rajkiyalive

आटपाडी खानापूरचा पेच कसा सुटणार?

दिनेशकुमार ऐतवडे, सांगली

(khanapur-atpadi vidhansabha ) विधानपरिषचे आमदार आणि भाजपचे नेते गोपिचंद पडळकर यांनी येणार्‍या निवडणुकीत खानापूर आटपाडीतून विधानसभा लढणार अशी घोषणा केल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष आता खानापूर आटपाडीकडे लागून राहिले आहे. कारण येथे विद्यमान आमदार असणारे अनिल बाबर शिंदे गटाचे असून, शिंदे गट हा भाजपबरोबर सत्तेत आहे. पडळकर जर यांनी खरोखरच निवडणुकीच्या रिंगणात उतरले तर अनिल बाबर, अ‍ॅड. वैभव पाटील, अमरसिंह देशमुख यांचे पुनर्वसन कसे होणार हाच खरा प्रश्न आहे. पण अनिल बाबर यांचा स्वभाव सहजासहजी मागे हटणारे नाही, त्यामुळे ऐनवेळी गोपीचंद यांची घोषणा हवेत विरते की काय अशीच स्थिती आहे.

हेही वाचा

भाजपकडून प्रादेशिक पक्षांचे निर्मुलन

फडणवीसांचा भाजप कधी संपून जाईल सांगता येणार नाही

राजकीय आखाड्यातील पैलवान

ॲड. वैभव पाटील यांचा अजितदादा गटात प्रवेश

तालुक्यात सध्या राजकीय वातावरण तापले आहे.

कायम दुष्काळी तालुका म्हणून परिचित असणार्‍या आटपाडी तालुक्यात सध्या राजकीय वातावरण तापले आहे. येणार्‍या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी अनेक जण येथून शड्ूड मारून तयार आहेत. लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचे संकेत डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी केली आहे. परंतु खरी अडचण आहे ती विधानसभेसाठी. 1990 पासून राजकारणात सक्रीय असलेल्या विद्यमान आमदार आणि मंत्रीपदाच्या प्रतिक्षेत असलेले अनिल बाबर गेल्या पंचवार्षिकमध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि निवडून देखील आले. राजकीय सारीपाटात त्यांनी शिंदे गटाला साथ दिली. शिंदे गटासोबत जाणारे पहिले आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.

2014 आणि गतवेळच्या 2019 च्या निवडणुकीत अनिल बाबर यांनी विरोधकांना धूळ चारत विधानसभेत चौथ्यांदा प्रवेश

खानापूर तालुका ते सांभाळतात आणि आटपाडी तालुका त्यांचे परममित्र तानाजी पाटील हे सांभाळतात. 2014 आणि गतवेळच्या 2019 च्या निवडणुकीत अनिल बाबर यांनी विरोधकांना धूळ चारत विधानसभेत चौथ्यांदा प्रवेश केला आहे. येणारी निवडणूक महायुतीतर्फे लढणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी याअगोदरच घोषित केले आहे. त्यामुळे येथे अनिल बाबर यांनाच तिकीट मिळणार हे निश्चित आहे.

भाजपने खानापूर आटपाडी विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक प्रमुखपदी अमरसिंह देशमुख यांची निवड केली आहे.

भाजपने खानापूर आटपाडी विधानसभा मतदार संघाच्या निवडणूक प्रमुखपदी अमरसिंह देशमुख यांची निवड केली आहे. नुकत्याच झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीत तानाजी पाटील यांनी खेळी करून देशमुखांना घरी बसवेले आहे. देशमुख जरी सध्या भाजपमध्ये असले तरी दुर्लक्षितच आहेत. एकेकाळी देशमुख घराण्याची तालुक्यावर मांड पक्की होती. पण काळाच्या ओघात देशमुखांना थोडे मागे हटावे लागत आहे. देशमुख घराण्याचे पुनर्वसन करणे भाजपला गरजेचे आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा असण्याची शक्यता आहे.

विधानपरिषदेचे आमदार गोपिचंद पडळकर हे सध्या पायाला भिंगरी लावून भाजपचा प्रचार करताना दिसून येत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंंद्र फडणवीस यांची त्यांच्यावर मर्जी आहे. गोपिचंद ज्या अर्थी विधानसभा निवडणूक लढण्यविण्याची घोषणा करतात त्यामागे देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा असण्याची शक्यता आहे. निवडणुकीला अजून वेळ आहे तोपयर्ंत राजकारणात काहीही होवू शकतेे. त्यामुळे गोपिचंद पडळकर आत्तापासूनच तयारी करीत आहेत.

माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी अजूनही आपली भूमिका जाहीर केली नाही.

राष्ट्रवादीत मोठा भूकंप झाला आणि विट्याचे नेते अ‍ॅड. वैभव पाटील यांनी आपली भूमिका जाहीर करून ते अजितदादा पवार यांच्या गोटात दाखल झाले. माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी अजूनही आपली भूमिका जाहीर केली नाही. 2004 च्या निवडणुकीत अनिल बाबर यांना सर्व पक्षीयांना घेरले आणि विट्याच्या सदाशिवराव पाटील यांच्या पदरात माप टाकले. सदाशिवराव आमदार झाले. वैभव पाटील यांनी जिल्ह्याचे नेते जयंत पाटील यांच्यावर आरोप करून अजितदादा गटाची वाट जरी धरली असली तरी महायुतीतर्फे निवडणुक लढविल्यास त्यांना उमेदवारीसाठी बराचसा संघर्ष करावा लागणार आहे. कारण विद्यमान आमदार अनिल बाबर, आमदार गोपिचंद पडळकर, अमरसिंह देशमुख यांना वगळून अ‍ॅड. वैभव पाटील यांना उमेदवारी मिळणे शक्य नाही. त्यामुळे त्यांना आपल्या विटा नगरपालिकेतील सत्तेवरच समाधान मानावे लागणार आहे.

वेगवेगळे लढले तर असा होईल सामना
राजकारणात केंव्हा काय होईल हे सांगता येत नाही. ऐनवेळी जर 2009 प्रमाणे सर्वच पक्षांनी जर वेगवेगळे लढण्याची तयारी केली तर शिंदे गटाकडून अनिल बाबर, भाजपकडून गोपिचंद पडळकर किंवा अमर देशमुख, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून अ‍ॅड. वैभव पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

देशमुख घराण्याची सूत्र अमरसिंह देशमुख यांच्या हातात

आटपाडीच्या देशमुख घराणे सध्या राजकारणात असले तरी त्यांच्याकडे मानाचे पद नाही. सध्या देशमुख घराण्याची सूत्र अमरसिंह देशमुख यांच्या हातात आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत त्यांच्या घरातील सत्ता तानाजी पाटील यांनी काढून घेतली. त्यानंतर बाबासाहेब देशमुख यांनी स्थापन केलेले साखर कारखानाही त्यांच्या हातातून गेली आहे. भाजपने अमरसिंह देशमुख यांच्यावर विधानसभा प्रमुख पदाची संधी दिली आहे. परंतु प्रमुख केल्यामुळे केवळ दुसर्‍याचा प्रचारच करायचा काय हा प्रश्न आहे. धाडसी प्रवृतीचे असलेले अमरसिंह देशमुख यांना आमदारकी खुणावत आहे. परंतु जागा एक आणि उमेदवार अनेक अशी अवस्था तालुक्याची झाल्याने त्यांनाही उमेदवारीसाठी कसरत करावी लागणार आहे.

विधानपरिषदेवर असणार्‍या गोपिंचद पडळकर यांना विधानसभा खुणावत आहे.

राज्याच्या सत्तेत विधानसभेतील आमदारांना जास्त किंमत असते. मंत्रीपदाच्या शर्यतीत विधानसभेतील आमदारांचा पहिल्यांदा विचार केला जातो. त्यामुळे विधानपरिषदेवर असणार्‍या गोपिंचद पडळकर यांना विधानसभा खुणावत आहे. एकदा की जागा पक्की झाली की पुन्हा दुसर्‍यांना आपलाच क्लेम लागतो हे जगजाहीर आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूकच महत्वाची असते. हे गोपिचंद पुरेपूर जाणून आहेत. त्यांनी जरी घोषणा केली असली तरी महायुतीतर्फे अनिल बाबरच उमेदवार असतील अशी घोषणा शिंदे गटाचे नेते उद्योगमंत्री उदय सावंत यांनी केली आहे. सत्तेच्या सारीपाटात उमेदवारी कशी मिळवावी यात अनिल बाबर निष्णात आहेत. आणि जर उमेदवारी नाही मिळाली तरी ऐकवेळी कोणताही निर्णय घेउन निवडणुकीच्या रिंगणात ते उतरू शकतात. तसे गोपिचंद यांचे नाही. उमेदवारी डावलली तरी त्यांना पक्षाचा प्रचार करावा लागणारच आहे. एकंदरीत येणार्‍या विधानसभा निवडणुकीत खानापूर आटपाडी मतदार संघातून महायुतीतर्फे उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच असेल यात शंका नाही.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

यह भी पढ़ें

टॉप स्टोरीज