रभाव यामुळे विरोधकांना विजय मिळवणे कठीण मानले जात होते. मात्र राजकारणात कोणताही बालेकिल्ला कायमस्वरूपी अभेद्य नसतो, याची प्रचिती या निवडणुकीने दिली.
भाजपकडे सत्ता होती, महायुतीचे संख्याबळ होते, मोठ्या नेत्यांची फळी होती आणि प्रचारासाठी आवश्यक साधनेही होती. मात्र या सगळ्याला कार्यकर्त्यांच्या मनातील विश्वासाची जोड मिळाली नाही. उमेदवारीच्या निर्णयातील नाराजी, स्थानिक नेत्यांमधील समन्वयाचा अभाव, प्रचारातील निष्क्रियता आणि निवडणुकीकडे झालेले दुर्लक्ष या सगळ्यांचा एकत्रित परिणाम निकालातून समोर आला.
पुणे पदवीधरच्या निकालाने भाजपला हाच धडा दिला आहे. शरद लाड यांच्यासारख्या इच्छुकांची नाराजी, भैय्या माने यांच्यासारख्या स्थानिक राजकीय समीकरणांकडे झालेले दुर्लक्ष आणि कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झालेली अस्वस्थता या सगळ्यांचा हिशेब मतपेटीतून झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सत्तेच्या राजकारणात मोठे नेते महत्त्वाचे असतात; पण विजयाचा खरा पाया सामान्य कार्यकर्ता असतो. आणि जेव्हा हाच कार्यकर्ता मनातून दुरावतो, तेव्हा कितीही मोठी राजकीय ताकद असली तरी बालेकिल्ले ढासळायला वेळ लागत नाही, हेच पुणे पदवीधरच्या निकालाने दाखवून दिले!
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










